Wednesday, 16 March 2016

Srushti Farms.


'सृष्टी फार्म'


बरे झाले देवा,What's app  आले.!!
मुक्याने का होईना,
माणसं बोलती झाली.!!
दूरदूर गेलेली नाती,
जवळजवळ आली.!!
मुकी मनं हळू हळू, बोलकी झाली.!!

सर्व मित्र आणि आप्तेष्ट असेच जवळ येऊ दे...
आणि मित्रत्वाचे गोड नाते,
दीर्घकाळ टिकू दे.!!


परवा अचानक हा मेसेज Whats App वर आला आणि खरच थोडा विचार करायला भाग पाडले. दुर गेलेली नाती, दुर गेलेले मित्र, हे खऱय की आजच्या या शहरी ? व्यस्त दिनक्रमामुळे जो तो नुसता सैरभैर पळतोय. कुणाला कुणाकडे जाण्यासाठी बोलण्यासाठी भेटण्यासाठी वेळ आहे ?
         पण याच Whats App मुळे काही नवे जुणे एकत्र आले, हे तर मान्य करावेच लागेल. निदान सकाळच्या Good morning मेसेज पासून स्वत: च्या अस्तित्वाची दखल करून देता येतेच कि. तर मध्येच हलके फुलके, विनोदी- पांचट तर कधी भयंकर तत्ववादी मेसेज फॉरवर्ड होत रहातात.  कुणाला शुभेच्छा देण्यासाठी, आनंद वाटण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी निरोपाची देवाण घेवाण करण्यासाठी असलेले instant messenger. पण याचा उपयोग कसा किती आणि केव्हा करावा हे ज्याचे त्याने सद्सदविवेकबुध्दीने ठरवावे.  असो तर पुरे झाले Whats App पुराण, सांगायचा मुद्दा हा की या Whats App मुळेच आम्ही शाळेतले जुने मित्र आणि मैत्रिणी पुन्हा एकत्र आलो.
          सहा महिन्यांपूर्वी मयुरेश च्या सुपीक डोक्यात हि आयडीया आली. मग काय, याला त्याला इकडून तिकडून, हिला तिला सर्वांना शोधून पकडून वर्गातल्या बहुतांश सगळ्यांना ग्रुप मध्ये घेतले. त्यावेळी ग्रुप मेंबर लिमिट १०० होते ते पण कमी पडेल की काय असे वाटू लागले. मग काय जश्या पिंजर्यात सर्व कोंबडे कोंबडी एकत्र केल्यावर जो परिणाम होईल, तसाच परिणाम ग्रुप वर किंबहुना प्रत्येक ग्रुप मेंबर वर झाला.
सुरूवातीच्या आठवड्यात ग्रुप वर मेसेजचा जो भडीमार झाला, ते पाहुन Whats App चे जनक Brian Acton आणि Jan Koum  पण घेरी येऊन पडले असते. जर मी चुकत नसेल तर मिनिटाला कमीत कमी शे-दिडशे मेसेज सहज पडत होते. कोंबड्यांचा खुराडा आणि ग्रुप यांची अवस्था सारखीच.
           पण त्यात ही एक वेगळाच आनंद होता, तो म्हणजे इतक्या वर्षानंतर जुने वर्गमित्र एकत्र भेटल्याचा. प्रत्येक जण एकमेकाला काय विचारू किती विचारू, काय सांगू किती सांगू या अवस्थेत होता. मोबाईल हाथातून सुटतच नव्हता. एक दुसर्याचे मेसेज वाचून स्वत:शी हसणे, या वर घरात पण वेगळीच शंका येऊ लागली. मग हळुहळु जसा नदीला आलेला पूर ओसरतो तसा हा मेसेजचा जोर ओसरला. पण नित्य नेमाने ग्रुप वर भेटणे सुरूच होते. अशातच मध्ये मित्रांची (मुलांची) पार्टी झाली. पुन्हा भेटीगाठी झाल्या, शाळेतले जुने दिवस आठवले.
           काही दिवसात पुन्हा सर्वांनी एकत्र भेटायचे ठरले, या वेळी मुलींनी पुढाकार घेतला. सहाजिकच कधी, कसे, केव्हा, कुठे अशा अनेक गोष्टींचा ग्रुपवर भडीमार झाला. हो ना हो करत अखेर फेब्रुवारी महिना फायनल ठरला. ठिकाणा वरून पण बरिच कथ्थाकुट झाली. पाच- सातशे मेसेज नंतर 'सृष्टी फार्म' वाशिंद पक्के झाले आणि तारिख ठरली २७ फेब्रुवारी.
आठ दिवस आधी जयेश जो या ट्रिपचा मुखिया होता त्याने वेगळा ग्रुप तयार केला. सृष्टी फार्म, नवीन ग्रुप आणि जयेश याबद्दल आमच्या मंडळाची कोणतीही तक्रार मुळी नव्हतीच, होती ती फक्त सर्वांना भेटायची उत्सुकता. परत शंका - कुशंका, . मेसेज ग्रुप वर भरभरून वाहू लागले. 3 days to go , 2 days to go, few hours to go चा काऊंटडाऊन सुरू. आमचा उत्साही मित्र अजित याला तर आदल्या दिवशी रात्री झोपच आली नाही. अर्थातच हे त्याने नंतर खाजगीत कबुल केले.
    २७ फेबच्या सकाळी, मी, रमेश, अमित, सुदर्शन, जयेश, महेंद्र, अजित आणि डॉ.पातोडे ठरलेल्याजागी जमलो.

आमच्या सोबत ट्रीपला येऊ शकणारी मैत्रिण जयश्री आम्हाला भेटायला आली, या गेट टुगेदर साठी तिने चक्क Monginis चा केक आणून दिला त्या बद्दल तीचे खास आभार. तसेच आमच्या अमितने सुध्दा लेखात नाव छाप या अटीवर सर्वांसाठी वडापाव आणले. तर केक वडापाव भेटीगाठी झाल्यावर, माझ्या आणि जयेशच्या गाडीतून वाशिंदसाठी निघालो.
पल्लवी, कल्पना, सोनाली, सुजाता आणि मनिषा या रेल्वेने वाशिंदला उतरून थेट सृष्टी फार्म वर येणार होत्या.
                      मुंबई नाशिक महामार्गावरून ३० रूपयात पडघा टोल नाका पार करून २० मिनिटात वाशिंद गावाच्या वेशीवर पोहचलो, मग जयेशची गाडी आल्यावर एकत्र निघून पुढच्या दहा पंधरा मिनिटांत सृष्टी फार्म वर दाखल झालो. नेहमी प्रमाणे मध्य रेल्वेच्या गाड्या विलंबनाने धावत असल्या कारणाने मुलींना पोहचण्यास उशिर होणार होता.
         सृष्टी फार्म हे वाशिंदला भातसा नदीच्या किनार्यावर असलेले छोटेखानी रिसोर्ट कम वॉटरपार्क कम फार्म हाऊस . परवानगीचे सर्व सोपस्कार पार पाडून आत गेल्यावर वेलकम ड्रींक्स समोरच हजर अर्थातच आवळा आणि कोकम सरबत. इकडे तिकडे टाईमपास करून चहा नाश्त्यासाठी गेलो, कारण १०:३० नंतर नाश्ता मिळणार नव्हता. सुरूवात केल्यानंतर काही वेळातच मैत्रिणींचे आगमन झाले.
         खऱ सांगायचे तर मी १९९८ नंतर कुणालाच बघितले नव्हते, Whats App चा dp आणि क्वचितच फोटो शेअरींग हीच काय ती असेल चेहरे ओळख.
आणि झालेही तसेच मनिषा ने मला ओळखलेच नाही. जाऊ दे काय फरक पडतोय ! पण चार चौघात तुला ओळखलेच नाही, असे म्हणाल्यावर काय वाटेल ते  विचार करा. तसेही शाळेतली कोणतीही मुलगी मला १७-१८ वर्षानंतर भेटल्यावर लगेचच ओळखेल अशी माझी किर्ती मुळीच नव्हती. ना तर मी विजय माल्या ना कुणी ललित मोदी.
काय म्हणतात ते प्रत्यक्षाहूनी प्रतिभा उत्कट किंवा प्रतिमेहून प्रतिभा सरस, काय ते असेल गोंधळ होतोय असो तर... चहा नाश्ता झाल्यावर जयश्रीने दिलेला केक कापला. काही वेळातच खेळीमेळीचे वातावरण तयार झाले.

सृष्टी फार्म चे मुख्य आकर्षण होते ते रेन डान्स आणि स्विमींग पूल
सहाजिकच पाणी आणि पाय थिरकवणारे संगीत असेल तर पाण्यात उतरण्याचा मोह कुणाला होणार नाहीथोडी पाण्यात मजा... पाण्यात उतरनारी घसरगुंडी.... स्विमिंग पूल मधली धमाल....जयेशचा टॉवेल.....तब्बल दोन अडीच तास पाण्यात धुमाकुळ घातल्या नंतर मस्त पैकी दुपारचे जेवण....
कुणी कोंबडी.... कुणी गोडधोड ....  तर उरलेल्यांनी घासफूस वर समाधान मानून घेतले. त्याच वेळी आमच्या ग्रुपचा संस्थापक मयुरेश चे आगमन, वेळ काढून अर्धा दिवस का होईना पण त्याने हजेरी लावली.
महिला मंडळ

 जेवणानंतर रंगलेल्या गप्पा टप्पा, जुन्या गुरूजनांची आठवण, मित्रांची आठवण, प्रत्येकांचे धम्माल किस्से यात वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही.
आमचा चमु
       पण इतक्या वर्षानंतर एकत्र येऊन जी काही मजा मस्ती केली, ते या कागदावर उतरवणे महाकठिण काम. सरते शेवटी आमच्यातील प्रत्येक जण एक सुंदर आठवण घेऊनच परत गेले असणार यात शंकाच नाही.


अशीच मैत्री राहो !
आपलाच….. योगेश चं.आहिरे

































.


No comments:

Post a Comment