Friday, 29 November 2024

Sakira Kalsubai


                          सकीरा आणि कळसुबाई 

          यंदाच्या सीमोल्लंघनचं आमंत्रण प्रितीकडून आलं.
ठिकाण ठरले 
महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट... 
शिखरसम्राज्ञी ... 
शैल कळसुबाई... 
          बारी गावातून कळसुबाई गेलो होतो २००३ साली, त्यानंतर जाणं झालेच नाही. त्यावेळेस मार्च का एप्रिल महिना होता,  वसंत जात ग्रीष्माची चाहूल लागलेली. यंदा मात्र अश्विन महिन्यात हिरवीगार बहारदार डौलदार डोंगराची रूप पहायला मिळणार मग नकार द्यायचा प्रश्नच नाही. 
       रात्री दोनच्या सुमारास आंबेवाडी पासून काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी गाडी पार्क करून गाडी मध्येच झोप काढली. प्रितीने संपर्क साधल्याप्रमाणे सकाळी ठरल्याजागी मामा हजर झाले. 
गारेगार वातावरणात शेतं बांधावरून जात डोंगररांग जवळ करू लागलो. इगतपुरीच्या साधारण दक्षिणेपासून ईशान्येस कुलंग मदन अलंग किर्डा सकीरा कळसुबाई बितनगड पट्टा औंढा अशी मातब्बर दुर्ग व शिखरांची मंदियाळी. ऊंची बहुतेक ठिकाणी चार हजार फूट हून अधिक तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर + साडेपाच हजार फूट. पाऊण तासाच्या सपाट चालीनंतर तीन चार घरांची अगदी डोंगराच्या कुशीत असलेली वस्ती लागली. 
सोबत असलेल्या मामांचे घर इथलेच. भावली कुरूंगवाडी ते वासळी फाटा हमरस्त्यावरून आतमध्ये किमान अर्ध्या तासाची यांची रोजची पायपीट. पण लोकेशन अगदी खासच कुणीही मोहात पडावं असेच. चहा पाणी घेऊन चालू पडलो.  
पार डोंगराच्या आतवर शेती केलेली ती भात रोपं छान डुलत होती. सुरूवातीस अर्ध्या तासातच एका टेपाडावर आलो. उजवीकडे पदरात पण भातशेती व दोन एक झाप. 
        याच बाजूने आंबेवाडी कडील वाट सकीराच्या, थोडक्यात आम्ही होतो त्या वाटेला येऊन मिळाली. डावीकडे वळून छानसा धबधबा, आम्ही त्याच्या वरच्या टप्प्यातील डोहा जवळच थांबा घेतला. 
सकाळची कोवळी सुर्यकिरणे, काळाकुट्ट बेसाल्ट कातळ, थंडगार असे डोहातून खाली झेपावत जाणारे पाणी, अधूनमधून कानावर पडणारी पक्ष्यांची गुंजन सारा माहौल भारीच. 
लगेहात वेळ न दडवता मी डोहात डुबकी मारून घेतली. खरंच एकदम प्रसन्न व टवटवीत.. थोडाफार जागरणाचा शिणवटा होता तो अंघोळीनंतर या रम्य वातावरणात कुठच्या कुठे पळून गेला. सकीरा व कळसुबाई या मध्ये मोठी नाळ, त्याच नाळेतून खिंडीच्या रोखाने चढाई. ट्रेक सुरू केला तेव्हा डावीकडे दूरवर दिसणारी कळसुबाई आता दिसेनाशी झाली. मधला जंगलटप्पा पार करून नाळेत आलो. वस्तीपासून इथवर यायला आम्हाला दिडतास लागला. डोंगर दिसतात जवळच पण जसे आपण पुढे येतो तसे ते अजूनच दूर जातात याचा प्रत्यय इथे आला. आम्ही गपगुमान चालत होतो पण वातावरण अनुकूल असल्याने त्रास असा नाहीच. 
नाळेच्या सुरूवातीस झाडोरा व मोठ मोठ्ठाले दगड धोंडे या बद्दल तर काही सांगायलाच नको. काही ठिकाणी मोठे पॅच होते पण मामा डाव्या तर कधी उजव्या बाजूने आत शिरत ते बायपास करायचे. नुकतीच नवरात्र दसरा होऊन गेल्याने वाट काहीशी मळलेली खडकेद, आंबेवाडी तसेच डोंगर पायथ्याच्या आत वसलेल्या लहानसहान वाडी वस्तीतील लोकं नवरात्रात कळसुबाई च्या दर्शनास याच वाटेने येजा करतात. बहुदा त्यामुळेच वाटेवर अधेमधे कचरा आढळून आला. जसे ऊंची गाठू लागलो तशी नाळ अरूंद होत चढ तीव्र होऊ लागला. 
मोठ्या धोंड्यावर तोल सांभाळत कसरत करत माझा वेग कमी झाला, प्रिती यज्ञेश व मामा पुढे निघून गेले. सध्या माझं वाढलेले वजन त्यात टाचेवर ताण येत पुन्हा दुखणं वाढेल की काय असे वाटून गेले ! मी आपला संथ गतीने चालू लागलो. सद्यस्थितीत एक बाब लक्षात आली, दिवसभर मी माझ्या गतीने चढाई उतराई करू शकतो पण कुणाची बरोबरी करत वेगात जाणं किंवा पळणं तूर्तास तरी मला शक्य नाही. हल्ली बहुतेक ट्रेक सोलो होतात, सहाजिकच मी एकटा व माझा ठरलेला वेग हेच गणित मानसिक व शारीरिकदृष्ट्या फिट्ट  बसलेले. असो... 
      नाळेत बहुतेक ठिकाणी वाहतं पाणी त्यात बारीक पिटुकले लाल रंगाचे खेकडे भरपूर. येत्या काही दिवसात पाऊस बंद झाल्यावर हेच खेकडे पुढच्या पाऊस येईपर्यंत खाली भूमिगत होणार खरंच कसे हे पुढचे आठ नऊ महिने गुजराण करत असतील ? काय निसर्ग आहे सारंच चमत्कारिक.असो..
          जवळपास दोन तासानंतर वाट नाळेतून डावीकडे वळत कारवीतून छोटा टेपाडवजा चढ संपवून अरूंद डोंगर धारेवर आली.  डावीकडे नजर जाताच कळसुबाई शिखर हाकेच्या अंतरावर तर उजवीकडे सकीरा चा माथा झाडी पल्याड लपलेला. आम्ही सकीरा च्या दिशेने उजवी मारली. गच्च रानातून मळलेली वाट पठारावर घेऊन आली. 
पठारावर रानफुलं मोठ्या प्रमाणात पसरलेली त्यात सोनकीचा वाटा सर्वाधिक. दोन बारीक ओढे पार करत सकीराचा समीट दिसू लागला. 
वाटेत उडदावणे पांजरे कडे वळसा घेत उतरणारी वाट सोडून सरळ गवतातून वाट काढत सकीरा वर दाखल झालो. 
जीपीएस चेक केले सकीराची ऊंची ५२२४ फूट दाखवली, वेळ पाहिली तर एक वाजलेला. मामांच्या वस्तीपासून सकीरा माथा गाठायला पाच तास लागले. वातावरण स्वच्छ असल्याने फार दूरवर नजर जात अनेक गिरीदुर्ग सहज ओळखू आले. 
खाली दक्षिणेस पूर्ण क्षमतेने भरलेला भंडारदरा जलाशय त्या पलीकडील घनचक्कर कात्राबाई रतनगड ते आजोबा शिपनूर तसेच त्यापलीकडे हरिश्चंद्रगड पासून ते माळशेज भागातील दौंड्या ढाकोबा पर्यंत. पश्चिमेकडील कुलंग मदन अलंग व किर्डा. 
दोन वर्षांपूर्वीच किर्डा आम्ही आंबेवाडीतून केला होता त्या आठवणी जाग्या झाल्या खरंतर या परिसरातील अनेक ठिकाणी जाऊन आलेले ट्रेक मला आठवले. सकीराचा माथा तसा लहानच, फोटोग्राफी करून जेवणाला बसलो. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ट्रेक चा उत्तरार्ध सुरू झाला. सकीराच्या माथ्यावरून खाली उतरत पठारावरून माघारी येत पुन्हा वाटेच्या जंक्शन वर आलो. आता सरळ धारेने कळसुबाई शिखर. तीव्र चढाई काही ठिकाणी नव्यानेच लावलेले लोखंडी रेलींग. 
चढाई मग आडवा ट्रेव्हर्स जंक्शन पासून अर्ध्या तासात शिखरासमीप आलो. सध्याची भाऊगर्दी पाहून हैराण झालो. पलीकडे बारीहून हि सारी मंडळी येतात. 
पूर्वी आलो होता तेव्हा शिडीच्या पायथ्याशी एक विहीर पाहिल्याचं आठवते पण यंदा आजूबाजूस थाटलेल्या झोपडी टपरीत मला तरी ती विहीर कुठेच दिसली नाही. शिडी चढत माथा गाठला ऊंची चेक केली ५५१४ फूट समुद्र सपाटीपासून.. 
           ट्रेक सुरू केला तेव्हा आम्ही आंबेवाडी परीसरात २७०० फुटावर होतो. थोडक्यात आज आमची २८०० फूटाहून अधिक चढाई झाली होती.
  गर्दीतून थोडं बाजूला जात चौफेर नजर फिरवली, स्वच्छ वातावरणात उतवड,  डांग्या, हरिहर, त्र्यंबक रांग समोर कावनई, त्रिंगलवाडी, मोरधन पासून ढेहेर, रामशेज, आड, औंढा, पट्टा, बितन, चेमदेव, पाबर, रतन ते हरिश्चंद्रगड आजोबा पर्यंत अफाट पसारा. 
पायथ्याची लहान खेडी वाड्या रस्ते ओढे नाले घरं शेतजमिनीचे तुकडे सारं काही अगदी आखीव रेखीव चित्र काढल्यासारखे. निळ्या आकाशात पांढरेशुभ्र ढग संचारत असता अचानक काही मोठे काळे ढग दाटून आले व दहा पंधरा मिनिटात जोरदार पावसाची सर आली. आतापर्यंत ऑक्टोबर हिट ने घामटा काढलेला पण या सरीने सारं वातावरण क्षणात गार करून टाकलं. भणाणून सोडणारा वारा त्यात पाऊस अक्षरश: हुडहुडी भरली. झटपट कळसुबाई चे दर्शन घेत शिडी उतरून सपाटीवर आलो. 
          आमची उतराई ठरली होती इंदौरे च्या वाटेने, कळसुबाई शिखराची एक भली मोठी सोंड उत्तरेला झेपावली आहे त्या सोंडेच्या उतरत्या भागात तीन घळी आहेत त्यातील बरोब्बर दुसर्‍या घळीत कातळकोरीव पायर्‍या आहेत तीच होती आमची वाट.
कळसुबाई हे या भागातील सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी व ठाकरांचे दैवत त्यामुळेच पंचक्रोशीतील हि अनेक लोकं श्रध्देने इथे नियमित भेट देतात. दरसाल नवरात्रात दर्शनाला हि आजूबाजूच्या बारी, इंदौरे, खडकेद, आंबेवाडी, उडदवणे, पांजरे, घाटघर गावातील मंडळी. सहाजिकच इथवर यायला बारीहून शिडीची वाट, इंदौरे कडील वाट, आम्ही आलो ती आंबेवाडी सकीराच्या खिंडीतून वाट, उडदवणे पांजरे कडील वाट अशा चार पाच वाटा प्रचलित आहेत. पावसाने उघडीप दिल्यावर उतराईला लागलो.
        खालच्या पातळीवर येत आडवी मारत भल्या मोठ्या पठारावर आलो या भागात पण रानफुलांचा बहर. जसे पुढे जाऊ लागलो मागे कळसुबाई शिखर अगदी साल्हेर च्या गादी पठारावरून परशुराम दिसते अगदी तसेच दिसत होते. 
वाटेत ऐके ठिकाणी शेंदूर फासलेले कोरीव शिल्प, बाजूला हारफुलं नारळाच्या करवंट्या व काही लहान मडकी. निसर्गातील देवाला मनोमन वंदन करत चालत राहिलो. झालेल्या पावसामुळे आकाश पुन्हा निरभ्र होऊ पाहत होते. 
सर्वात छान दृश्य म्हणजे खाली दरीत अडकलेले काही ढगांचे पुंजके, हिरव्यागार पार्श्वभूमीवर ते कापसासारखं भारीच दिसत होतं. देवावर श्रध्दा असणं ही एक बाजू पण त्याहून कणभर अधिक श्रध्दा माझी या निसर्गावर या रमणीय परिसरावर. दरवेळेस काही तरी नव्याने उमलतं पण समाधान काही होत नाही. अशीच अनेक रूपं अनुभवायला पुन्हा पुन्हा पावलं घराबाहेर पडतातच. 
वाट एका कड्यापाशी घेऊन आली, खाली पाहिलं तर कोरीव पावठ्या. 
काहिसा एक्स्पोजर असलेल्या भागातील निसरड्या झालेल्या पायरा वरून सावकाश उतरत वळसा घेत डावीकडे वळालो. या टप्प्यातील उतराई वर वर्णन केल्याप्रमाणे घळीच्या वरच्या भागात आलो. दुसर्‍याच घळीतील झाड ही खूण समजू शकतो. 
वीस पंचवीस पायर्‍या उतरत दोन वाटा फुटल्या, उजवीकडील वाट पहिल्या घळीला ट्रेव्हर्स मारून बारीच्या वाटेला मिळते तर आम्ही डावीकडील ट्रेव्हर्स मारत इंदौरे च्या वाटेला. बहुतेक ठिकाणी कातळात शेवाळं, चिकणमाती व तीव्र उतार तोल सांभाळत एक एक जण उतरत होता. 
हा भाग पार करताच झाडीत वाट शिरली. सांगायचे झाले तर झिग झॅग.. झेड.. अक्षराची वळणं घेत जाणारी वाट. मजल दरमजल करत सपाटीवर आलो इंदौरे व खडकेद दोन्ही नजरेच्या टप्प्यात. आता काय आलं पोहचू लवकरच पण काही अंतर गेल्यावर अंदाज आला दिसतं तितके जवळ नाहीये. पुन्हा खालच्या पातळीत उतरत बरेच अंतर गेल्यावर शेती आली. शेती आली म्हणजे गाव तिठा आलाच की. पण इथेही अंदाज चुकला, 
आणखी खाली उतरून झाडीचा टप्पा पार केल्यावर इंदौरे च्या वाटेवरील कळसुबाईचे मंदिर लागले. अगदी असेच मंदिर बारीच्या वाटेवर जहांगीरवाडी मध्ये आहे. हि दोन्ही मंदिरे बर्‍या पैकी खालच्या बाजूस आहेत जे अबालवृद्ध वर जाऊ शकत नाहीत ते इथे येऊन दर्शन घेतात. 
मंदिर परिसरात छान झाडी बाजूलाच अनेक पुरातन शिळा आणि विरगळी. सहा वाजत आलेले, अगदीच छोटासा ब्रेक घेऊन निघालो. दोन वाटा त्यातील उजवीकडील इंदौरे तर डावीकडील खडकेद, सोबतच्या मामांचे नातेवाईक तिथेच रहाणारे. आम्ही साडेसहाच्या सुमारास खडकेद मध्ये दाखल झालो. सात वाजता सुरू झालेला ट्रेक साडेसहा वाजता खडकेद मध्ये पूर्ण झाला. 
थोडक्यात साडेअकरा तास आम्हाला रमतगमत लागले.
मामांनी नातेवाईकांच्या मदतीने मला मोटारसायकल वर आंबेवाडीत सोडले तिथून मी गाडी घेऊन पुन्हा माघारी प्रिती व यज्ञेशला घ्यायला खडकेद ला आलो. प्रितीने काही भेट व उपयुक्त वस्तू मामांना दिल्या, कृतज्ञतेने आम्ही त्यांचा निरोप घेतला. 
आंबेवाडी २७०० फूट
सकीरा खिंड ४८५८ फूट
सकीरा टाॅप ५२२४ फूट 
कळसुबाई टाॅप ५५१४ फूट
खडकेद २४४६ फूट  
कळसुबाई श्रध्देने पुजले जाणारे दैवत.
पण या कळसुबाई चे भौगोलिक स्थान माहात्म्य पहाता ते कधी काळी संरक्षण वा लष्करीदृष्ट्या मोक्याचं छोठे ठाणं वा टेहळणीवजा असू शकेल काय ? कारण एकच इथून नजरेत येणारा विशाल अफाट भवताल.. अशीच उत्तरं शोधत परतीच्या वाटेवर लागलो.

                                                         योगेश चंद्रकांत अहिरे 

2 comments: