किल्ले माहुली
महादरवाजा व हनुमान दरवाजा
मागे प्रसाद सोबत चर्चा सुरू असताना माहुली किल्ल्याचा विषय निघाला. खास करून गेल्या काही वर्षांत दुर्ग संवर्धन व श्रमदान करत असलेल्या काही सेवाभावी संस्थेने गडाचे वापरात नसलेल्या पुरातन वहिवाटा पुनर्जीवित केल्या. त्यात गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा यांची नावं अग्रस्थानी.
भटकंतीच्या सुरूवातीच्या काळात माहुलीला अनेक वेळेस जाणं झाले. आसनगाव लोकलं ने उतरून पायगाडी किंवा एसटी ने माहुली गावातील शिवमंदीरात मुक्काम ठरलेला कधीकाळी गडावर ही मुक्काम केलेला स्मरणात आहे. त्याकाळात आमचं माहुली, आजा पर्वत, राजमाची, पेब, भिमाशंकर व ऑल टाईम फेवरेट हाॅलिडे प्लाझा पेठचा किल्ला अशा ठिकाणी वारंवार जाणं व्हायचं. घरातून शिधापाणी सोबत घेत निवांत सुर्योदय सुर्यास्त पाहत अनेक मुक्काम घडले आहेत. त्याच मुख्य कारण त्यावेळेस ट्रेक तर करायचाच आहे पण दुसरा दूरचा पर्याय बजेट मध्ये अथवा खंबीर भिडू सोबत नसल्याने, कमीत कमी पैशात हिच जवळची ठिकाणं पुन्हा पुन्हा पहायचो. मला स्वतःला रिपीट मोड चं वावड नाही, त्यामुळे एक दोन दिवस निसर्गात जुन्या पाऊलखुणा अनुभवायला जातोय ना हेच पुरेसे.
पब्लिक ट्रान्सपोर्ट आधी म्हणालो तसे घरातून नाश्ता जेवण व शिधापाणी, मुक्कामी रहायला गुहा, मंदिर अथवा शाळा.
अनेक ट्रेक माणशी पन्नास रूपयाच्या आत १९९६ ९७ पासून केले आहेत. तेव्हा गावात आपुलकी मनापासून जाणवायची. आता सारखे फ्लेक्स बॅनर वा खाणावळीचे बाॅर्ड लागून रूक्षपणा नव्हताच मुळी. आताचे जत्रा नेणारे हागणदारीचे दुकानदार, पाच पंचवीस ट्रेक केलेले ? अर्ध्या हळकूंडाने पिवळे झालेले स्वयंघोषित लीडर कम ऑर्गनायझर्स या क्षेत्रात आले व भोळ्या ग्रामस्थांना पार बदलून टाकायला निघालेत. बदलते वारे, मागणी तसा पुरवठा सहाजिकच पैशाचा खेळ सुरू झाला. अशा रितीने अती प्रसिध्दी होत अनेक ठिकाणांची पार रयाच गेली आहे. तिथली शांतता, निसर्ग, ईतिहास, भूगोल या सर्व बाबींची पार वाट लावली या धंदेवाईक हागणदारीच्या दुकानदारांनी. अशी अनेक उदाहरणं देता येतील, अर्थात सर्वाना ती माहीतच आहेत, यादी पार वाढतच जाईल... असो आवरतं घेतो.. पुन्हा मुळ विषयावर
तर नेमकं चर्चेदरम्यान खरे साहेबांचा मेसेज शनिवार वन डे जाऊ या का ? योगायोग म्हणजे त्यांनी माहुलीचाच पर्याय सुचवला. स्वअभ्यास, नकाशा वाचन व प्रसाद सोबत झालेली चर्चा या जोरावर जायचं पक्क केले.
शनिवारी पहिली कसारा पकडून आसनगाव उतरलो तिथून माहुली किल्ल्यासाठी अडीचशे रूपये रिक्षा. हल्ली शहापुर वरून येजा करणारी एसटी बंद झाली आहे. पण यंदा नवीन वाटेचा ध्यास त्यासाठी वेळ व अतिरिक्त श्रम वाचवणं गरजेचं. गुमान रिक्षा पकडली. पायथ्याला आलो तेव्हा बराच बदल जाणवला २००९ नंतर माझं माहुलीला येणं झालंच नव्हत. गावात व वनविभागाने पायथ्याच्या भागात बरीच कामं केलेली आढळली. रितसर माणशी वनविभागाची पावती घेत आत गेलो.
ओढा ओलांडून मुख्य वाट सोडून उजवी मारली. सर्वसाधारण किल्ल्यावर जाणार्या वाटेला पाटीची वाट म्हणतात. जी एका धारेवरून जात वरच्या भागात निमुळत्या सोडेंवरून शिडी मार्गे कातळटप्पा पार करत तटबंदी जवळ चढते. या वाटेवर झाडीचे प्रमाण खूपच कमी. त्या वाटेला डावीकडे ठेवत आत रानात शिरलो मध्ये दोन कोरडे ओढे पार करून महादरवाजातून येणाऱ्या मुख्य ओढ्यात जायचे होते. जंगल फार दाट नसले तरी एक दोन ठिकाणी गंडायला झाले. अनुभव व व्यवस्थित दिशेचा अंदाज घेत अचूक पायवाट पकडली. तेव्हा साडेआठ वाजून गेलेले. महादरवाजातून फारसं कुणी जातच नाही. पूर्वी पायथ्यालगतच्या माच वस्तीवर उतरणारी ही वाट सध्या पूर्ण पणे मोडली आहे. मनात प्रश्न येतो, एवढा मोठा पहारेकरांची देवडी असलेला दरवाजा त्यातील पायर्या पण पुढे फक्त नाळच.... वाट अशी नाहीच ?सुरूवातीस रूंद ओढ्यातून वाट, सोबतीला झाडोरा व पक्ष्यांची किलबिल. त्यात माझा फेवरेट तांबट मस्त आवाज काढत होता. पळसगडाला समोर उजवीकडे ठेवत बरोबर दरवाजाची दिशा घेतली. छोटे छोटे टप्पे चढत अगदी आरामात वर जाऊ लागलो.
वाटेत उजवी डावीकडून लहान मोठे ओढे येऊन मिळतात पण मुख्य दिशा सोडायची नाही. सुमारे सव्वा ते दिड तासाच्या चालीनंतर मस्त गार पाण्याचा पाणवठा लागला. हे तेच पाणी जे महादरवाजातून जवळील टाक्यातून खाली वाहत येतं. वरून येणारं पाणी मातीतून झिरपत येत कमालीचं थंडगार व स्वच्छ, तिथेच सोबत आणलेला नाश्ता करून पाणी घेत पुन्हा चढाईला सुरूवात केली. कधी नाळेतून तर कधी उजवी डावीकडून जसे जमेल तसे वर जात होतो. काही वेळातच महादरवाजातील भगवा ध्वज नजरेत आला. आता नाळ बर्यापैकी अरूंद व मोठ्ठाली धोंडे भरलेली दोन तीन लहान कातळटप्पे आडवे आले, सावधगिरी बाळगत ते पार केले. अनोळख्या नाळेत कधीही एखादा अवघड टप्पा वा सरळसोट भिंत आडवी येऊ शकते ती शक्यता ध्यानात ठेवत सोबत रोप होता तरीपण तसं अगदीच अशक्यप्राय असं सामोरं येऊ नये म्हणून काय ते "टचवूड - फिंगरक्राॅस" असच मनात दोघेही म्हणत होतो. ऊंची जशी गाठत होतो तशी मोठी झाडी नाहिशी होत, सह्याद्रीत टिपिकल नाळेत असतात तशी खुरटी व काटेरी झुडपं. अधून मधून एखाद्या टप्प्यात ऊंबरांची झाडे तेवढाच दिलासा. ऊन तापून, घामाच्या धारा वाहू लागल्या तर थोड थोड अजून असं करत ऊंबराच्या खाली विसावा घ्यायचा. परिणाम माणशी तीन लीटर हून अधिक पाणी सोबत असून पाणी कमी पडेल की काय अशी परिस्थिती.... क्रॅम्प टाळण्यासाठी ठराविक वेळेत पाणी पिणं भाग होतं. भर उन्हात अगदीच दुर्गम व निर्मनुष्य नाळेत आम्ही दोघेच दूर दूर पर्यंत कुणीही नाही. चढाईत यश आले तर आमचे व अपयश आले तरी आमचेच. हा माईंड सेट आमचा पक्का होता जो अनुभव व व्हेवलेंथ वर ठरला होता. एकमेकांना काही जुने किस्से सांगत माहौल हसतखेळत ठेवत होतो. फार गंभीर नसले तरी अगदीच टवाळकी पण नको जेणेकरून ताण नियंत्रित राहिल... शेवटच्या टप्प्यात खरे साहेबांना एके ठिकाणी बसवून, नाळेतील उजव्या भिंतीला बिलगून वर जाऊ लागलो. छातीवर येणारी तीव्र चढण पार करून माथ्यासमीप कड्याखालून आडवी वाट दिसली. लागलीच खरे साहेबांच वर बोलावून घेतले. झाडीतून घुसखोरी करत घसारा युक्त आडवी मारली तेव्हा गडावरून येणारा प्लास्टिक चा कचरा दिसू लागला जे नको ते पहायला मिळालं, माथा नजीक आल्याची निशाणी. आडवी वाट संपवत पुन्हा ऊंबराच्या झाडीने वेढलेल्या नाळेत आलो. नाळेत पाणी अर्थातच वरून येणारे. लहानसा चढ संपवून वर आलो तेव्हा सामोर आल्या महादरवाजातील पायरा, तटबंदी व बुरूज. ते पाहून खरंच केलेल्या धडपडीचे चीज होत आगळेच समाधान आम्हा दोघांना वाटले. साडेसात वाजता सकाळी वनखात्याची पावती फाडून सुरू केलेली चाल चढाई दुपारी पाऊण वाजता पहिल्या पायरी वर यशस्वी पूर्ण झाली.महादरवाजातील देवडीत एक ग्रुप तर वर महाराजांच्या पुतळ्याजवळ दुसरा ग्रुप एकंदरीत गडावर वर्दळ होती. अंदाजे २२०० फूट ऊंचीचा, माहुली हा ठाणे जिल्ह्यातील बलाढ्य दुर्ग. पळसगड माहुली भंडारगड ते चंदेरी सुळके समूह असा उत्तर दक्षिण पसरलेला. निजामशाही अदिलशाही मोगलाई शहाजी राजे जिजाऊ शिवाजी महाराज यांच्या पाऊलखुणा जपणारा. १६६५ च्या पुरंदर तहाच्यावेळी महाराजानी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला नंतर १६७० ला पहिल्या प्रयत्नात १००० हून अधिक मावळ्यांना वीरगती प्राप्त झाली. पुन्हा मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. माहुली बद्दल इतिहासकालीन पुस्तकात व इंटरनेट वर बरीच माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे फार काही लिहीत नाही. कुंडातील पाणी भरून जेवायला बसलो. जेवण अर्थातच घरून आणलेले. पोटभर जेवण करून चांगली अर्धा पाऊण तास ताणून दिली. खरे साहेबांनी उठवलं म्हणतोय, "तुम्ही मस्त भर दुपारी घोरत पडलाय". मजबूत दमछाक व चांगल्या सावलीतून येणारी वार्याची झुळूक झोप तर लागणारच ना..असो...
महादरवाजातून कुंडा जवळची वाट पळसगडावर जाते. आम्ही दोंघानी पण तो आधी पाहिला असल्याने तिथे जाणार नव्हतो. तटबंदीवरून पुढे पूर्वेस कड्यावर गेलो, तिथून हवा स्वच्छ असल्यामुळे सह्याद्रीतील मुख्य रांगेतील कुलंग, घाटघर, आजोबा ते खाली शहापुर आसनगाव पर्यंतचा मुलूख नजरेत आला. मुख्य पायवाट पकडली वाटेत काही जुनी शिल्प - शिळा
नमाजगीर, सदर वाड्याचे अवशेष, पावसाळी तलाव व माहुलेश्वर महादेव मंदिर. आधी म्हणालो तसे गड संवर्धन करणाऱ्या संस्थेने बहुतेक ठिकाणी सुचना मार्गदर्शक पाट्या व वाट व्यवस्थित केली आहे, त्यामुळे गडावर झाडोरा असला तरी नवखी मंडळी चुकायची शक्यता कमीच ही एक चांगली गोष्ट. भंडारगड कल्याण दरवाजा कडे न जाता आम्ही डावीकडील हनुमान दरवाजाची वाट धरली. आधीच्या माहुली भेटीत ते सारं पाहून झालेले, त्यात आज आमचे नियोजन होते ते या दोन ( महादरवाजा व हनुमान दरवाजा ) वेगळ्या वाटा त्यामुळेच सारं निवांत. हिरड्याची झाडं अधून मधून लागणारे बांबूचे वन आणि फुलांचा बहर आलेली करवंदाची जाळी. एक टेपाड पार करून वाट पूर्वेस उतरून तटबंदी जवळ आली. कधी काळचे भग्न अवशेष पसरलेले. खालच्या टप्प्यात थेट कडा. त्या अरूंद घळीत लोखंडी शिडी व आधाराला साखळी झाडाला बांधलेली. उजवीकडे कड्यावर कोरलेले शेंदूर लावलेली मारूती व गणपतची मुर्ती हेच काय गतकाळातील हनुमान दरवाजाची साक्ष देणारे. सावकाश शिडीने उतरून कड्याला बिलगून खालच्या टप्प्यात आलो. वर कड्यात पाहिलं तर ऐके ठिकाणी चौकोनी खिडकी सारखे भुयार व पाण्याचं टाकं. यापुढे घसारा युक्त तीव्र उतार, या भागात आधाराला फारसं काहीच नाही. काही अंतर जाताच डावीकडे नेहमीची वापरातील पाटीची वाट दिसली त्या बोडक्या वाटेने काही जण उतरताना स्पष्ट दिसत होते. महादरवाजा, पाटीची वाट व हनुमान दरवाजा या तिन्ही वाटा पूर्वाभिमुख आहेत. तर कल्याण दरवाजा, गणेश दरवाजा या मावळतीला. वळसा घेत वाट एका रूंद धारेवर आली. मधल्या लहान लहान कातळात चक्क पुरातन पायर्या कोरलेल्या. झिग झॅग वळणं घेत वाट पध्दतशीर पणे खाली उतरू लागली. काही घसारा टप्प्यात इथं मात्र कारवीचा आधार होता. सोंडेवरून अगदीच लहानशा सपाट जागेवर आलो तेव्हा उलगडला उजवीकडील भंडारगडाचा भाग. भटोबा नवरा नवरी करवली सारखे मोठे सुळके व त्या पल्याड जाणारा सूर्यनारायण, सारंच दृश्य लाजवाब. बराच वेळ ते पाहत रेंगाळलो. माहुलीच्या या भागात जंगल चांगलेच बहरलेले. काटेसावर व पांगरा यांची केशरी उधळण तर पायाखाली सागाच्या पानांची करकर. शेवटच्या उतराईत अनेक ढोरवाटा चकवू पाहत होत्या पण दिशेनुसार चाल सुरू ठेवली. वाटेत धबधब्याकडे जाणारी वाट आडवी गेली मग लागला तो ट्रॅक्टर चा रूंद रस्ता जो आम्हाला मंदिरामागच्या कातकरी पाड्यावर घेऊन गेला. तिथल्या मंडळींना महादरवाजा वाटेबद्दल विचारलं तर ते खुद्द स्थानिक असूनही त्या वाटेने गडावर जात नाहीत. पूर्वीची लोकं या भागाला चुलांबीची वाट म्हणायचे असं समजले. वाटेला प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखतात हे तर अनुभवाअंती माहीतच आहे. असो.. साडेतीन वाजता सुरू केलेली हनुमान दरवाजाची उतराई गावात येईपर्यंत सहा वाजता संपली. बर्याच कालावधीनंतर माहुलीला येणं झाले त्याचं रिटर्न गिफ्ट या दोन वाटांच्या रूपात मिळाले यातच धन्य झालो. ...योगेश चंद्रकांत आहिरे.























.jpg)





No comments:
Post a Comment