Thursday, 14 November 2024

Siddhagad


                                   सिध्दगड

हल्ली तसे लिखाण काहीसं कमीच होते. एकेकाळी ब्लाॅग पोस्ट लिहायला उत्साह असायचा आता कमी होऊ लागलाय. तसेच खास करून नवीन जुने हौशी मंडळींचे लिखाण वाचायला मिळायचे. हल्ली मात्र रिल्स, फोटो व्लाॅग, चॅनेल इतर अनेक नवनवीन प्रकार येत आहेत व येत राहतील यात एक गोष्ट जाणवली ती म्हणजे वाचन आणि लिखाण लक्षणीय रित्या कमी झालंय. "कालाय तस्मै नम:" असो... 

    असाच एक ड्राफ्ट मोड मध्ये असलेला चार पाच वर्षांपूर्वी केलेल्या सिध्दगडाचा अगदी छोटासा वृत्तांत. सुनीलने पुढाकार घेतल्याने किल्ले सिध्दगडचा बेत ठरला. शिवतीर्थ रायगडावर जाऊन येऊन चार दिवस होत नाहीत तर लगेच हा ट्रेक. पण सिध्दगड भिमाशंकर परीसरात प्रचलित घाटवाटांची अनेकदा भटकंती झाली. खुद्द सिध्दगड चार पाच वेळेस जाऊन दरखेपेस काही ना काही निमित्त वा कारण बालेकिल्ला राहूनच जायचा, त्यामुळेच आता माघार नाही. भल्या सकाळी पहिला ब्रेक लागला तो जांभुर्डे फॉरेस्ट चेक नाक्यावर. 

भिमाशंकर अभयारण्य...

   भरपूर विनंती मस्का पॉलिश करूनही चौकीवाला सोडायला तयार होईना.  

अखेर आम्हीपण कायद्याचे पालन करत, त्यांची आज्ञा पाळत गाडी बाहेरच ठेवून अकरा नंबर ने पाऊण तासात बोरवाडी गाठली. इथून निसणी ऊर्फ डेर्या घाटाची ऊभी चढणीची कातळ टप्पे असणारी वाट, तासाभराच्या आत पदरात नेते. 


वळसा घेत सिध्दगडवाडी उर्फ रेवणीत. रेवणी हे तहसील दरबारी असलेले नाव, मोजून पाच ते सहा घर राबती. 
 बंद पडलेल्या शाळेजवळून वर जाणारी वाट धरली. सुरूवातीचा रानवा सुखावणारा, जोडीला माझा फेवरेट तांबटची सुरेल साथ. 
काही वेळातच धापा टाकत गुहा गाठली. 
पुढे उजवी मारून सुरू झाली ती काहीशी थरारक अशी बालेकिल्ल्याची चढाई. 
सराईत ट्रेकरला मुळीच अवघड नाही. उभी चढण व अनेक घसारा मिश्रित कातळटप्पे. एन्जॉय विथ थ्रील असा मामला. 
गवताळ पूर्व पश्चिम पसरलेला अरुंद अशा माथ्यावर फारसे अवशेष नाहीच. 
 बारमाही शेकडो वर्षांपासून ऊन वारा पाऊस खात असलेले नंदी आणि शिवलिंग, वाड्यासारखे पुरातन बांधकाम, ओळीत असलेली पाच सहा पाण्याची टाकी. 
नंतर चिंचोळ्या वाटेने गाठला तो पूर्वेला असणारा बुरूज. त्या लागून असलेले तटबंदीचे अवशेष व एक लहानसा दरवाजा. 
 कधी काळी येथून वाट होती. कारण त्याच पूर्वेला सिद्धाची लिंगीच्या दिशेने खिंडीतून वर पाहिल्यावर एक कातळकोरीव गुहा व काही पावठ्या दिसतात. मागे एकदा इथून जाखमाता घाटाने उतरताना हे पाहिलं होतं. असो... पण बुरूजावरून समोर सह्याद्रीची रांग फारच भेदक वाटते. उत्तरेला येतोबा साखरमाची पासून गोरख मच्छिंद्र तर दक्षिणेकडील दमदम्या पासून कोंढवळ भिमाशंकर पर्यंतची रांग. थेट पदरगड, तुंगी ते कोथळीगड. ठाणे पुणे आणि रायगड जिल्ह्यातील सीमेवरील हा सातवाहन कालीन बुलंद उत्तुंग किल्ला. येथील गायदरा, ऊंबरा, दारा, रानशीळ, हिरडा या भिमाशंकर परिसरातील अनेक घाटवाटांवर नजर ठेवण्यास उपयुक्त. सारा आसमंत नजरेत सामावून उतराई. 
माचीवरील नारमातेचे देऊळ. त्या परिसरात असलेली पुरातन दिपमाळ काही विरगळी तर काही कोरीव शिल्प. शांत व गर्द रानात वसलेल्या या राऊळात वेगळीच प्रसन्नता लाभते. 
निसर्गातील पुरातन देवतेचे दर्शन घेऊन, मावळतीच्या दिनकरासोबत सोबत परतीच्या वाटेला लागलो. बोरवाडीत पोहचलो तेव्हा दिवेलागण झालेली. गावातील सर काकांनी गेट पर्यंत सोडले तेवढीच तासभराची चाल वाचली. दिवसभराच्या तंगडतोड नंतर ही चाल खरंच जीवावर आली होती. सर काकांचे आभार मानून निघालो. पाठीमागे चंद्रप्रकाशात उजळलेला सिध्दगड निरोप देत होता...

                                                 योगेश चंद्रकांत अहिरे


1 comment: