कर्जत हेरिटेज
सालाबाद प्रमाणे यंदाही आम्हा शाळेतील मित्र मंडळींची पिकनिक ठरली. दिड महिन्यापासून तारखेची जुळवाजुळव त्यात पोल घेत अठरा जुलै फायनल झाली. हो ना हो करत फक्त १२ टाळकी जमली. ६ मुले ६ मुली समप्रमाण.
ठिकाण कर्जत हेरिटेज रिसॉर्ट, कल्पना ने शोधून काढले. एक दिवसाचा १७०० + माणशी दर थोडा महाग वाटला. पण काय करणार अश्या पावसाळी दिवसात सर्वांनाच बाहेर पडायचा अति उत्साह असतो. सहाजिक मागणी जास्त पुरवठा कमी, मग वाटेल ते गोड मानून पदरात पाडून घ्यायचे... असो. कधी निघणार, कसे जाणार, काय घेणार, काय देणार, सारा कथ्याकूट व्हाट्स एप वर करून झाला. मनिषा आणि तृप्ती दोघीही ठाणेकर ते ट्रेन मधून थेट कर्जत मार्गे तर पल्लवी, कल्पना, सुजाता आणि सोनाली गाडी करून निघाल्या. आम्ही सहा जण कल्याणहून मयूरच्या गाडीतून निघालो. वाटेत याला, त्याला, मग मला असे एक एकाला उचलत अर्ध कल्याण दर्शन करत, CNG तो पण बहुतेक अर्धाच भरून एकदाचे निघालो. यात वेळ मात्र खूप गेला. मला म्हणून कधी कधी ट्रेन बरी वाटते वेळेत जाता येते, पण सर्व जण एकत्र एकाच गाडीत जायचे म्हणून हा खटाटोप. अंबरनाथ बदलापूर नेरळ कर्जत हा अगणित गतीरोधक असलेला रहदारीचा फालतू रस्ता टाळून आम्ही मुळगाव बोराडपाडा कशेळे कडाव असा रस्ता निवडला. मुळगाव जाईपर्यंत दिड तास गेला, दोघा तिघांना भूक लागली तसेही नाश्त्याची वेळ झाली होतीच.अर्थातच मुळगावचा प्रसिध्द्व वडापाव तिथे काही वेळ थांबा झाला. पुढे मात्र मोकळा छान रस्ता त्यात पावसाची रिपरिप आजूबाजूला हिरवागार निसर्ग एकदम मस्त. बोराडपाडा सोडल्यावर पुढे जात उजवी मारून कर्जत कशेळे मार्गाला लागलो. कशेळे ते कडाव बहुतेक सात आठ किमी असावे. कडाव ते टाटा पॉवर मार्गावर कर्जत हेरिटेज रिसॉर्ट आहे, हा रस्ता माझ्या परिचयाचा भटकंती ट्रेक निमित्ताने या भागात अनेक वेळेस येणे झालेले. अमित गुगल मॅप पाहत होता त्या गुगल बाईने कडाव यायच्या आधीच डावीकडे वळा असे सांगितले. अर्थात तो शॉर्टकट होता, तसाही उशीर होत होता, वेळ वाचवायचा म्हणून आम्ही वळालो. तीन चार घरं सोडल्यावर अरुंद रस्ता लागला पुढे जात कच्चा, मग मातीचा, मग एका वेळी एकच गाडी जाईल असा, त्याही पुढे डाव्या हाथाला पाण्याचा कालवा आणि उजवीकडे तारेचे कुंपण थोडक्यात अशा रस्त्यावर आमची कुचंबणा होऊ लागली. मातीच्या वाटेवर सारा चिखल झालेला अधे मध्ये पाण्याचे डबके साचलेली. गाडी इकडून तिकडे घसरत जाऊ लागली. चिखलात पार रुतून बसायची वेळ आली. मनोज आणि मी दोघेही झटपट खाली उतरलो. मयूरला त्या अरुंद वाटेवर उजवं डावं स्टेरिंग फिरवायला सांगत होतो, पण गाडी अधिकच फसत जात चाके एका जागी गरगर फ़िरु लागली. म्हटलं गाडीतले वजन कमी करा तेव्हा अमित आणि जयेश बाहेर आले. चाके जागेवर फिरत एका बाजूने गाडी पार चिखलाची झाली. मनात आले झक मारली आणि या गुगल बाईच्या नादाला लागलो. वजन कमी झाल्यावर गाडीचा ग्राउंड क्लीअरन्स वाढून टायर ग्रीप घेऊ लागले कशीतरी गाडी पुढे सरकू लागली. आम्ही पुढे गाडी मागे दहा पंधरा मिनिटांत तो भाग एकदाचा पार केला आणि बाहेर मुख्य रस्त्याला आलो. तेच्या आयला तेच्या गुगल बाईने आमचा पार बाजार उठवला. नशीब गाडी निघाली नाहीतर घोडे लागून आमचे आणि घडयाळाचे बारा वाजले असते. आधीच फार उशीर झालेला त्यात मुलींचे फोन येत होते. कुठे आहात.. आम्ही पोहचलो .. लवकर या .. नाश्ता खासा विनंती करून ठेवला आहे.. त्यांना काय सांगणार आमची आपबिती ! मला तर वाटत होतं, गाडी फसली आता दे धक्का होतोय की काय.. तसे जर झाले असते तर आमचे कपडे, एरियल पावडर मग घरी बायको फुल्ल ऑन धुव्वा धुलाई.. त्यात रिसॉर्टवर मुलींसमोर आमचा अवतार पांडुरंग झाला असता तो वेगळाच. जर गाडी नसती निघाली तर भालिवडी, पोटल, वैजनाथ, हुमगाव इथे आपली पोरं ओळखीची आहेत त्यांना सांगून गाडीला घोडा नाहीतर ट्रॅक्टर नक्कीच लावावा लागला असता. झाल्या प्रकारावर शिव्या मस्ती मजा करत अकराच्या सुमारास रिसॉर्टवर एकदाचे दाखल झालो. मुली आमच्या आधी येऊन नाश्ता उरकून निवांत, त्यांचे सात आठ रिल्स आणि दहा बारा फोटो काढून झाले होते.असो .. सर्वांची गाठभेट झाली. आम्ही आपले सारे घडलेले किस्से ऐकवत नाश्ता घेतला. रिसॉर्टच्या आवारात फोटो घेत असताना तिथले काका बाहेर आले आम्हाला बाहेर फिरायला जायला दोन पर्याय सुचवले. पेज नदी व वदप धबधबा. माझे हे दोन्ही ठिकाणं ट्रेक वेळी पाहून झाल्याने त्यात धबधबा म्हटलं की गर्दी आली त्यामुळे मला स्वतःला पेज नदी पर्याय ठिक वाटला पण मंडळी धबधब्या साठी उत्सुक होती. सर्वानुमते धबधबा ठरला. दोन गाड्या काढून निघालो. जायचे होते वदप पण माझ्या मनात पेज नदी म्हणून टर्न चुकवून मी गाडी पोटल मांडवणे दिशेने टाकली पुन्हा माघारी येत अर्ध्या तासात वदप मध्ये दाखल झालो. सह्याद्रीच्या अंगा खांदयावर या दिवसात वाहणारे पाण्याचे शुभ्र प्रपात. गौरकामत, वदप, ढाक हि सारी ठिकाणं माझ्या परिचयाची. दहा वर्षांपूर्वी जयेश सोबत याच भिवगड शेजारचा गाळदेवी घाट ते ढाक असा ट्रेक केला होता. त्याच्या आठवणीं जाग्या झाल्या. भिवगड डावीकडे ठेवून धबधब्या कडे निघालो, पावसाने जरा उसंत घेतली होती. हिरवागार निसर्ग भारीच. ते पाहून हि परीट घडीची शहरी मंडळी सुखावली. थोडीफार गर्दी होती, या पेक्षा आधी सुचवलेले बेलपाडा याहून नक्कीच कांकणभर सरस असा मनात विचार येऊन गेला. लोणावळा कर्जत भागात हल्ली वाढत्या गर्दीमुळे निसर्गात निवांतपण मिळत नाही म्हणून मला तरी गर्दी विरहित हटके ठिकाणं आवडतात पण काय करणार ग्रुपमध्ये सर्वानुमते निर्णय मान्य करून चालावे लागते, उगाच एकट्याने आडमुठे धोरण घेऊन इतरांना अडवण्यात काहीच हाशील नाही या मताचा मी. असो.. चिखल माती छोटे छोटे ओढे पार करून वाट वर चढू लागली. कुणावर चिखल तर कुणाची चप्पल सॅंडल बूट ओले खराब आता पावसात असे होणारच, पावसाळी सहलीला पूर्ण तयारीनिशी जावे लागते. मंडळ खूपच उत्साही होते, एकमेकाला आधार देत निसरड्या वाटेवरून जाऊ लागलो. आमच्यातील मनीषा अर्ध्यावरून माघारी खाली गेली. बाकीच्या मुली मात्र नेटाने जोर लावत वर आल्या. मेकअप,कपडे, चप्पल, सॅन्डल कसलीही पर्वा न करता त्यांचे असे बिनधास्त येणे मला तरी आवडले. असाच टीम स्पिरिट हवा. जवळपास तासभर मनसोक्त धबधबा आनंद घेऊन माघारी उतरलो. खाली मोकळ्या मैदानात रिल्स सुरु झाले, मुली आधीच एक्स्पर्ट त्यात आमची काही प्रॅक्टिस नाही यात वेळ बराच वेळ जाऊ लागला. मनात आले एवढा वेळ जर बाहेर घालवत आहोत तर रिसॉर्ट घेऊन फायदा काय ? जो तो मजेमध्ये प्रत्येकी हिशोब लावू लागला, रिसॉर्ट वाल्याचा किती फायदा झाला ते. अखेर रिल्स प्रकरण दोन वाजता संपवत रिसॉर्ट वर परतलो. तिथेही जेवणाच्या वेळेची नियमावली ती तर पाळावीच लागणार. सुदैवाने शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण रुचकर होते. ते आटोपल्यावर कपडे बदलून बाहेर गॅलरीत हवा खात बसलो. पोटभर जेवण आणि गार हवा तिथेच झोप काढली, तोवर मुली चेंज करून ४मिमी मेकअप करून बाहेर आल्या. आता तयारी होती ती विविध प्रकारची इनडोअर गेम्स खेळण्याची. आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा हा टास्क झाल्याशिवाय पिकनिक सुफळ संपूर्ण होत नाही. दोन टिम्स पडून कॅप्टन ठरवले गेले. विविध प्रकारचे हे गेम्स मुली शोधून आणतात त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच. आम्ही मुलं फक्त नियम ? ऐकत खेळायचे काम करतो. साहजिकच दोन टिम्स, मग हार जीत आलीच, त्यात थोडी खुन्नस, थोडी चिटिंग आणि भयानक आरडा ओरडा हा सारा मजेचा मसाला येतोच. पण यंदा मात्र आरओरड खूप जास्त झाली, कदाचित मला तसे वाटले असेल. पण आजवर शाळेत जेवढी झाली नाही ती कसर यावेळी भरून काढली. त्यात एक गेम असा होता स्वतः भोवती पंचवीस गोल गोल चक्कर मारायचे आणि दूर ठेवलेल्या A ४ कागदावर जाऊन उभे राहायचे जो कुणी कागदाच्या बाहेर जाईल तो बाद. मला मात्र या खेळात चक्कर आली, आधीच डोकेदुखी त्यात हि भर. सर्व काही फिरतंय, गरगरत आहे असेच वाटत होते. त्यात दोन्ही टिम्सचे कॅप्टन आणि काही गडी तावातावाने ओरडत, मोठं मोठ्याने भांडत होते. याचीच कमी होती माझे डोके आणखी सुन्न झाले. ऐन वेळी तृप्तीने रोल ऑन दिला तो डोक्यावरून फिरवला. मग चहाची वेळ कल्पनाने विनंती करून रिसॉर्ट मॅनेजरला चहा नाश्ता रूमवर आणायला सांगितलॆ पण त्यांनी ठाम नकार दिला शेवटी जयेश आवाज चढवून त्यांच्या सोबत वाद घातल्यावर चहा एकदाचा वर आला. चहा पिऊन आणि रोल ऑन इफेक्ट डोकं थोडे शांत होऊ लागले. चहा स्नॅक्स झाल्यावर पुन्हा रिल्स या मूळपदावर आलो. त्यात या पिकनिक मध्ये सर्वाना बाहेर काढायचे काम सुजाता ने केल्याबद्दल तिचा नारळ आणि रिसॉर्टचा टर्किश टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला. छान छान मनसोक्त रिल्स आणि फोटो काढून झाल्यावर निघायची वेळ आली. मयूरने अंजीर बर्फी व पल्लवीने डेरी मिल्क वाटून शेवट गोड केला.... निरोप घेतला तो पुन्हा लवकरात लवकर भेटायचं असे ठरवूनच.....
कसे असते ४३ ४४ वर्षे वयाची शालेय जीवनातील मंडळी एकत्र येऊन दंगा करतात. प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते ते तेव्हाच आणि तिथेच बाहेर येते जेव्हा आपलेपणाची जाणीव आणि भावना असते. One safeguard feeling .... आज ते पुन्हा सिध्द्द झाले....
योगेश चंद्रकांत अहिरे .















No comments:
Post a Comment