Tuesday, 21 October 2025

Chordara Old Malshej

                   चोरदरा घाट आणि जुना माळशेज

पहाटे लवकरच निघालो, वाटेत मोरोशी ला मनोजला पिकअप केले. हरिश्चंद्रगड माळशेज भागात अनेक पुरातन घाटवाटा आहेत. यात काही वहिवाटेतील तर काही दुय्यम अशा या वाटा. 

 माळशेज घाट गाडी रस्ता होण्याआधी या बहुतांश वाटा स्थानिक ग्रामस्थ घाटावर वा कोकणात येजा करण्यासाठी सर्रास वापरत. अगदी आज ही गाडी रस्त्या अलीकडे बोगद्या जवळ दोन पाण्याची टाकी बुजलेल्या अवस्थेत आजही दिसतात. हि जुनी शिवाजी वाट थितबी गावातून तळेरान तळमाची तसेच उधळ्या डोंगर भागात जाण्यासाठी सोयीची. तशीच एकतंगडी उर्फ भोजदरा घाट याच भागात जाणारी. थितबी परिसरातून गडावर तसेच खिरेश्वर भागात जाण्यास रोहिदास नाळ, तवलीची नाळ व खुर्दाचा दरा. यंदा आमच्या नियोजनात असलेली चोरदरा घाट अशीच दुय्यम, पूर्वी तिथबी परिसरातून खुबी वा खिरेश्वर भागात जलद जाण्यासाठी सोयीची. या वाटेला जुनी माळशेज घाटवाट जोडून ट्रेक पूर्ण करायचे ठरवले. यातील बहुतेक वाटा आधी धुंडाळून झालेल्या. चोरदरा मात्र राहूनच गेलेली. 
गाडी माळशेज MTDC पार्किंग मध्ये लावून सामान पाठीवर घेत चालू पडलो. डाव्या हाताला रेलिंग मागे टाकत लहान झाडी टप्पा पार करून चोरदरा घाटाच्या मुखाशी आलो. 
सुरवातीस तीस ते चाळीस फुटाचा सरळ पॅच त्यात ठिसूळ व स्लेट च्या दगडी चिपा. मूळ वाट या पॅचला उजवीकडे ठेवत कड्या लागत चिंचोळ्या वाटेने वर येते. पण सद्यस्थितीत वाट फारशी वापरात नसल्याने त्यावर घसारा तसेच जोडीला दृष्टीभय, हा सारा व्याप टाळत सुरक्षा म्हणून पॅच रॅपल करणे सोयीचे. मनोज रोप बांधण्यासाठी निरीक्षण करत होता अगदी मोक्याच्या ठिकाणी सोयीचे झाड. मनोज कामाला लागला तितक्यात त्याचा फोन वाजला पलीकडे गणेश फोनवर. गणेश हा मनोज चा मित्र MTDC मध्ये कामाला. आम्ही या भागात आहोत हे सांगितल्यावर गडी अर्ध्या तासात हजर. तोवर हेल्मेट हार्नेस स्नॅप डिसेंडर स्लिंग सारा लवाजमा सेट केला. 
हि सारी आभूषणं अंगावर घेत मी पहिले रॅपलिंग केली. पाठोपाठ गणेश व शेवटी मनोज वाइंड अप करून उतरला. ठिसूळ दगडं योग्य ठिकाणी सुरक्षित राहून कॉल देत हा पॅच उतरायला आम्हाला पाऊण तास गेला. 
पुढे तीव्र उतरण व पाय ठेवल्यावर खाली सरकत जाणारी लहान सहान दगडांची रास. सावकाश काही अंतर जातोच तो आणखी पंधरा वीस फुटांचा पॅच हा आधीच्या तुलनेत तसा सोपा रोपच्या साहाय्याने योग्य ती सुरक्षा घेत उतरलो. 
या पुढे अजून एक लहान पॅच. थोडक्यात चोरदरा या वाटेत आम्हाला तीन पॅच रॅपल करावे लागले. 
 मनोजच्या मते पूर्वी वाट राबता असताना गावकरी डागडुजी करत, पण सध्या दुरवस्था त्यात ऊन वारा पाऊस याची भर म्हणून हे सारं बिकट झाले आहे. आता होती ती नाळेतून उतराई 
 अधून मधून लागणारी खुरटी काटेरी झुडपं. अधेमधे नाळेला बगल देत डाव्या आणि उजव्या बाजूने बारीक पायवाट. जसे उतरू लागलो तशी नाळ रुंद होत बाहेरच्या टप्य्यात आलो. 
उन्हाचा तडाका चांगलाच जाणवू लागला. एका ठिकाणी झाडावर गणेश ला मधमाशीचे पोळं दिसले, माश्या फार अशा नव्हत्याच. मनोज ने सावधगिरीनं झाडावर चढून पोळं अलगद काढून घेतले. गोड मधुर अशा मधाचा प्रसाद या वाटेने आम्हाला दिला. औट घटकेचा थांबा घेऊन चालू लागलो. बरेच अंतर उतराई झाल्यावर मनोज ने रानात डावी मारली. 
 जर सरळ गेलो तर पुढे जात थितबी अथवा वाघ्याच्या वाडीत जाता येते. मागे वळून पाहिलं तर आम्ही उतरलो ती वाट स्पष्ट दिसत होती. खालच्या या भागात जंगल छान बहरलेले गर्मीतून अगदी एसी मध्ये आल्याचा फील. आंबा, बेहडा ,अंजन, ऐन, हिरडा तर काही ठिकाणी सागाची झाडे. रानाचा हा टप्पा अतिशय मोहमय. 
 थितबी तसेच काळू धबधबा च्या पायथ्याला जाणारी वाट आडवी आली. 
आमचे टारगेट जुना माळशेज आता वाट लख्ख मळलेली. वाटेत अनेक ठिकाणी दगडी रचाई. वाट अस्ते कदम वळणं घेत वर चढू लागली. 
जुना माळशेज या वाटेने पूर्वी खुबी, खिरेश्वर, मढ ते अगदी कोळेवाडी, सांगणोरे, फोफसंडी या भागातील मंडळी मुरबाड तालुक्यातील म्हसाच्या बाजारात गाई गुरांची ने आण करीत असत. अत्यंत सोयीची व सोपी सुरेख वाट. काही अंतर जाताच माथ्यावरील झाडी भरली खिंड नजरेत आली. 
थोडक्यात सांगायचे झाले तर खिंडीच्या रोखाने ओढ्याला उजवीकडे ठेवत, डावीकडील कड्याला बिलगून वाट पद्धतशीर बांधून काढलेली अनेक ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या. जसे वर जाऊ लागलो तसे घाटातील वाहनांचा आवाज कानी येऊ लागला. एका भागात बिबट्याची विष्ठा तर दोन तीन वेळेस रानात दडून बसलेल्या सांभर चे कॉल ऐकू आले.अशीच वन्य संपदा वाढीस लागो हीच मनो कामना. घाटातील मुख्य वैशिष्ट्य गणपती बाप्पाची कोरीव मूर्ती. 
बाप्पाला नमन करून कातळ कोरीव पाण्याच्या टाक्याजवळ विसावलो. भर उन्हात देखील टाक्यातील पाणी गारेगार. 
 याच जोड टाक्याच्या वरच्या भागात आम्हाला आणखी दोन टाकी अर्धवट बुजलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. भर कड्यात उंबराच्या लगत असलेली हि टाकी सहजी नजरेत येणं अवघडच. 
 पडझड झालेली त्यात माती व गाळ काढला तर पाण्याचा साठा नक्कीच बारमाही टिकेल यात शंकाच नाही. ओढ्या समीप जात वाट डावीकडे वळाली. पहिल्यांदा जेव्हा पावसात हि जुनी माळशेज ची वाट केली होती त्यावेळेस याच ठिकाणी ओढ्याचे रौद्र रूप पहिले होते.आताही ओढ्यात भर उन्हात बारीक पाण्याची वाहती धार, माश्या पक्षी व फुलपाखरे तेथे येजा करीत होते. अगदीच छोटीशी पहिल्या गिअर ची चढाई करत रानात शिरलो. यंदा कारवी बहुतेक ठिकाणी बहरलेली तीच वाळलेली कारवी व जोडीला काटेरी झुडुपं अक्षरशः मुख्य वाटेवर पसरलेले. कुणी ये जा करत नसावेत याचीच ती खूण. 
अन्यथा ग्रामस्थ वाटेत येणारी झुडपे काटेकुटे कोयत्याने कापून बाजूला सारतात अर्थात हे सारं घाटवाटेच्या ट्रेक ला आपण नेहमीच पाहतो पण इथे मात्र विपरीत स्थिती. माळशेज व MTDC च्या अगदी जवळ असलेली पुरातन वाटेची हि दुरावस्था. हल्ली गाव खेडे पाड्यातही गाड्यांची सोय झाल्याने अनेक वाटांचा राबता कमी झाला आहे. काळाचा महिमा असो..अनेक ठिकाणी चक्क बसून तर सरपटत खाली वाकून मार्ग काढावा लागला. काटे ओरबाडून घेत, शर्टवर चिकट चिकट त्यात धूळ माती लिंपून घाटमाथावर दाखल झालो. MTDC गाठे पर्यंत करवंदाची मेजवानी मात्र चांगली मिळाली. गणेश च्या ओळखीमुळे अंघोळीची खासा सोया झाली. बाहेर व्हरान्ड्यात चहा घेत असताना आमच्या वाटांची उजळणी पुन्हा रोहिदास हरिश्चंद्रगड काळू खोरे माळशेज हा सारा सह्य पसारा. खरंच कितीही भटकलो तरी मन भरत नाही. त्याच मनाचे ऐकत सह्याद्रीच्या ओढीने पावलं पुन्हा पुन्हा बाहेर पडतात.  

                                                    योगेश चंद्रकांत अहिरे

पूर्व प्रकाशित सह्याद्री मित्र २०२५ नासिक..

No comments:

Post a Comment