रोहिदास
हरिश्चंद्रगड समीप असलेला, काळभैरव उर्फ रोहिदास ट्रेक बर्याच वर्षापासून पेंडिंग होता. वेळ काळ येण जाण,तिथली विविध ऋतू मधील भौगोलिक परिस्थिती अशी अनेक कारणे होती. शेवटी यंदाच्या १ व २ फेब्रुवारी योग जुळून आला. सोबत होता जुना ट्रेक भिडू झेनोश पटेल..

काळभैरवचे त्रिशूळ व शिवपिंड असलेले देवाचे ठाणे अंदाजे साडेतीन हजार फुट उंचीवर...
स्वच्छ हवेत तिथून दिसणारा चौफेर नजारा, समोरच महाकाय हरिश्चंद्रगड त्याचे उंच तारामती शिखर व भव्य कोकणकडा तसेच ईतर अनेक सह्यसोबती.. याच अनोख्या दृश्यासाठी केला तो पाठीवर दोन दिवसाचे दगडी ओझे वाहत अट्टाहास.......... खिरेश्वर गाठेपर्यंत दुपार झाली. जेवण करून अल्प विश्रांती घेऊन पाठीवर सॅक चढवली. मुक्कामी सामान सोबत तंबू आणि महत्वाचे म्हणजे अतिरिक्त पाणी साठा. बाळू आणि मनोज दोघांनी, कॅम्प साईट वर अजिबात पाणी मिळणार नाही असे सांगितलेच होते. ग्रीष्माच्या सुरुवातीस लहान छोटे पाण्याचे स्रोत कडक उन्हामुळे आटून जातात. त्यामुळेच पाण्याची तजवीज करणे भाग. माणशी चार लिटर पाणी सोबत एक वेगळी सॅक फक्त पाण्यासाठी घेतली त्यात अंदाजे बारा लिटर पाणी. अशी वेगळी सॅक वाहून नेण्यासाठी आम्ही सह्याद्रीत पहिल्यांदाच (पोटर) भारवाहू गडी घेतला. तिघांचे सॅक वजन अदमासे चौदा पंधरा किलो सहज. भर दुपारी उन्हात चालणं सुरुवातीस जड गेले. डोंगर जवळ आल्यावर पायथ्याशी सावली मग चांगली लय गवसली. कळशा डोंगराच्या दिशेने थोडक्यात हरिश्चंद्रगडावर जाणारी जुन्नर दरवाजाची वाट धरायची. झाडी भरल्या वाटेने अस्ते कदम चढाई वाटेत दोन तीन ठिकाणी कोरीव पावठ्या कधी काळी राजमार्ग असल्याची साक्ष देतात. नऊ वर्षांपूर्वी पहिल्यांदा जुन्नर दरवाजाने केलेली चढाई आठवली. आडवं मारत वरच्या टप्प्यात आलो, खाली खिरेश्वर गाव लहान मोठी घरे, वाडी, शेताचे तुकडे तर मोठा पसरलेला पिंपळगाव खुबी धरणाचा फुगवटा त्यापल्याड माच,कारकाई,निरोळी,मानखंदा ते रांजणा पर्यंतची डोंगर रांग. पाऊणतासाच्या चाली नंतर नेढेच्या दिशेने गेलेली जुन्नर दरवाजाची धारेवरची वाट सोडून डावीकडे वळून भातखळा नामक सपाटीवर आलो. इथवर खिरेश्वर भागातील अनेकांचे लाकूड फाटीमोळी गोळा करण्यासाठी येजा असते. आता पर्यंत चालताना आमच्या उजवीकडे खिरेश्वर कडील भाग दिसत होता आता भातखळयापासून पुढे माळशेज व काळूचे खोरे दिसू लागले. डावीकडे दरी तर उजवीकडे कडा अशी चाल. काही अंतर जाताच खालच्या टप्प्यातील प्रसिद्धी पावलेली आडराई व तेथील सुरेख जंगल. ढोबळ मानाने सांगायचे झाल्यास आम्ही थेट गडाचा बालेकिल्ला ते तारामती शिखराच्या खालच्या पातळीतून आडवं जात होतो. तर आमच्याच वाटेला खाली समांतर प्रसिद्ध अशी आडराई. दोन्ही वाटेवर जंगल असे खासच. ऐके ठिकाणी बालेकिल्ल्याच्या घळीतून येणारा बारीक वाहती धार असणारा ओढा लागला. बऱ्याच कालावधी नंतर पाणी बघून हायसे वाटले. सॅक ठेवत खाली उतरून गेल्यावर चांगले पाणी मिळाले. चव पाहता थोडी गडबड वाटली पण तरीही दोन रिकाम्या बाटल्यात भरून घेत रात्रीच्या चहा व जेवणासाठी वापरायचे ठरवले. त्याचा पुढे खरंच फायदा झाला. दोन तीन ठिकाणी लहान मोठे घसारा आणि झाडी भरल्या वाटेने वर खाली करत मोकळवनात आलो. आता सुरु झाली ती पिवळ्या गवताच्या पठारावरून आडवी सपाट चाल. उजव्या हाथाला हरिश्चंद्रगडाची बाजू तर डावीकडे कडा. डावीकडून तावलीची वाट येऊन मिळाली. तीन वर्षांपूर्वी केलेल्या तवलीची नाळ व थितबी उर्फ रोहिदास नाळ या ट्रेकची आठवण आली. तेव्हाही आडराईचे खालच्या पट्टीतले जंगल पाहून भारावलो होतो. थितबीची नाळ तर बहुतांशी झाडोरा असलेली दोन्ही वाटांचा सोबत शेंडी सुळका ट्रेक खासा जमून आलेला. ऊन सौम्य होत सांयकाळची चाहूल लागत सावल्या लांबू लागल्या. मजल दरमजल करत मोठा वळसा घेत रोहिदास शिखर व शेंडी सुळका सामोरे आले. काही अंतर जात ओढा अर्थातच कोरडा, तिथेच मोकळी जागा पाहून कड्या नजीक मुक्कामाची जागा. सूर्य मावळतीस झुकू लागला अंधार पडायच्या आतच दोन तंबू लावून टाकले. घड्याळात पहिले तर खिरेश्वर सोडून इथवर यायला आम्हाला निवांत रमत गमत साडेतीन तास लागले. अंदाजे सात किमीची सौम्य चढ उतार जास्त करून सपाट चाल. ओझे उतरवत सामान ठेऊन फ्रेश झालो. पहिले काम अशा वेळेस चहा हवाच. झेनोशनं ते काम हाथी घेतले. कातरवेळी त्या आजू बाजूच्या पसरलेल्या गूढ वाटणाऱ्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर मावळतीचा वारा झेलत तो चहा पिणं अमृततुल्य, खरंच तन मनात एकदम तजेला आला. जसा अंधार पडायला सुरुवात झाली तसे वेगेवेगळे पक्षी व प्राण्यांचे आवाज येऊ लागले. भले मोठे सांबर तर चक्क नजरेस पडले. पण फोटो घेणार तेच मोठ्या चपळाईने रानात फरार झाले. हरिश्चंद्रगड परिसरात अजूनही चांगली वन पशुसंपदा टिकून आहे हे फार आनंददायी. सारं असेच वाढत राहावे हीच इच्छा. चूल मांडली पोटपूजा मग शेकोटी. रात्रीचे माळशेज घाटातील दूरवर गाड्यांचे लुकलुकणारे दिवे तर एकीकडे आकाशात पसरलेला चांदण्यांचा सडा. गूढ निर्जन रानात सारे काही विलोभनीय. अशा वातावरणात दिवसभराचा क्रम आठवत पाठ टेकली. पक्ष्यांचा किलबिलाट थोडक्यात अशा नैसर्गिक मॉर्निंग अलार्मनेच जागा झालो. पुन्हा एकवार फर्लांग भर अंतरावर सांबर. जंगल बोलते खास करून सकाळी व सायंकाळी याचा अक्षरशः आम्ही अनुभव घेत होतो. कोवळी किरणे रोहिदास उर्फ काळभैरव वर पडू लागली. चहा नाश्ता उरकत सॅक पाठीवर घेऊन चालू पडलो. काहीशी संथ चाल मग चढण पुढे वाट रानात शिरून थेट शेंडी सुळका, रोहिदास नाळ व रोहिदास शिखर याच्या तिठ्यावर आली. पाण्याचे वाटप करून, सॅक मोठ्या झाडीत लपवून पिट्टू घेऊन रोहिदासच्या वाटेला लागलो. शेंडी सुळका आणि रोहिदास यात मध्ये एक जोडलेली टेकडी आहे. याच टेकडीच्या पायथ्यापासून आडवी अरुंद पायवाट पकडली. काही अंतर जात बरोबर रोहिदासच्या पायथ्याला असलेल्या लहानश्या सपाटीवर आलो. इथवर कुणी मुक्काम केल्याच्या खुणा, अर्धवट जळालेली लाकडे व अस्तव्यस्त पसरलेलं प्लास्टिक. दाट झाडीतून वर तिरकी चढाई, अधेमध्ये प्रचंड घसारा, तोल सावरत छोटासा कातळ टप्पा पार करून धारेवर आलो. आता होती ती थेट रोहिदास शिखरावर जाणारी निमुळती धारेवरची तीव्र चढाई. सावकाश अस्ते कदम जात शिखरावर दाखल झालो. आजूबाजूला खुरटी झाडी व मधोमध पाच पंचवीस माणसे मावतील इतपत मोकळी जागा. एका शिळेवर कोरीव शिवलिंग, समई, दिवा पणती, दहा बारा त्रिशुळ व लहान घंट्या. दुर्गम डोंगरावरील त्या निसर्गातील काळभैरवाला नमन केले. अगदी मोक्याच्या जागेवरून भवताल दिसणारे दृश्य केवळ लाजवाब. गोरख मच्छिन्द्र पासून ते भैरवगड नाणेघाट, दौंड्या, भोजगिरी ते गुण्या, उधळ्या मागे निमगिरी हडसरचा भाग, समोर सिंदोळ्या ते पार हटकेश्वर. उत्तरेला नाफ्ताची शिखरे, घाटावरचा कलाडगड ते मुडा, गवळदेवची शिखरें. सोबती हरिश्चंद्रगडाचा देखावा काय वर्णांवा उत्तुंग तारामती शिखर, भेदक कोकणकडा, माळशेज व काळू खोरं तर कोकणातील वालिवहरे, केळेवाडी, वाघाची वाडी इ. लहान लहान गावं खेडी. बराच वेळ हे सारं निःशब्द होऊन पाहतच राहिलो. कितीही रम्य वाटलं तरी निघणं आलंच. सावधगतीने उतराई करत पुन्हा सॅक पाशी आलो. येताना वाटेत रोहिदास नाळ पाहून झेनोशचा तिथून उतरायचा आग्रह पण वेळ आणि लॉजिस्टिक पाहता हा सारा अवघड मामला. पुढील वेळेस हवेतर या नाळेने चढून मग माकड नाळेतून उतरू असे सांगत कसेबसे त्याला पटवून दिले.
शेंडी सुळक्यापाशी जात कोकणकडा न्याहाळत फोटोग्राफी उरकली. कॅम्प साईट वर परतलो तेव्हा ऊन चांगलेच जाणवू लागले. कॅम्प साईट ते रोहिदास जाऊन येऊन आमचे सहा किमी झाले तसेच आठशे फुटाची चढाई उतराई. आता पुन्हा कालच्याच मार्गाने खिरेश्वर गाठणे हेच उद्दिष्ट्य. पहिला सारा मोकळा उघडा भाग भर उन्हात सॅक घेऊन पण सांगणार कुणाला ? तसेही रोहिदास शिखर यशस्वी पूर्ण केल्याच्या भावनेत ते ओझं काही वाटत नव्हते. हीच तर ट्रेकची आणि ट्रेकर्स मंडळींची गंमत असते अधे मध्ये सावली पाहत थांबत सुका खाऊ चणे बेदाणे संत्री व सर्वात महत्वाचे म्हणजे पाण्याचे योग्य वापर नियोजन करत खिरेश्वरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास परतलो. बाळूच्या घरी निवांत गप्पा आराम करून, खिरेश्वरातून निघालो तेव्हा धरणाच्या भिंतीवरून गाई गुरं घराकडे परतत होती. आम्ही सुध्दा सह्याद्रीतून तृप्त समाधानी चित्ताने घराकडे निघालो. घाटात पुन्हा पुन्हा नजर रोहिदासवर भिरभिरत होती. बऱ्याच दिवसांची इच्छा यंदा पूर्ण झाली. निवडक फोटो : झेनोश पटेल
योगेश चंद्रकांत अहिरे
No comments:
Post a Comment