Sunday, 30 March 2025

Chipeche dar Ghodnal

                       चिपेचे दार व घोडनाळ

ताम्हिणी, धामणव्हळ, कुर्डूगड, उंबर्डी, जिते परिसरात अनेक वेळा तिन्ही ऋतूत जाणं झाले. सदा रमणीय असा हा भाग. इथे अनेक वाटांची रेलचेल आहे. 

यंदा चिपेचे दार व त्याला जोडून घोडनाळ असा घाटवाटांचा रूट ठरवला. एकटाच निघालो होतो ऐन वेळी जयेश तयार झाला, तसे या आधी चार पाच ट्रेक त्याने माझ्या सोबत केले होते. भर दुपारी कल्याण सोडून जिते पोहचेपर्यंत सायंकाळ झाली. सॅक पाठीवर घेत कुर्डूगड पेठेच्या वाटेला लागलो. 
जिते व जवळील उंबर्डी या दोन्ही गावातून कुर्डूगड पेठेत जाता येते. सह्याद्रीची रांग या भागात जवळपास अडीच हजार फूट त्यात निम्यावर पदरात काही वाड्या वस्त्या पूर्वापार. त्यात कुर्डुगडाची कुर्डूपेठ, कुंबळमाची, बोरमाच, बडदेमाच या अर्ध निम्मं उंचीवर डोंगरात वसलेल्या, या ठिकाणी जिते उंबर्डी कडपें शिरवली याच भागातून ग्रामस्थ येजा करतात. बोरमाच व बडदेमाच या ठिकाणी रस्ता आहेच पण नुकताच कच्चा रस्ता जिते मधून कुर्डूपेठेत तयार होतोय. पूर्वी दोन चार वेळा आलो तेव्हा डोंगरातील पायवाट होती आता रस्ता. असो.. कातरवेळी त्याच रस्त्याला लागलो. रमत गंमत आठ वाजता पेठेत मामांकडे मुक्काम टाकला. 
कधी काळी तीस पस्तीस घरं असलेल्या कुर्डूपेठेत सद्यस्थितीत सात ते आठ घरं बाकी सारे नोकरी चाकरी व मुलांच्या शिक्षणासाठी खाली लहान मोठ्या गावात स्थायिक झाले आहेत. साहजिकच वृद्ध मंडळी जास्त, याच जुन्या खोडांनी इथल्या वहिवाटा जपल्या आहेत. रोटीबेटी तशीच सोयरीक या निमित्ताने घाटावर वा कोकणात येणं जाणं होतेच. गप्पा खुशाली मग जेवण झाल्यावर बाहेर पडलो. नुकतीच आठवडा आधी होळी पौर्णिमा होऊन गेलेली. 
अष्टमीच्या चंद्रप्रकाशात कुर्डूगड लोभस वाटत होता सोबतीला रानातील निरव शांतता, मला तरी शहरी गर्दी गोंगाट पासून दूर जात हवीहवीशी वाटणारी. मन शांत होत एक वेगळीच ऊर्जा मिळते याच साठी अशा वाटांवर पावलं पुन्हा पुन्हा बाहेर पडतात. सकाळी आवरते घेत चिपेच्या दारा कडे निघालो. कुर्डूगड या आधी दोनदा पाहून झाला असल्याने तो यंदा नियोजनात नव्हता. गडाला डावीकडे ठेवत पदरातून आडवी चाल. 
मार्च महिना असूनही सकाळची हवा थंड स्वच्छ व आल्हादायक. पक्ष्यांची किलबिलाट त्यातही तांबट व कोकीळ आघाडीवर एकदम तालासुरात. पेठेतील ग्रामस्थ पदरात पावसाळी भात शेती करतात. त्याच बांधावरील खुणा पकडत डाव्या बाजूने निघालो. रानातून वीस पंचवीस मिनिटे गेल्यावर दोन वाट फुटल्या डावीकडची चिपेचे दार तर उजवीकडील पदरात जात पुढे घोडनाळ व पुरातन वरदायनी देवीच्या ठाण्याकडे. 
आम्ही डावीकडे जात चढाईला सुरुवात केली. सुरुवातीस रानातील सौम्य चढाई. काही अंतर वर जात वाट कड्याला बिलगून, अगदी एका बाजूला कडा तर दुसऱ्या बाजूस दरी. 
कुठे तीव्र चढण तर कुठे तिरकी तर काही ठिकाणी अगदीच निमुळती अरुंद वाट. जोडीला घसारा दृष्टीभय व भरीस भर अधेमधे भू भू वाट अडवायचे मग तोल सांभाळत पुढे जायचे. अनेक वेळेस तर आमच्या पुढे भू भू वरच्या वाटेत जाताना वरून दगड माती अंगावर यायची तो एक वेगळाच प्रकार. 
मला कड्यातील ही घाटवाट सांडशी नजीकच्या सवाष्णी घाटाशी साधर्म्य असणारी वाटली. दोन्ही घाटवाटा पदरातून सुरु होतात, सवाष्णी पण उभ्या कड्यातून जाते व पाठीमागे ढाक किल्ला अगदी तशीच चिपेची वाट पाठीमागे कुर्डूगड. दोन्हीही वाटा नियमित ट्रेकर साठी मुळीच अवघड नाही. 
जसजसे वर जाऊ लागलो तसा कुर्डूगड खाली दिसू लागला. तुरळक बांबूच्या वनातून साडेनऊच्या सुमारास घाटमाथ्यावर दाखल झालो. हवा स्वच्छ असल्याने आजूबाजूचा आसमंत व्यवस्थित नजरेत आला.
दक्षिणेकडून बडदेमाच कुंभे, बोरमाच ते कुंभेमाच पर्यतच्या पदरातील वाड्या तर कुंभे नाळ, तेल्याची नाळ, ठिपठिप्या घाट या घाटवाटा. वायव्वेला या सर्व वाटांचा या मुलुखावर नजर ठेवणारा कुर्डूगड. बारकाईने निरीक्षण केल्यावर असे दिसले ठिपठिप्या घाट व त्याच्या उत्तरेकडील सरळ तुटलेला कडा व तीव्र घळी या मुळे कुर्डूपेठ पासून या समोरील पदरातील वस्त्या वेगळ्या झाल्या आहेत. अन्यथा पेठमाची (कोथळीगड) ते कळकराय वस्ती सारखे एकाच पातळीवर जोडले गेले असते. असो ... सह्याद्रीतील भौगोलिक स्थान वैशिट्य अजून काय ! 
बराच वेळ घाटमाथ्यावर घालवला तोवर मामा पलीकडच्या रानातून चार पाच बांबूच्या काठ्या घेऊन आले. ऊन वाढायच्या आत पलीकडे मळलेल्या वाटेने काहीशी उतराई केली. पुढे जात मोठा ओढा आडवा आला. 
उत्तरेला खालच्या बाजूस दूरवर धामणव्हळ गाव दिसले. ओढ्याच्या पल्याड रानातून वाट वर जात रेडे खिंडी मार्गे दापसरे जाते. दहा वर्षांपूर्वी जिते कुर्डूगड निसणीची वाट धामणव्हळ रेडे खिंड दापसरे ठिपठिप्या साखळे वाडी हा ट्रेक केल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. रेडे खिंड पलीकडचे ढेभे मामांचे रानातले एकुलते एक घर तिथला परिसराने खूपच मोहात पाडलं होतं. कधीकाळी पुन्हा अशा ठिकाणी जायला नक्कीच आवडेल. 
कुर्डूपेठेतील ग्रामस्थ या चिपेच्या दारानं तसेच घोडनाळेतून पुढे रेडे खिंडी मार्गे दापसरे येजा करतात. झटपट चढायला चिपेचे दार सोयीचे तर उतराई साठी घोडनाळ. ओढ्याला डावीकडे ठेवत घोडनाळेच्या मुखाशी आलो अर्ध्याहून अधिक नाळ झाडीने व्यापलेली. 
फोटो घेत नाळेतून उतराई सुरु केली. सुरूवातीच्या टप्प्यात झाडी वेली अधे मध्ये बारीक दगडी चिपा तर बहुतेक ठिकाणी मुरुमाचा घसारा, काठीचा आधार घेत तोल सावरत वाट काढत डाव्या बाजूने उतरू लागलो. 
जवळपास अर्ध्या तासाने झाडीचा भाग संपून वाट बाहेर आली आता होते ते मोठमोठे दगड धोंडे अगदी टिपिकल कोणत्याही नाळेत असतात तसेच. जिथून जसे सोपे पडेल तसे उतरू लागलो. या नाळेत उंबराची झाडे बरीच. अधून मधून सावली साठी उपयोगी क्षणभर थांबून चालायला सुरुवात. 
एक दोन छोटे पॅच लागले कोणत्याही नाळेत दरवर्षी पावसामुळे असे लहान मोठे पॅच निर्माण होतात किंवा असलेले नाहीसे होतात. कारण पाण्याचा प्रचंड प्रवाह नाळेतील दगड धोंडे लोटत आणतात. जसे खाली जाऊ लागलो तशी नाळ रुंद होऊ लागली. 
काही अंतरावर एका मोठ्या खडकाला काही ठिकाणी शेंदूर फासलेला हेच वरदायिनी देवीचे ठाणं. 
देवीला अर्पण केलेले ,खणा नारळ बांगड्यांची ओटी, श्रद्धेनं बांधलेल्या अनेक घंटा तर काही शुभ कार्याच्या निमंत्रण पत्रिका. मामांच्या मते खरं मूळ वरदायिनी देवीचे स्थान पदरात आहे हि देवी साखळवाडीतले लोकं पूजतात. असो... आता वाट नाळेतून बाहेर येत उजवीकडे वळली. अरुंद पायवाट इथेही जोडीला घसारा,आडवं जात काही वेळात खाली उतरू लागलो. 
समोर भगवा झेंडा मोक्याच्या ठिकाणी सोबत फॉरेस्टने रचलेली दगडी रास. या मोक्याच्या जागेवरून आम्ही उतरलो ती घोडनाळ स्पष्ट दिसत होती. 
तर समोर सरळसोट झेपावले कातळकडे अनेक घळी, ठिपठिप्या घाटाची वाट व कुंभळमाची परिसर. उजवीकडे पदरात उतरून आडवी चाल थोडक्यात आमची उतराई संपून सह्यकड्याला उजवीकडे ठेवत पेठेच्या दिशेने निघालो. वर पहिले असता पुन्हा एकवार चिपेचे दार नजरेत आले. 
आंब्याची, उंबराची, कडीपत्ता, अंजनाची तसेच करवंदाची अनेक झुडपे थांबत त्यावर ताव हि मारला. चवीला छान असे गोड आंबट करवंद. उन्हाळी भटकंतीची हीच खरी मजा असते. भरपूर व विविध रानमेवा तुम्हाला चाखता येतो. ऊन सावली, हलका चढ उतार करत पुढे जात मामांनी यू टर्न घेतला. विचारलं तर म्हणाले, चला आमच्या देवीला आणि चप्पल बूट इथेच काढा. हे ऐकत पहात जयेश काहीसा वैतागला. देवा जवळ थंड पाणी मिळेल, चल तू असे म्हणत त्याला राजी केले. बूट देवस्थान जवळ काढतो, आता नको असं मामांना म्हणालो. मामा म्हणे, बघा नाहीतर मला पाप लागेल. मामांनी चप्पल जागेवर काढली व अनवाणी चालू पडले. 
उजव्या हाथाला दरीच्या कडे कडेने वाट काहीशी उतरत कड्यापाशी पत्र्यांचे छप्पर टाकलेल्या देवाच्या ठाण्यावर घेऊन आली. काही अंतरावर पायातले बूट काढले मग मामांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आमच्यामुळे पाप नको, शेवटी श्रध्दा महत्वाची. इथल्या वरदायिनी देवीला कुर्डूपेठ व उंबर्डी येथील लोकांची ये जा असते. मंदिराच्या जवळच घळीतून पाणी झिरपत होते. 
वरच्या टप्प्यात एक खळगं, तिथवर शिडीच्या साहाय्याने जात स्वच्छ गार पाण्याचा प्रसाद मिळाला. भू भू पण चालून चालून तहानले होते. ते पाणी पिऊन जीभ बाहेर काढत ध्यानस्थ बसले. औट घटकेचा हा थांबा मस्तच रिफ्रेश करून केला. आल्या पावली माघारी फिरलो. अर्ध्या तासात सकाळच्या दोन वाटांच्या जंक्शन पॉईंट वर आलो इथवर येत आमचे वर्तुळ पूर्ण झाले. पेठेच्या वेशी अलीकडे आणखी एक पुरातन राऊळ. 
 हे गड पायथ्याचे कुर्डूई देवीचे नाही तर कुर्डेश्वर महादेवाचं. पावसामुळे पडझड आणि जमीन खचल्यामुळे गावकरींनी दगडी जोत्यांवर मुर्त्या व्यवस्थित मांडून ठेवल्या आहेत. नंदी, शिवलिंग, गणपती, सीता, पार्वती इ काही शिल्पं. येत्या काळात ग्रामस्थ इथे चांगले देऊळ बांधणार आहेत. 
दोन वाजेच्या सुमारास घरी परतलो पोटभर जेवण करून मस्तपैकी ताणून दिली. साडेपाचच्या सुमारास मामांचा निरोप घेतला. साडेपाच किमीचा जिते जाणारा कच्चा रस्त्या ऐवजी उंबर्डी उतरावे का ? तसेही लिंग्या घाट ट्रेक वेळी व आधी उंबर्डीतुन पेठेत येणं झाले होते. 
सरळ झटपट उतरायला वेळ वाचला असता पण आमची गाडी जिते मध्ये, पुन्हा उंबर्डी ते जिते काही साधन किंवा वाहन मिळेल याची काही शाश्वती नाही. सारासार विचार करून जिते चा रस्ता धरला. 
मावळतीच्या उन्हात सभोवतालची सह्याद्रीची रांग फारच सुंदर. आम्ही पण मनात तो पॅनोरमा साठवून घेत परतीला लागलो.

                                                      योगेश चंद्रकांत अहिरे

1 comment: