Monday, 1 August 2016

Can we stop this ?


आपण हे थांबवू शकतो ?


हल्ली सोमावारचे वृत्तपत्र हाथी घेतले की एक बातमी नेहमीचीच पण तरीही नजरेत येणारी.
अमुक ठिकाणी नदीत दोघे तिघे बुडाले, समुद्र किनारी भरती अहोटीचा अंदाज आल्याने दोघे तिघे बुडाले.
धबधब्यात कड्यावरून घसरून मृत्यु ते अगदी एखाद्या किल्ल्याच्या वाटेवर चढाई करताना दुर्दैवी अंत व्हावा ते पार जंगलात हरवणे मग मदत रेस्क्यू वगैरे.
           खऱच परिस्थिती एवढी बदललीय, अगदी काही वर्षांपूर्वी लोकांना वर्षा पर्यटनाखाली निसर्गातले पावसाळी चित्र दाखवुन घराबाहेर पडायला उद्युक्त केले जाई. पण आज हे असे बेताल चित्र पाहून घराबाहेर पडावे असे वाटत नाही, यावर कुठेतरी बंधन घालावी असे वाटू लागले आहे.
          ठराविक गटातील लोकांना धांगडधिंगा हवा असतो, निसर्ग वगैरे असे काही नसतं. फक्त रम आणि रमा हेच त्यांचे सुख. फरक एवढा आहे ऐरवी हे बंदिस्तपणे केले जाते आणि पावसाळ्यात खुलेआम. पण खरंच निसर्गात जाऊन त्याची विविध रूप पाहून तिथला आस्वाद घेऊन हरवून एका वेगळ्याच धुंदीची अनुभुती घेणे वेगळे, की त्या साठी दारूची बाटली,नंगा नाच आणि मोठ्या आवाजाचा डिजे हवा ?
हि परिस्थिती आत्ताच्या सर्व प्रसिध्द झालेल्या धबधब्यांच्या ठिकाणांची आणि तिथल्या गावाची झाली आहे. तिथल्या ग्रामस्थांचे तर जगणेच मुश्कील झाले आहे, शनिवार रविवार आला कि त्यांच्या अंगावरच काटा येतो. हे झाले सर्वसामान्य अविचारी लोकांबद्दल.
         हिच परिस्थिती पावसाळी ट्रेकींग बद्दल. वाढलेल्या अपघातांची संख्या पहाता खऱच या लोकांना ट्रेकींगचा अर्थ तरी समजलाय का हा प्रश्न पडतो.
निसर्गात मुक्तपणे पण निसर्गाला कोणतीही हानी पोहचवता, इतिहासाचा मागोवा घेत तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, डोळसपणे केलेली भटकंती हि ट्रेकींगची पहिली पायरी, अर्थात हे माझे मत.
 पण हल्ली पावसाळी ट्रेकींगचे पेव फुटलय, सोशल मिडीयानेही त्यापरीने हाथभार लावलाच आहे.
अमका जातो म्हणून तमका जातो, सोम्या जातो मग गोम्या जातो, हि गेली मग मी जाते अशी हवशे नवशे गवशे यांची यादी वाढतच जाते. मग अलाना आऊटडोअर्स- फलाना एडव्हेंचर नामक बाजारू दुकानदार तयारच असतात. हेच वरील हवशे नवशे यांचे गिऱ्हाईक आणि मागणी तसा पुरवठा या आधारे या सह्याद्रीतल्या दुकानदारांची संख्या दुर्दैवाने वाढतच जाते. सहाजिकच आजच्या घडीला यावर कोणतेही नियम अथवा बंधन नाहीत. मग अनुभव, अभ्यास, नियोजन या गोष्टीत कमतरता असली की मग अपघात घडतात.
खऱतंर ट्रेक म्हणजे काय हेच यांना समजत नाही. ट्रेक म्हणजे काय, ट्रेक करताना घ्यावयाची खबरदारी, स्वत:ची सुरक्षितता यावर बहुतांश ट्रेक च्या पुस्तकात आणि आंतरजालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. पण हे करतय कोण ?
बहुतांश नवखे तर फक्त हिरवाईचे फोटो पाहूनच पहिल्यांदा सह्याद्रीत आलेले असतात. मग या विषयाचा व्यापक अभ्यास तर खुप दुरची गोष्ट, दुकानदांरानाही याचे काही घेणे देणे नसते. मुळात त्यांचा अनुभव आणि अभ्यास हाच वादाचा मुद्दा होऊ शकतो.
पण यातही काही जुन्या जाणत्या चांगल्या संस्थाही आहेत. पण कुण्या एकाच्या करामतीमुळे सारे ट्रेकींग नाहक बदनाम होते.
असेच काही रेस्क्यू अथवा मदत कार्य बद्दल.
आजमितीस मुंबई पुणे नाशिक परिसरात सुदैवाने अशा काही चांगल्या संस्था आहेत. जे फक्त एका फोनवर डोंगरात संकटात सापडलेल्यांना मदतीसाठी धावून जातात. कधी काळी दुर्दैवाने निसर्गात अशी वेळ कुणावरही येऊ शकते. पण तरी सुध्दा थोड्या अनुभवाअंती, नियोजनबध्द अभ्यासाने तसेच त्या वेळे ची परिस्थिती सदसदविवेकबुध्दीने हाथाळून बरेसचे अपघात टाळता येऊ शकतात. पण या बाबतीत खोलवर विचारच कुणी करत नाही, आणि बदनाम मात्र निसर्ग होतो हिच खरी शोकांतिका आहे.



                                                             योगेश चंद्रकांत आहिरे.

No comments:

Post a Comment