आमची शाळा
फोटो साभार : मयुरेश मेंडकी.
एका सायंकाळी समीर पाटलाचा fb वर मेसेज आला. अरे आपल्या शाळेचा ग्रुप आहे, तुला add करू का ? क्षणाचाही विलंब न लावता लागलीच होकार दिला. मग काय बर्याच वर्षानंतर शाळेतले जुने मित्र भेटले. खऱच शाळेतील दिवस फार मजेचे होते. सरकन डोळ्यासमोर काही आठवणी तरळल्या.
एकच प्रश्न पडला, एवढ्या वर्षानंतर शाळा का आठवली ?
लगेच त्या नंतरच्या विकेंडला शाळेजवळ मुद्दाम एक चक्कर मारून आलो. खऱ सांगतो मला शाळा फारच छोटी वाटली. का ? कदाचित आपण मोठे? झालो म्हणून की या मल्टीप्लेक्स, मॉल च्या जमान्यात बाहेरचे जग जवळून बघत आहोत म्हणून? काही का असेना,जीवनातले प्राथमिक धडे जिथे गिरवायला शिकलो, ती शाळा आपली शाळा छोटी असूच शकत नाही....
मॉन्टेसरीतल्या त्या सावरकर बाई ज्यांनी हाथात पाटी पेन्सिल धरायला शिकवले. तो मिळणारा खाऊ, ती खेळणी.
प्राथमिक वर्गातल्या मोडक बाई, दांडेकर बाई, काय ते आपण म्हणायचो 'एक साथ नमस्ते' असच काहीतरी. अडसुळ बाईंनी पुढाकार घेऊन ठरवलेली ई.४थी मधली शिवनेरी सहल आजही आठवते.
पाचवीत आल्यावर पहिल्यांदाच भेटल्या त्या विद्या जोशी. आता आम्ही secondary students झालो होतो. पाचवीचा वर्ग नुकताच तयार झालेल्या नविन ईमारतीत होता.
शाळेत तसा पट्टी, धपाटे, कधीतरी खडू फेकून मारत असत, असा सर्व प्रकारचा मार खाल्ला. गृहपाठ? त्यातल्या त्यात निबंध वही ही माझी कधीच पुर्ण नसायची, मग काय सरळ वर्गाबाहेर तरी निर्लज्ज पणे खिदळत बाहेर उभे रहाणे. अभ्यासातही मी तसा यथा तथाच होतो. फस्ट क्लास मला कधी मिळालाच नाही. अगदी जसा लोकल ट्रेन चा सेंकड क्लासचा डब्बा तो मी कधीच सोडला नाही.😃
आमच्या जवळच्या मित्रांचा खास कंपु होता, अस्मादिक( म्हणजेच मी ) खुळे, अमित, जयेश, महेंद्र, अधीर, लालू, बुवा, सुन्या,रम्या, शैल्या, संतोष, अजित, जयदिप, सतीश, कौस्तुभ आणि रोहित अशी कितीतरी नावे घेता येतील.
शाळेतल्या तिमाही, सहामाही,नऊमाही इ. सर्व परिक्षा आल्या कि मला अंगावर काटा येई. पण काय करणार आलिया भोगासी, असावे सादर.
मधल्या सुट्टीतले खास खेळ अगदी पकडा पकडी, साखळी साखळी पासून ते खो खो कबड्डी पर्यंत.
सरांना ठेवलेली विशेषणे पाटील सरांची म्हस्करी, लोंढे सरांची स्टाईल बाजी, बिरारी सरांची तंबाखु ? कार्येकर सरांच्या गगनभेदी गप्पा. सर्वात भारी आहेत ते 'कॉर्ल हुपर'प्यून मला त्यांचे नाव आठवत नाहिये.
शाळेच्या बाकड्यावर करकटकने काढलेली डिझाईन, ×× व oo यांचा चौकोनी खेळ, बाकडा कमी पडला तर भिंतीवरची कलाकुसर ठरलेली. एकेमेकांना चिडवणे, टपलीत मारणे, खडूने मारणे किंवा कागदाचा बोळा जोरात फेकणे इ. सर्व प्रकार आणि जर पकडले गेलोच तर एकदुसर्याचे नाव घेणे.
शाळेत असताना क्रिकेटचे भारी गारूड होते माझ्यावर. अक्षरश: रेल्वे ग्राऊंड, लुर्डस शाळेचे ग्राऊंड, वार्ड १२ चे जुणे मैदान भर उन्हात अगदी काळा-निळा पडे पर्यंत खेळत रहायचो. तेव्हा ईतिहासातले शकावली- सनावळी माहित नव्हत्याच मुळी, पण तेंडूलकर, लारा, शेन वार्न अगदी वकार पर्यंत सर्वांचे रेकॉर्ड लक्षात असायचे.फुल्ल पागल...
त्यानंतर दुसरे वेड होते ते सायकलचे, नुकतेत ८ वीत गेल्यावर हाफ चढ्ढीची फुल झाली होती. मग काय जोराने सायकल चालवत मुलींसमोर शायनिंग मारायचा निरर्थक प्रयत्न....
खऱच तेव्हा आम्हा सर्वांच्या मनात अशाही भावना यायच्या, अरे काय सही दिसते ही, खुप सुंदर आहे यार, अरे बघ ना बघ ना जरा... पण या तलम भावनांना एक मर्यादा, एक भान असायचे. नैसर्गिक अवस्थाच म्हणा हवेतर.
पण खर सांगु, तेव्हा सुध्दा एखादा चेहरा इतका आवडायचा की अक्षरश: जीव ओवाळून टाकावा असे वाटायचे हो. असो तर सध्या आवरते घेतो....
आणखी एक विषय बॉलिवुड, एकेमेकांना पिक्चर च्या स्टोरी सांगणे. अक्षय कुमार, अजय देवगण चे सडा फटिंग सीन पाहून ते जसे दिलीप ताहिल, अमरिश पुरी यांना मारायचे. तसे आम्ही एकेमेंकावर खार खात असु, पण ते तेवढ्यापुरतेच. तसेच कुमार शानु, उदित नारायण ची गाणी गुणगुणने हे सर्वच विचित्र.
१० वी ची लोणावळा वर्षा सहल. सर्व जण त्या गणवेशात येड्या गबाळ्या सारखे. अवतार पण भारीच कोणाची चप्पल कुठे, तर बेल्ट कुठे, शर्टाची कॉलर कुठे, केसांची तर पार वाट लागलेली.
शाळेत कधीतरी मिळणार्या पॉकेट मनीतून मधल्या सुट्टीत आपल्या सोबत दोन- चार जणांना आईसक्रीम किंवा चटणीपाव थोडे जास्त पैसे असले तर वडापाव खाऊ घातल्यावर अंगावर मुठभर मांस चढे. तेव्हा तो वडापाव आजच्या Mc Donald किंवा domino's पेक्षाही जास्त भारी तसेच तेव्हा मुरबाड रोड वर नुकतीच एक सोडा मिक्स सरबतची गाडी लागत असे, त्यावेळी ते सरबत दोघे तिघे मिळून एकत्र पिण्यात जे काही स्वर्गीय सुख होते ते आज ऑफिसमधील प्रोजेक्टच्या पार्टीत Imported Scotch प्यायल्यावर पण येत नाही. खऱच जादूचे दिवस होते का ते ?
शाळा तर आजही आहेच, आता तर आपली मुलेही शाळेत जायला लागली. मग याच गोष्टी कधी अस्वस्थ का करतात. पाऊस तर आजही तोच पडतो, पाण्याचे डबके आत्ताही साचते. कागदाच्या होड्या तर त्यात आजही सोडता येतील.. कदाचित आपण आपले आयुष्य upgrade करत असताना simple thinking विसरत आहोत.
परवा शनिवारीच जवळपास १५ वर्षानंतर सर्वांना एकत्र भेटलो. १६ जण होतो आम्ही. एकत्र भेटून कल्ला करण्यात जे समाधान वाटले ते वेगळेच. आज जो तो ज्याच्या त्याच्या आयुष्यात स्थिरावला आहे. तिथे कुणीही आपली नौकरी धंदा पत हुद्दा पगार असल्या कोणत्याही फालतु गोष्टी बोलत नव्हते. सर्व एकाच बाकड्यावरचे समान वर्ग मित्र होते.
हिच मैत्री अशीच निरंतर राहो...
अजुन काय सांगणे !
आपलाच...
योगेश चंद्रकांत आहिरे.

मित्रा योगेश, अप्रतिम लेखन. गतकाळातील सुंदर आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद ..- अजित वाळेकर
ReplyDeleteHey Ajit happy to see you.
ReplyDelete