Wednesday, 4 December 2024

Jawarichi naal Sadade ghat

                  जवारीची नाळ व सादडे घाट

        हरिश्चंद्रगड परिसरात भटकंतीस भरपूर वाव आहे. गडावर चढाई उतराई च्या अनेक वाटा तसेच गड सह्यशिरोधारेवर असल्यामुळे घाटवाटांची कमी नाही. 

       अवाढव्य हरिश्चंद्रगड हा नगर पुणे व ठाणे यांच्या सीमेवर वर्षानुवर्ष दिमाखात उभा असलेला. सहाजिकच गडावर देशातून तसेच कोकणातून जाणाऱ्या अनेक वाटा. गड जेवढा मोठा तितक्याच त्यावर जाण्या येण्यासाठी वाटा जास्त. याचं कारण चौफेर पसरलेल्या गडरहाळात अनेक छोटी गावं, वाडी, वस्त्या पुर्वापार वसलेल्या, पुरातन काळापासून गडावर येजा याच वाटांनी होत असे. 

अशाच एका दुर्गम दणकट घाटवाटेची सफर यंदा घडून आली ती प्रचलित सादडे घाटाच्या सोबतीनं. एका दिवसात १५ किमीहून अधिक चाल सोबत दोन हजार फुटाची चढाई उतराई. 
 
बेलपाडा गाठायला अंमळ उशीरच झाला. मनोज ची तयारी होईपर्यंत गावातील बच्चे मंडळी सोबत क्रिकेट च्या दोन मॅचेस खेळून झाल्या, थोडक्यात ट्रेक आधी चांगला वार्म अप झाला. मनोज आला गावातून निघेपर्यंत दहा वाजले. झटपट पावलं टाकत सुटलो. महाकाय कोकणकडा मागे पडू लागला. शेतातून, बांध्यावरून जात सादडे घाटाची मळलेली वाट पकडली. 

नुकतीच भात कापणी झाडणी वगैरे कामं उरकली गेल्यामुळे शेतात फक्त खुरटी बोंड उरलेली. यंदा पाऊसमान बरा, इथला बळीराजा त्यात समाधानी. पाऊण तास सपाटीवर चालून गेल्यावर दोन ओढे पार करत वाट उजवीकडे रानात शिरली, काही अंतर जात डावीकडून केळेवाडी कडून येणारी वाट मिळाली. या दिवसात ऊन फारसे जाणवत नाही, सोबत अधून मधून जाणवणारा गार वारा व काही ठिकाणी पाण्याची बारीक धार हि सारी जमेची बाजू. अर्ध्या तासाच्या चढाई नंतर मोठ्या ओढ्यात नाश्ता करायला थांबलो. 

एकदम प्रसन्न जागा, झुळझुळ करत जाणारं पाणी, अनेक पक्ष्यांचा किलबिलाट सोबत पानांची सळसळ निघावेसे वाटेना जवळपास अर्धा तास आम्ही दोघेही निशब्द होतो. मनोज तसाही कमी व बेताचं बोलतो, मलाही शांतता आवडते, दोघेच असल्याने घाई गर्दी गोंधळ नाहीच. मला व्यक्तिश असेच शांत निवांत ट्रेक आवडतात. असो... 
 
आता सादडे घाटाची खिंड दृष्टिक्षेपात आली. नीट निरखून पाहिल्यावर लक्षात येत की डाव्या हाताला एक सोंड उतरली आहे त्याच सोंडेच्या धारेवरून अगल बगल देत सादडे घाट वर चढतो. आम्ही आजची चढाई ठरवलेली जवारीची नाळ, या सोंडेच्या पल्याड म्हणजे डावीकडे होती. थोडक्यात या भागात घाटवाटेचा क्रम लावायचा झाला तर सादडे घाट, करपदरा, जवारीची नाळ, नाफ्त्याची नाळ, गोधनीची वाट, माशाचा लोळ ते ऊंबरदार असा दक्षिण ते उत्तर लावता येईल. नाफ्ता ची वाडी, पेठेची वाडी ते कुमशेत तर कोकणात वाल्हिवरे बेलपाडा, केळेवाडी, मोधळवाडी इ. लहानसहान वाडी वस्त्या या रोटीबेटी सोयरीक तसेच व्यावहारिक दृष्ट्या जोडलेल्या. थोडक्यात या वाटा कोकणातील काळू चे खोरे, घाटावरील मुळा खोरे सोबत जोडतात. काळाच्या ओघात यांचा वापर जरी कमी झाला तरी आजही जुनी खोडं ह्या वाटा वापरत या संदर्भात अनेक कहाण्या ऐकवतात...  सादडे घाटाच्या दिशेने धारेवर येत काही काळ चढून जात मनोजने डावी अस्पष्ट अशी वाट अचूक हेरली. थोडं आत जात वाटेवर कारवीची तसेच काही काटेरी झुडूपाची काटछाट केलेली आढळली, थोडक्यात हा वाट वहिवाटेचा पुरावा. दोन ट्रेव्हर्स मारून डावीकडील मोठ्या ओढ्यात आलो इथेही गारेगार बारीक पण वाहतं पाणी. 
समोरच होता तो मोठा हपाट्याचा कडा अगदी मिनी कोकणकडा वाटावा असाच त्यासारखाच काहिसा अंतर्वक्र. त्या कड्याच्या खाली पोटातून आडवं जायचं आहे असे मनोजने सांगितले. कड्याची ऊंची फारच वाटत होती त्यात तो भेदक दरडावणारा कातळ, तिथली गंभीर शातंता सारंच गूढ. 
अस्तेकदम चढाई सुरू केली ओढ्या नाळेतील मोठ मोठ्ठाले दगड धोंडे जसे जमेल तसे वर जात रहायचे. एक दोन ठिकाणी ओढ्यातून बाहेर येत, काहीशी मळलेली वाट होती ती मनोजने बरोबर शोधली. पुन्हा नाळेत येत तीव्र चढण सोबत घसारा. वाटेत ऐके ठिकाणी मोठ्या ऊंबराच्या झाडाखाली ब्रेक घेतला. ऊंबराच्या झाडाची मुळं खोलवर रुजली होतीच पण काही कड्यावर सुध्दा झेपावलेली तिथेच लहानसं पाण्याचे खळगे त्यावर गोगलगाय, लहान लहान खेकडे, फुलपाखरं व माश्यांची येजा सुरू.. माश्यांची गुणगुण भुणभुण एक वेगळाच आवाज ती शांतता छेदत होती. खरंच सारं लाजवाब. तो औटघटकेचा थांबा चांगलाच तजेला देऊन गेला. 
मजल दरमजल करत हपाट्याच्या कड्याखाली पोहचलो. कड्याची ऊंची तो काळाकुट्ट कातळ त्याच्या खोबणी व काही आडनीड ठिकाणी पाहिलं तर किमान चाळीस एक माश्यांची पोळी लटकलेली. 
कड्याखालून आडवा अरूंद ट्रेव्हर्स मारला समोर दरीतील काही सुळके फारच भेदक वाटत होते. 
तो आडवा ट्रेव्हर्स पाच मिनिटांत डावीकडे वळून नाळेत शिरला. 
ही आडवी वाट मग थेट नाळेत चढाई, हा भाग मला माथेरान च्या पिसारनाथ शिडीची वाट ट्रेक सारखाच वाटला. नाळेच्या सुरूवातीस ऊंबराचे झाड, या जवारीच्या नाळेत नळीच्या वाटेसारखेच स्लेट व दगडांच्या फरशांची रास. 
बहुतेक ठिसूळ भाग, सावकाश वर जाऊ लागलो. शेवटच्या टप्प्यात दोन पॅच आले. पहिला काहिसा ओव्हर हॅग तर दुसरा चिमणी पॅच सारखा. नवख्या ट्रेकर्स नी सुरक्षितता म्हणून दोर लावायला हरकत नाही. 
आम्ही दोर नेला होता पण तो न वापरता आम्हाला वर जाता आले. सराईत नियमित ट्रेकर्स व हवशेनवशे फरक लक्षात घेता सुरक्षा महत्वाची. 
नाळेतून होणारे नाफ्ता व डोमाचे दर्शन खासच. वर येत डावीकडे वळून कारवीच्या रानातून माथ्यावर आलो अगदी थेट हपाट्याच्या कड्यावर. 
चार वर्षांपूर्वी करपदरा व ऊंबरदार घाटाचा ट्रेक केला होता त्यावेळेस पहिल्यांदा इथवर आलो होतो त्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. आज हवा फार स्वच्छ नव्हती त्यात भर दुपारचे दोन वाजलेले. धुसर वातावरणात मावळतीला भैरवगड, दौंड्या भोजगिरी 
दक्षिणेकडे करपदरा भागातील सुळके व रौद्र  कातळभिंती तर उत्तरेला नाफ्ता व डोमाची जुळी शिखरं, वायव्येस कंरडा कात्राबाई गवळदेव घनचक्कर रांग आणि पाठमोरा कलाडगड हे झालं वर्तुळ संपूर्ण. कड्यावर हल्लीच एक निवारा छत्री वनखात्याने बांधली आहे. 
दुपारचे जेवण तिथेच केले, जेवणाचा डबा अर्थातच घरून आणलेला. वामकुक्षी घेऊन साडेतीन च्या सुमारास सादडे घाटाकडे निघालो. 
कलाडगड भातशेतीच्या शिवारामागे दिमाखात ऊभा होता, वेळ हाताशी असता तर नक्कीच भेट दिली असती. समोरच्या मोकळवनातून कच्चा रस्ता वाटेतल्या झापातील म्हातारे बाबांनी दोन तांबे शुध्द ताक दिले. 
हल्ली हागणदारीचे दुकानदारांचे सह्याद्रीत पेव फुटले आहे. जिथे तिथे पैशाचा खेळ झालाय त्यामुळे सारीच परिस्थिती बिघडू लागलीय ट्रेकर हौशे नवशे निब्बा निब्बी यात फरकच राहिला नाहिये तरी त्या म्हातारबाबा ने आमची नस बरोब्बर ओळखली त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. असो... 
 
हपाट्याच्या कड्यापासून सादडे घाटाकडे जाताना या झापाच्या पुढे खिंड पार करावी लागते. खिंड पार केल्यावर हरिश्चंद्रगड दिसू लागला. वेताळधार ते बैलघाट, नळीची वाट पर्यतची बाजू नजरेस पडली. 
मोकळवनातून उजवीमारली व सादडे घाट खिंडीची सौम्य चढण सुरू झाली. याच मोकळवनातून सरळ गेलो असतो तर नळीची वाट जिथे वर येते त्या झाडीभरल्या खिंडीत जाता येते व तेथून डावीकडे चढाई करत थेट कोकणकडा तर खालील बाजूने पाऊण तासाची चाल करत तटबंदी लाभलेल्या बैलघाटाने पण गडावर जाता येते. हे सारे मुळा नदी चे खोरे अत्यंत रमणीय असे. साडेचार च्या सुमारास सादडे घाटाच्या खिंडीत आलो. जीपीएस वर पाहिलं तर या खिंडीची ऊंची १७१० फूट, हपाट्याचा कड्याची ऊंची २१६५ फूट समुद्र सपाटीपासून. 
खिंडीतून सावकाश उतराई सुरू केली सुरूवातीस तीव्र उतार तसेच दगडांच्या चिपांचा ढीग. पाय घसरत सरकत तोल सावरत उतरू लागलो. अगदी थोडं खाली येताच उजवीकडे कातळात खोदकाम केलेले सद्यस्थितीत काहिसे भग्न असे पाण्याचे आयताकृती टाके नजरेत आले. 
सादडे घाटातून नऊ दहा वर्षांपूर्वी मी उतराई केली होती पण त्यावेळेस गडबडीत हे टाकं पहायचं राहून गेलं यंदा मात्र दुसऱ्या भेटीत हे बोनस ठरलं. बहुतेक वेळेस पहिल्यांदा घाईत म्हणा अथवा माहीत नसल्यास अशा काही महत्त्वपूर्ण अवशेषरूपी गोष्टी राहून जातात नंतर पुढच्या भेटीत त्या आवर्जून पहायला हवं, अगदी भोरांडेदार ट्रेक वेळेस माझे त्या वाटेवरील पाण्याची टाकी भर पावसात पहायची राहून गेली नंतर दुसऱ्यांदा मुद्दाम पुन्हा जात ते पाहून आलो. हे समाधान काही औरच.. असो. 
 
घाटाच्या या कातळ टप्प्यात अनेक ठिकाणी पडझड व ढिगारा खाली दडलेल्या दगडी घडवलेल्या शिळा व पावठ्या दिसतात. हे सारं पुरातन वहिवाटेचे साक्षीदार. वीस पंचवीस मिनिटे उतरल्यावर नाळेतून बाहेर येत उजवी मारली. 
आता वाट टप्पा टप्प्यात उतरू लागली. या भागात कारवी तसेच ऐन, हिरडा व ऊंबराची गर्दी हा झाडोरा सुखावह पण हल्ली वाढलेल्या गर्दीमुळे असावे कदाचित तो वाटेवरचा अतिप्रमाणात कचरा मात्र खटकला. ऐके ठिकाणी मनोज ने एक वनस्पती दाखवली, त्याच्या खोडातले वा देठात असलेले पाणी पितात. त्या वनस्पतीला ही गावातली मंडळी माकडपेवा म्हणतात. मला तरी त्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव माहीत नाही. 
फोटो पाहून जाणकारांनी प्रकाश टाकावा. भर उन्हात माकडं पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना यातील पाणी पितात म्हणून गावकरी तरी माकडपेवा म्हणतात. मी स्वतःच ते देठ चावत पाणी प्यायलो अगदी पाण्यासारखी चव, खरंच निसर्गातील चमत्कार... असो.. 
 
आधी म्हणालो तशी वाट धारेच्या अल्याड पल्याड करत उजव्या बाजूने उतरू लागली. निम्म्याहून अधिक उतराई झाल्यावर उजवीकडे करपदरा घाटाची वाट गेली https://ahireyogesh.blogspot.com/2022/02/karapdara-umbardara.html 
 
तसेच पुढे जात घाटातील बारमाही पाण्याचा स्रोत असलेल्या ऊंबराच्या पाण्याजवळ आलो. स्वच्छ पाणी पिऊन फ्रेश झालो छोटा निवांत ब्रेक हवा होता, सोबत तांबट पक्ष्याचा आवाजामुळे तो माझ्या कायम लक्षात राहील. वर लिहले त्या प्रमाणे आधी जेव्हा सादडे घाट उतरलो होतो तेव्हा या ऊंबरापासून डावीकडे गेलो होतो वाट चूकत मोठा ओढा पार करत बराच वेळाने मुख्य वाटेला लागलो होतो. थोडक्यात ट्रेकर्स ने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी घाट उतरताना कुठेही डावीकडे जायचे नाही. कायम उजवीकडे राहत मुख्य धारेवरील मळलेली वाट सोडू नये. या दक्षिणायन मध्ये दिवसमान लहान होते, अंधार पडायच्या आत आम्हाला रानातून बाहेर पडणं गरजेचं. झटपट पावलं टाकत एकदाचा उतार संपवत माळरानावर आलो. 
मागे वळून पाहिलं तर सादडे घाटाच्या खिंडीत मावळतीचे सोनेरी किरणं पडली होती. शेतातून वाट काढत आल्यापावली बेलपाडा गाठले. 
पुन्हा एकवार सह्याद्रीचा पॅनोरमा डोळ्यात व मनात साठवत दमदार ट्रेकची सांगता केली.

                                      योगेश चंद्रकांत अहिरे 


No comments:

Post a Comment