Friday, 23 May 2025

Telya ghat kumbhechi vaat

 तेल्याची नाळ आणि कुंभ्याची वाट

        लिंग्या घाटाच्या ट्रेक वेळी उंबर्डीत उतरलो, तेव्हा मोरे वाडीतील केशव दादा सोबत ओळख झालेली. त्यांना या भागातील आमच्या भटकंतीचे भारीच अप्रूप. दादा स्वभावानं एकदम रॉयल माणूस. मध्यंतरी फोनवर बोलणं होतेच. यंदा देव घाटाच्या ट्रेक साठी त्यांच्याच घरी मुक्काम टाकला. 

सोबतीला होता प्रशांत व त्याचा लहान मुलगा बाळू. आम्ही तिघेही दिवे लागणीच्या वेळेस गावात दाखल झालो. केशव दादा घरी नव्हते. पण आईने घरी चांगले आदरतिथ्य केले. अनेकदा मी म्हणालोय अशी जीव लावणारी सह्याद्रीत काही माणसं भेटतात, त्यांच्याशी मनाच्या गाठी बांधल्या जातात. त्यांच्या सहकार्याची उतराई होणं शक्य नाही. गावात मुंबईकर मंडळीची लगबग होती. सुट्टयांचे तसेच लग्न व शुभ कार्याचे दिवस. 
रात्री जेवण झाल्यावर गावच्या वेशी पर्यंत फिरून आलो. यंदाच्या अवकाळी पावसामुळे लवकरच काजवे दिसू लागलेआहेत. लगेहाथ त्यांचेही दर्शन झाले. नियोजनानुसार देव घाटाची चढाई ठरलेली. वाट फारशी वापरात नाही त्यात अवकाळी पावसामुळॆ अधिक काळजी घेणं महत्वाचे, यासाठी कुर्डूपेठेतील मामांना सोबत घ्यायचे ठरलेले. मामा सकाळी सात वाजता बोलणं झाल्याप्रमाणे येणे अपेक्षित होते. पण सकाळचे साडेसात, आठ, साडेआठ वाजले तरी त्यांचा थांगपत्ता नाही. फोन केला तर तोही बंद. शेवटी ट्रेक होईल का ? हीच शंका येऊ लागली. ऐनवेळेस दुसरे कुणी सोबत यायला तयार नव्हते. 
आई चा निरोप घेत गावातून निघून दहा मिनिटात जिते गाठले.आता करायचे काय ? बाळूचा हिरमोड होत, त्या लहान मुलाने बडबड सुरु केली. मुलांचा उत्साह ट्रेक बद्दल इतका जास्त असतो जर असे काही झाले तर लगेच नाराज होतात. गाडीत सुधागड, रायगड, मानगड, कुंभे बोगदा असे सारे पर्याय मी मांडले. प्रशांत साठी हा सारा परिसर नवीन होता त्याची कुठल्याही ट्रेक ला तयारी होती. ट्रेक होईलच आणि मी तुला नेणारच हे बाळूला समजवून सांगितले. तो शांत झाला. एप्रिल महिन्यात चिपेचे दार व घोडनाळ हा ट्रेक केला होता तेव्हा समोर बडदेमाच, बोरमाच, कुंभळमाच हा सारा भाग तिथून न्याहळा होता. क्षणात विचार अंमलात आणत गाडी जिते गावातून बोरमाच कडे फिरवली. बोरमाच हून तेल्या घाट ट्रेक करायचा हे ठरवून टाकले. गावात पोहचलो तेव्हा सोबत कुणी येईल का याची चौकशी केली तर कुणीच तयार होईना लांबचा पल्ला आहे. त्यात पाऊस कधी पण येतो, सारी कारणं ऐकत नकारच मिळाला. तेथील संतोष नामक एका दादाने, विलास ला तेल्या घाटाची सुरुवात दाखवायला तयार केले. ठरले तर, तेल्या घाटाने चढाई करून कुंभेच्या वाटेने उतराई. पदरातून कुंभळ माचीच्या दिशेने चालू पडलो. मला तर ही पदरातील चाल पेठमाची ते रामखंड सारखीच वाटली. वाटेत छानसे देवीचे देऊळ, आजूबाजूचा परिसर रमणीय. तिथेच काही गावकरी देवीला कोंबडं कापायचा बेत करत होते. देवीला नमन करून निघालो.
  सुमारे अर्ध्या तासाच्या चाली नंतर उजवीकडील माथ्याच्या खिंडीतून एक मोठी नाळ उतरत होती तीच होती तेल्याची नाळ. सोबत आलेला विलास इथून माघारी फिरला. त्याआधी त्यासोबत चर्चा करून बारकाईने पुढचा रूट समजून घेतला. अचानक ठरलेला ट्रेक त्यात माझ्या अनुभवाची कसोटी लागणार ! घड्याळात वेळ पहिली दहा वाजून गेलेले, कसेही करून अंधार पडायच्या आत बोर माचीत परतायला हवेच. मुख्यतः या ट्रेकचे पाच महत्वाचे टप्पे होते. १) तेल्याच्या नाळेचा माथा. २) माथा ते घोळ. ३) घोळ ते कुंभे. ४) कुंभे ते कुंभेच्या वाटेने खाली बडदे माच. ५) बडदे माच ते बोरमाच. झाडी भरल्या नाळेत शिरलो. खाली पडलेल्या झाडांच्या पानाचा पाला पाचोळ्यातून मळलेली वाट अचूक हेरली. वाट पद्धतशीर पणे वळसा घेत, अधे मध्ये नाळेतून अगल बगल देत डाव्या उजव्या बाजूने तिरकी जात वर चढू लागली. 
नाळेत उंबराच्या झाडांचे प्रमाण जास्तच. जसे वर जाऊ लागलो तसा वायव्वेला ताम्हिणी घाटाचे डोंगर, देवघाटाचा भाग, त्याला धरून उजव्या हाथाला कुर्डूगड ते पार चिपेचे दार पर्यंत. 
तर पश्चिमेला विळे भागड परिसरातील कारखाने. खाली बोरमाच ते जिते पर्यंतचा भाग. वाटेत कातळात उजवीकडे पाण्याचे टाके वाटावे असे खोदीव अर्धवट काम काहीश्या बुजलेल्या अवस्थेत नजरेस पडले.
  आणखी एक गोष्ट नमूद करायची राहून गेली ती म्हणजे बोर माच हून विलास सोबत निघालो तेव्हा एक कुत्रा सोबत आला, पण विलास सोबत तो काही परत गेला नाही. थोडक्यात तो पण आमच्या तुकडीत सामील झाला. खरंतर असे भू भू कुत्र्यांची अनेक ट्रेक मध्ये सोबत मिळते. हे एक वेगळेच किस्से असतात, मुक्या प्राण्याची साथ हा एक वेगळाच लिखाणाचा विषय होईल.
  असो... सुमारे पाऊण तासाच्या चढाई नंतर तेल्या घाटाच्या खिंडीचा माथा गाठला. खिंडीत झाडी व कारवीचा पसारा. सोबत आणलेले भूक लाडू घेत थोडी विश्रांती झाली. 
भू भू ला बिस्कीट पाव दिले तरी खाईना. पाणी पाजायला जवळ घेतले तर पाणी पडताच बाजूला झाला. खिंडी पलीकडे वाट उतरू लागली. झाडी भरलेल्या वाटेवर पावसामुळे दगडांवर शेवाळं जमा झालेले. तिरक्या रेषेत वाट उतरत ओढ्यात आली पूढे समोरच्या डोंगरावर चढून वळसा घेत मोकळवनात आली. मागे वळून पहिले तर आम्ही आलो ती तेल्या घाटाची खिंड स्पष्ट दिसत होती. 
डोंगरावरून चढ उतार करत विरुध्द्व दिशेला गेलो. काही अंतर सपाटीवरून जात वाट उजवीकडे उतरू लागली. खाली दूरवर घोळ गाव नजरेत आले. खिंड ते घोळ गाव आम्हाला तासभर लागला. 
घोळ गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. पंधरा वर्ष आधीचे मी पाहिलेलं घोळ आणि आताचे घोळ यात बराच फरक जाणवला. 
पुणे ते घोळ एसटी आहेच तर पूढे चार किमी गारजाई वाडी पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरु दिसले. 
गावात मारुती व विठ्ठलाचे नव्याने जिर्णोध्दार केलेले मंदिर. पूर्वी गाडीची सोय नव्हती तेव्हा घोळ गावातील मंडळी याच तेल्या घाटाने निजामपूर पर्यंत तर पलीकडे गारजाई वाडीतून पुढे जात कावळ्या घाटाने सांदोशी रायगड महाड भागात ये जा करत. आता या वाटा सोयरीक वा काही कार्यानिमित्त ये जा केली तरच वापरात अन्यथा गाडी पर्याय आहेच. एका घरात पाणी भरून घेत घोळ ते कुंभे या आमच्या पुढील वाटेची माहिती घेतली. यात एक गडबड झाली आमच्या भू भू वर घोळ गावातील दोन तीन टग्या भू भू नी भूंकत भूंकत जोरदार विरोध केला ते पाहून आमचा भू भू बिथरून पळाला. घोळ सोडले तेव्हा एक वाजून गेलेला. 
घोळ चा डांबरी रस्ता संपून कच्चा रस्ता लागला पुढे ओढ्यातून डावीकडे वळून जंगलातील मळलेली पायवाट लागली. निघालो तेव्हा भू भू ला इकडे तिकडे कुठे दिसतोय का ते पहिले, बाळू तर पार मागे जाऊन त्याला शोधून आला पण पत्ता नाही. इथवर साथ दिलेला भू भू त्याचे आता काय होईल याची मनाला हुरहूर लागली. 
कुंभेच्या या वाटेवर जंगल चांगलेच बहरलेले अंजन, हिरडा, आंबे व उंबर या मोठ्या झाडांची गर्दी सुखावह. सोबत शिळकरी कस्तुर व माझ्या आवडीच्या तांबट पक्ष्याची सुरेल साथ होती. वीस एक मिनिटांची चाल झाल्यावर अचानक भू भू मागून धावत पुन्हा आमच्यात सामील झाला. त्याला जवळ घेत अंजारले गोंजारले आम्ही तिघेही खुश झालो. 
घोळ गावाला पूर्ण यू टर्न घेत पलीकडील बाजूस आलो. गारजाई वाडीचा कच्चा रस्ता समोरच्या बाजूस मागे पडला. रानातून बाहेर येत पठारावर आलो सर्वत्र हिरवा गालीचा पसरलेला. 
पलीकडे कावळ्या घाटाच्या बाजूचे डोंगर तर कोकणदिवा खासा उठावलेला. 
खाली दूरवर कोकणात करमर, सावरट कडील वाड्या वस्त्या. बराच वेळ ते पाहत राहिलो. सारा आसमंत सुखदायक व डोळ्यांचे पारणं फेडणारा. वेळ पाहत भानावर आलो. 
पुढे जात वाट रानात शिरून पुन्हा बाहेर आली. घोळ मधल्या मामांनी सांगितल्याप्रमाणे पहिली खिंड, समोर वाट खिंडीच्या रोखाने चढू लागली. 
झाडी भरली खिंड पार करून सपाटी मग पुन्हा दुसरी खिंड थोडक्यात आम्ही अचूक वाटेवर होतो. दुसरी खिंड उतरताच पलीकडे कुंभ्याची वाडी दिसली. पण तिथवर पोहोचणं हे सोपें मुळींच नव्हते याचा प्रत्यय पुढील चालीत आला. 
खिंड पार करून मोकळ्या रानात येत आणखी खाली उतरलो तोच पाझर तलाव व त्या बाजूला मरुन पडलेला गवा. अर्थात तो गवा त्या खोल तलावात अपघाताने पडला हे आम्हाला बोरमाच मध्ये आल्यावर संतोष दादा कडून समजले. पुढे वाटेत रेती वाळू सिमेंटचे ढिगारे बंद पडलेला एक ट्रक. कधीकाळी काम सुरु करून अर्धवट अवस्थेत बऱ्याच कालावधी पासून सोडून दिलेले. 
बऱ्याच वेळे नंतर शेत जमीन व गुरांचे शेण पावट्या दिसू लागल्या गाव जवळ आल्याची हि खूण असते. कुंभे गावाची मुख्य वस्ती दोन भागात विभागली आहे. कुंभे गावाची मुख्य वस्ती दोन भागात विभागली आहे. धरण जवळ कुंभे गाव तर धरणाच्या पलीकडे कुंभे वाडी. कोकणातून चाच, केळगण फाटा करत घाटाच्या गाडी रस्त्याने कुंभे गावात येता येते. भविष्यात जर कुंभे ते घोळ गाडी रस्ता झाला तर रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्हा जोडणारा आणखी एक घाट पूर्ण होईल. केळगण, कुंभे बोगदा तसेच प्रसिद्धी पावलेला धबधबा, मांजुर्णे, चाच या भागात आधी ट्रेक झाले असल्याने पश्चिम कुंभे भाग तसा माझ्या परिचयाचा. वाडीच्या अलीकडे एक वाट उजवीकडे चढते हे सांगितलेले, ती वाट बरोबर शोधली. थोडक्यात वाडीत न जाता अलीकडूनच फिरलो. लहानसा चढ पार करत सह्यशिरोधारेवर आलो. पुन्हा एकवार कोकण विळे, भागड, ताम्हिणी, कुर्डूगड ते दूरवर घनगड मारठाण्या पर्यंतचा पॅनोरमा मिळाला. 
हवा स्वच्छ असल्याचा हा मोठा फायदा. उजवीकडे सरळसोट कडा तर डावीकडे काही अंतरावर एक घळ नजरेत आली तिथूनच वाट असणार या हेतूने डावीकडे वळलो. कड्या लगत ठिक ठिकाणी काट्यांचे व झाडींचे कुंपण बहुदा जनावरे चराई करताना खाली पडू नये या साठी बांधली असावी. त्या कुंपण मुळे आम्ही होतो त्या बाजूने घळीत उतरता येत नव्हते. कड्यावर करवंद खात मागे पुढे उजवं डावं जाऊन पहिले. अगदीच नाही जाता आले तर माघारी वाडीत जाऊन कुणाला विचारता येईल हा एक पर्याय होताच. मग जरा करवंद ब्रेक घेत शांत झालो. बारकाई ने निरीक्षण केल्यावर एका जागी काटेरी कुंपण चेपून निमुळती वाट दिसली. मी पुढे होत खात्री केली, वाट अचूक निघाली. 
मागे दोघांना आवाज दिला, आता उतराई सुरु. वातावरण काही मिनिटांतच बदलू लागले, ढगांचा गडगडाट सुरु झाला. आधीच्या पावसामुळे वाटेवरची दगडं शेवाळंलेली त्यात घसरून पडायचा धोका म्हणून सावकाश पावलं टाकीत होतो. वाट रानातून बाहेर येताच पदरातील बडदे माच मधील घरे दिसू लागली. वाटेत बाकी अगदी व्यवस्थित रचाई केली अशीच पद्धतशीरपणे वळणं वळणं घेत टप्प्या टप्प्यात उतरत होती. चाळीस मिनिटात आम्ही पदरात उतरलो. 
एव्हाना पावसाला सुरुवात झाली होती. मोठ मोठ्या सरींनी पार चिंब भिजवून टाकले. त्यात वारा भरपूर, थंडी ने हुडहुडी भरली. पुढे जात डावीकडे केळगण बाजूने वाट येऊन मिळाली आम्ही सरळ बडदे माच कडे निघालो, पाच वाजेच्या सुमारास सात आठ राबती घरं असलेल्या बडदे माच ला आलो. 
एका घरात आमची विचारपूस चौकशी करत, कोरा चहा मिळाला. खरंच तेव्हा वेळ काळ पहाता त्या चहाची अत्यंत गरज होती. पाऊस थांबला पण त्यावेळी त्या चहाने अंगात तरतरी आली. 
त्या घरातील मावशीकडे भू भू साठी भाकरीचा तुकडा मागितला पण भू भू ती भाकरी खाईना. बिचारा सकाळ पासून आमच्या सोबत भुकेलाच हिंडत होता. 
बडदे माच ते बोर माच हि पदरातील आडवी चाल. एक टप्पा वर येत शेताच्या बांधा ने जाऊ लागलो. एव्हाना पाऊस जाऊन वातावरण स्वच्छ झाले. मावळती कडे झुकलेल्या सूर्याचा प्रकाश झाडांच्या पिवळ्या हिरव्या गर्द पानांवर त्या पल्याड काळया ढगांच्या छायेतील राखाडी रंगाचा सह्याद्री हा एक अनोखा मिलाफ जुळून आला होता. हे सारं चित्र मनाच्या कुपीत जपून ठेवायचे. सहाच्या सुमारास बोर माच मध्ये परतलो. संतोष दादा, कसे कुठे काय काय ? पाहिले या बद्दल विचारू लागले. शांतपणे फोटो दाखवत त्यांना वृतांत थोडक्यात सांगितला. भू भू चा विषय निघाल्यावर कळले तो त्यांचाच होता, आमच्या सोबत पूर्ण फिरून आला हे पाहून ते पण हैराण झाले. आता भू भू त्यांच्या घराच्या अंगणात निवांत झोपला होता. मला बहुतांशी विना वाटाड्या ट्रेक करायला आवडते. 
आपले कसब व अनुभव लावून वाटा शोधण्यात एक वेगळीच मजा आहे. आशा निराशा, आनंद दुःख, चांगले वाईट असं सारं वाट्याला येतं. हार पण आपलीच व जीत ही आपलीच. आता आजचे उदाहरण पहा ट्रेक होता देव घाट केला तेल्याची नाळ. 
थोडक्यात मराठीच्या पेपरचा अभ्यास करून गेलो तर गणिताचा पेपर समोर आला. आज वरील भटकंतीचा अनुभव पणाला लावून त्यात उत्तीर्ण झालो हि अत्यंत समाधानाची बाब. याच आनंदात निरोप घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

                                              योगेश चंद्रकांत अहिरे

1 comment: