घोणसपूर तेलीसरी घाट व्हाया कांदाट
खोपी चकदेव महिमंडणगड पर्वत कांदाट या भागात अनेक वेळेस जाणं झाले. खेड खोपी रघुवीर घाट ते कोयनेच्या तीरावरील अनेक लहान लहान गावं खेडी भेट देत अगदी शिंदी, लामज, दरे तांब, गाढीवली, तापोळा ते चतुर्बेट, रेनोशी, बुरडाणी महाबळेश्वर असा फेरा पण मारला आहे.
जेव्हा जेव्हा निरपजी देवराई त थांबा घ्यायचो मन प्रसन्न होई पण त्या कांदाट खोऱ्यातून कोकणात चढाई उतराई चा योग जुळून येत नव्हता. यंदा मार्गशीर्ष महिन्यात तो घडवून आणला मायबोलीकर नरेश काका ने. प्रामुख्याने घाटावरील कांदाट, वळवण, घोणसपूर या गावातून कोकणात कांदोशी, धावडे भागात ये जा करण्यासाठी प्रामुख्याने नाळेची वाट,अंगठेसरी, तेलीसरी, धावडासरी या वाटांचा पूर्वापार वापर होत आहे. अर्थात आता रघुवीर घाटाचा गाडी मार्ग तसेच काहीसे दूर का होईना महाबळेश्वर पर्यंत झालेला कच्चा पक्का रस्ता यामुळे सद्य स्थितीत फार कुणी या वाटांवर फिरकत नाही. ट्रेक रूट ठरला घोणसपूर दाभे मोहन झाडणी कांदाट तेलीसरी कांदोशी. ठरल्या प्रमाणे रात्रीची महाबळेश्वर एस टी पकडून भल्या पहाटे वाडा कुंभरोशी उतरलो तेव्हा थंडी चांगलीच जोर धरू लागली होती. गणेश च्या टेम्पो मधून पार फाटा चतुर्बेट करत घोणसपूर पोहचेपर्यंत चांगलेच उजाडले होते. घोणसपूर मकरंदगडाच्या कुशीत वसलेली कोयनेतील टुमदार जंगम वस्ती. मकरंदगड त्याच्या पायथ्याशी गर्द झाडीतील भैरी मल्लिकार्जुन चे कौलारू राऊळ. माझा मकरंदगड या आधी तीन वेळा पाहून झाला असल्याने, बाकीच्या मंडळी सोबत राजेशच्या घरी गेलो. चहा नाश्ता होईस्तोर दोघे जण मकरंदगडावर जाऊन आले. दोन दिवसाचा लवाजमा पाठीवर घेत, बुटाच्या नाड्या बांधून घोणसपूरातून निघालो. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पुढे जात वाट उतरू लागली. घोणसपूर अंदाजे साडेतीन हजार फूट उंचीवर असावे तर दाभे मोहन अडीच हजार आसपास, थोडक्यात हजार तेराशे फुटाची उतराई. घोणसपूर समोर दक्षिणेला मोठं डोंगरी पठार त्या पल्याड उठावलेला थोरला पर्वत. मोठ्या हिरव्या गर्द झाडीच्या डोंगरी माथ्यावर पिटुकले झाडाणी. या दोन्ही मधील दरीत दाभे मोहन. तसेच ईशान्येला महाबळेश्वर खालच्या पातळीत मेटतळे गाव. पंधरा मिनिटांची वाट उतरत माळावर घेऊन आली. सकाळच्या कोवळ्या उन्हात वाळलेले गवत पिवळेधमक सोनेरी अधेमधे हिरव्या झुडुपांची छटा वर निळेशार स्वच्छ आकाश सारा लँड्सकॅप भारीच. फोटो काढत चालू पडलो, काटेरी झुडपे, करवंदाची जाळी काही ठिकाणी कारवी नंतर झाडी भरल्या वाटेने उतराई संपवत दाभे धनगर पाड्यात आलो. राजेशच्या घरातून निघून इथवर यायला कोळंब्याच्या दांडाने आम्हाला सव्वा तास लागला. दरीच्या मधोमध नदीजवळ असलेल्या पाड्याची जागा एकदम शांत व प्रसन्न. तिथल्या ग्रामस्थांनी प्रेमाने ताक प्यायला दिले. औट घटकेचा हा थांबा मला तर फारच आवडून गेला. नदी पात्र ओलांडून एक वाट सरळ गावाच्या दिशेने गेली तर उजवीकडील वाट चढणीला लागली. वरच्या टप्प्यात ओढ्याच्या बाजूने समांतर आडवी चाल. या भागात झाडोरा चांगलाच दाट, जावळीच्या या रानाची खरी मजा अनुभवत होतो. भर उन्हात देखील प्रकाशाचा कवडसा पडायची सोय नाही. वाटेतील दोन ओढे पार करून वरच्या भागात आलो. मोठ्ठाली अंजन बेहडा उंबराची झाडे ओंबळीच्या महाकाय वेलींचा पसारा. त्यात यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणामुळे वाढलेले गवत इतर झाडी पण भरपूर. अनेक ठिकाणी त्यामुळे वाट लुप्त होई पुन्हा मागे पुढे बायपास करत जात मुख्य वाटेला लागायचे. अशा वेळी वाट आणि दिशा अचूक ओळखण्याचा अनुभव कामी येतो. झेड आकाराची वळणं घेत छातीवरचा चढ संपवत भल्या मोठ्या दांडावर आलो. इथला चढ त्यामानाने काहीसा सौम्य तसेच वाट रुंद अशी. मला हा भाग पाहून सुधागड जवळील वाघजाई घाट आठवला पण तिकडे वाढलेली जंगलतोड त्या तुलनेत हा भाग तर वनआच्छादीत. अस्ते कदम पाठीवरचे ओझे सांभाळत बरीच उंची गाठली. मागे वळून पहिलं तर सुरुवात केली तो मकरंदगड घोणसपूर दरी पल्याड दिसू लागले. कधी काळी या भागात हिरड्याचं झाडे होती म्हणूनच गावकरी हिरडीचा दांड म्हणत असावेत. आता खुरट्या रानातून आडवी चाल, डावीकडील भातराशी डोंगराला वळसा घेत झाडाणी गाठायचे. प्रथमतः वाटलं हे तर झटपट होऊन जाईल, पण जसे आत जाऊ लागलो जावळीच्या दाट रानवाटांनी आपलं सामर्थ्य दाखवण्यास सुरुवात केली. 'येता जावळी जाता गोवली' हे पुरेपूर सिद्ध होत होते. लहानसा पण अरुंद घसारा वाला ट्रॅव्हर्स पार करत उजवीकडे शिरलो. वरच्या टप्प्यात कारवीचे रान ते पार करत जाताना एके ठिकाणी मधाची पेटी ठेवलेली आढळली दाभे व खालील वस्तीतील माणसं मधमाशी पालन साठी ठेवतात असे राजेश म्हणाला. काही अंतर जात एक वाट उजवीकडे खालच्या भागात वळाली, ती अंगठेसरी टॉप ला झाडाणी मार्गे जोडणारी वाट. कांदाट किंवा घोणसपूर रामरान अथवा झाडाणी अशा कोणत्याही ठिकाणाहून अंगठेसरीचा माथा गाठणं ही मोठी तंगडतोड म्हणावी लागेल. असो... जेवणाची वेळ होत आलेली नरेश काका आणि राजेश दोघांनी लहानश्या ओढ्याजवळ पाणी असलेली जागा शोधली पण सर्वांसाठी ती सोयीची वाटेना. तसेच पुढे चालू पडलो.आता जंगल जरी असले तरी वाट प्रशस्त होती त्यात काही ठिकाणी खुणांचे बाण तर कुठे फांदीवर रिबीन बांधलेली. वाटेत एका ठिकाणी काळी जांभळी विष्ठा आढळली बहुतेक अस्वलाची असावी ? या परिसरात जोर जांभळी पासून कोयना वारणा दाजीपूर पर्यंत त्यांचा वावर आहेच. तरी कुणी जाणकार असतील त्यांनी प्रकाश टाकावा ? भातराशीला वळसा घेत मजल दरमजल करत काही वेळानं मानवी वस्तीच्या खुणा नजरेत आल्या. सपाट मैदान, काटेरी कुंपण मग कुत्र्यांचे भुंकण्याचे आवाज, पुढे जात पक्के बांधकाम वजा बंगले काही घरं. पूर्वीचे झाडाणी आता विस्थापित झाले आहे. इथली शेकडो एकर जागा कुणा खासगी विकास व्यवसायिक इसमाने घेतली आहे. स्थानिक ग्रामस्थांचा फायदा होत निसर्गाचा समतोल साधून विकास होत असेल तर एकवेळ ठिक, पण पर्यावरणाची हानी करून नुसतेच रस्ते बंगले रिसॉर्ट बांधून काही हाशील नाही. असो... तिथेच मोठ्या पटांगणात उंबराच्या झाडानजीक पंगत मांडली जेवण अर्थात सर्वांनी घरातून आणलेले. जेवण मग विश्रांती झाल्यावर पुढचा पल्ला होता झाडाणी ते कांदाट उतराई साधारण हजार बाराशे फूट असावी. हल्लीच उत्तेश्वर झाडाणी पर्यंत कच्चा रस्ता झाला आहे त्यावरून काही अंतर जात उजवी मारली. पद्धतशीरपणे प्रशस्त वाट खाली उतरू लागली. पाच ते दहा मिनिटांत गर्द रानातील महादेवाच्या देवळा पाशी आलो. पत्र्याची शेड असलेला सभामंडप बाहेरच नंदी मंदिराच्या आवारात काही पुरातन शिल्प वीरगळी आणि बाजूलाच स्वच्छ पाण्याची विहीर. देवाला नमस्कार, पाच मिनिटांचा थांबा नंतर फ्रेश होऊन निघालो. जंगलातील वाट, खिंड, पठार, लहान लहान ओढे पार करत दरीच्या काठावर आलो. आता उलगडला तो कांदाट खोऱ्याचा परिसर… वाडी वस्त्या, निरपजी देवराई, नाळेची वाट, तेलीसरी, अंगठेसरी पश्चिमेस सुमारगड महिपतगड वायव्वेस कोंडनाळ जवळचे डोंगरं तर समोरच असणारा श्री शैल्य जोम मल्लिकार्जुन पर्वत, जंगल… दरी… खोरं… भुलवणारा रानवारा… हे सारं लाजवाब. झाडाणी ते निरपजी, कांदाट व उचाट या परिसरातील वाड्या वस्तींवर चार प्रचलित वाटांनी येजा करता येते. निरपजी जवळ उतरणारी देव धार त्या लगतची तांबट धार आम्ही उतरत होतो ती नेसपाच दार तर त्या पल्याड गणेश धार. मोठ्या रुंद गवताळ नेसपाच धारेने आमची उतराई सुरु होती. उजवीकडे तांबट धार व देव धार सहज ओळखू आल्या. बरोब्बर चार वाजेच्या सुमारास आम्ही कांदाट अलीकडील वाडीत उतरलो. या भागातील घरांवर कोकणी बांधणीची छाप. घर समोर तुळशी वृंदावन आंगण मागील बाजूस शेती गोठा तर या बॅकग्राऊंड वर झाडीभरले डोंगर. एकदम टिपिकल रेखाचित्र वा फोटोफ्रेम असेच काही. डांबरी सडकेने पंधरा मिनिटांत शाळेमागून जात गावात दाखल झालो. आज सकाळ पासून चाल १३ किमी पूर्ण झाली. राजेशच्या बहिणीकडे आमची खाण्यापिण्याची सोय झाली होती. फ्रेश होऊन चहा सूप ते झाल्यावर निरपजी देवराई. देवराईच्या मागील बाजूस चंद्रराव मोरेंच्या वाड्याचे अवशेष आहेत. मंदिर जीर्णोध्दारीत आहे मुंबई पुण्याकडे तसेच इतर ठिकाणी स्थायिक झालेले मोरे कुळातील सारेच दर्शनाला पूजाअर्चा साठी येत असतात. मोरे घराण्याची हि मूळ देवता. जावळीतील हे पराक्रमी मोरे घराणे बहामनी सुलतानच्या कालावधी पासून कार्यरत होते. कालांतराने ते आदिलशाहीत रुजू होऊन या भागाची जहागिरी पाहू लागले. महाराजांनी मोरे सरदारांना स्वराज्यात सामील होण्यास सांगितले होते. पण अनेक पिढ्या बहामनी आदिलशाही चाकरीत जहागिरी उपभोगलेले पराक्रमी मोरे जुमानले नाहीत. १६५६ मध्ये चंद्रराव मोरेंचा पराभव करून महाराजांनी जावळी स्वराज्यात आणली. रायरी पासून भोरप्या (प्रतापगड) ते वासोटा तसेच कोकणातील बराच मुलुख काबीज केला तर मुरारबाजी देशपांडे व काही इतर शूर मंडळी यात महाराजांना येऊन मिळाली. रात्रीचा मुक्काम निरपजी देवळात पडला. काही हौशी रात्री उल्कापात पाहायला उठले. अशा दूर रानांत निरर्भ्र आकाशात सारे तारकामंडल नजरेत पडले. सकाळी लवकर उठून आन्हिकं आवरुन पुढील पल्ल्यासाठी सज्ज झालो. आता कोकणात कांदोशी गाठायचे तेलीसरी घाटाने उतरून.आधी म्हणालो तसे कांदाट ते कांदोशी हे तेलीसरी, नाळेची वाट या वाटेने जवळ तर अंगठेसरी हा झाडाणी मार्गे लांबचा पल्ला. कांदाट हे तिन्ही बाजूने डोंगराच्या ओंजळीत वसलेले आहे. उत्तरेस झाडाणी उत्तेश्वर रांग, पश्चिमेला क्रेस्ट लाइनला उठावलेले डोंगर. तर दक्षिणेला पर्वत त्यावर कांदाटहून घोडेच दार आणि नांगल्याच दार या वाटांनी जाता येते. राजेशनं तेलीसरी गाठायला दोन पर्याय सुचवले एक मंदिरामागून नाळेच्या वाटेच्या दिशेने जात दोन टेकड्या पार करत माथा गाठायचा तर दुसरा म्हणजे नव्याने तयार होत असलेला रस्ता. कांदोशी ते कांदाट गाडी रस्ता प्रस्तावित आहे थोडक्यात पुन्हा विकास ? रस्ता निर्मिती होत असताना पाहिलेली मोठमोठ्या झाडांची कत्तल हे सारं भीषण ! पहिल्या मार्गाची चढ उतार तसेच वेळेचं गुणोत्तर लक्षात घेता आम्ही माती रस्त्याचा धोपट मार्ग धरला. गावातून वळणं वळणं घेत रस्ता वरच्या पातळीत जाऊ लागला खाली वाडी वस्त्या, निरपजी देवराई, नाळेच्या वाटेकडील भाग तर वायव्वेला अंगठेसरी दिसू लागले. सकाळच्या वेळात चांगली लय गवसली. दिड तासात दोन मैल अंतर कापून,आम्ही तेलीसरी खिंड गाठली. या भागात घाटवाटेला सरी म्हणतात कोवळ्या उन्हात खिंडीत गार वारा चांगलाच जाणवत होता. कांदोशी पर्यंत अंदाजे दोन हजार फुटांची उतराई सहज असेल. दिशेनुसार अंदाज घेतला तर तेलीसरी दोन डोंगरांच्या मधून उतरत नॉर्थ वेस्ट जाते, सहाजिकच उन्हाचा त्रास नाही तसेही या भागात झाडांचे प्रमाण जास्तच.असो.. सुरुवातच अत्यंत उतार व घसारायुक्त, फांद्यांचा आधार घेत सरकलो. टप्पा टप्प्याने वळणं घेत काही भागात फरसबंदी वाट. मोठ्या दांडाच्या घळीतून अगल बगल देत वाट उतरू लागली. कुठेही दृष्टीभय नाही बऱ्यापैकी रुळलेली, कोणत्याही ऋतूत ये जा करण्याजोगी. दाट झाडीचा टप्पा झाल्यावर पुन्हा घसरण इथेही मिळेल तसा वेलींचा फांदीचा आधार. कुणीतरी ग्रुप आधी या वाटेने गेले त्यांनी साडी वा ओढणी सारखे कापड सपोर्ट साठी बांधून ठेवलेले. तसेच वाटेवर बाणांची खूण सुध्दा केलेली. इथेही झाडोरा बराच त्यात काही ठिकाणी झाडे मोठ्या फांद्या उन्मळून पडलेल्या त्यांना बायपास करत वेळेप्रसंगी ओलांडत वाट काढावी लागे. तेलीसरी अर्ध्याहून अधिक उतरल्यावर उजवीकडे अंगठेसरीची वाट पूर्ण दृष्टीक्षेपात येते. त्याचा माथ्या लगतचा एक भाग अंगठ्या सारखा भासतो कदाचित त्यामुळेच अंगठेसरी हे नाव पडले असावे का ? काही ठिकाणी नाळेतून आत बाहेर करत पदरासारख्या भागात आलो. डावीकडे वळत मुख्य दांडावरून उतराई काही अंतर गेल्यावर खालचा कांदोशी कडील भाग दिसू लागला. रान विरळ होत उतरण सौम्य झाली. गायी गुरांचे शेणाचे पो तर काही ठिकाणी फांदी तोड आढळली हे सारं गाव वस्ती जवळ आल्याची खूण असते. बऱ्याच चालीनंतर खाली मोठा ओढा त्यापलीकडे कांदोशी व तेथील रामवरदायनी देऊळ दिसू लागले. ओढ्यात अजूनही वाहते पाणी त्याला बांध घालून अडवलेले. अंघोळीचा मोह झाला पण साडेबारा एकच्या सुमारास खेड एसटी पकडणं महत्वाचे होते. मोह आवरत नव्याने बांधायला घेतलेल्या सडकेने अर्ध्या तासात रामवरदायनी मंदिरात आलो. मागे पडलेले मंडळ यात अंतर पडले परिणामी वेळ जास्त खर्च होऊन एसटी नाही मिळाली. नरेश काकाने खेड पर्यंत टेम्पोची सोय फोनाफोनी करून केली. टेम्पो येई पर्यंत हाताशी वेळ होता मग तो मंदिराजवळील बारामही गोमुख मधून येणाऱ्या पाण्यानं सर्वानी अंघोळ करून घेतली. ट्रेक सुफळ संपूर्ण होत अंगाला चांगलीच तरतरी आली. सकाळी गावातून निघून कांदोशीत घाट उतरून यायला साडेचार तास व अंतर अदमासे ९ किमी भरले. खेड गाठून साडेचार वाजेची शिवशाही ? एसटी मिळाली. खेड मधून निघेपर्यंत साडेपाच वाजले. याला कारण एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार. पुढे माणगाव इंदापूरची महाभयंकर वाहतूककोंडी ठरलेली. रायगड जिल्ह्याच्या या टप्प्यात अनेक वर्षे झाली तरी काडीभर सुधारणा नाही. मागच्या छान तीन दिवसांच्या आठवणीवर हि कडवट परिस्थिती. हल्ली ट्रेक पेक्षा जास्त वेळ हा रहदारी प्रवास यातच वाया जातो. दरवेळी काहीतरी पर्यायी मार्ग काढू, पुन्हा मनाची समजूत घालत रोजच्या रुटीनला कंटाळून या साऱ्या वर मात करत ट्रेक वा प्रवासाला निघतो तोच खरा भटक्या.
योगेश चंद्रकांत अहिरे







































नेहमीप्रमाणे, सुरेख वर्णन!
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteयोगेश सर, आपली ओळख नाही पण तुम्हाला गेल्या वर्षापासून facebook वर follow करतोय. छान blog असतात तुमचे. विशेषतः तुमच्या सारख्या जुन्या पिढीचे. मागच्या वर्षी पाडव्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या मित्रासोबत कांदोशी - अंगठेसरी - झाडणी - नळीची वाट - कांदोशी असा circuit केलेला. पाळंदे काकांच्या चढाई-उतराई मधील लेखांचा प्रभाव तर आहेच. पण मी मूळ खेडचा असल्याने मला खेड कडील पूर्वेचा भाग प्रचंड जिव्हाळ्याचा आहे. पुण्याला शिक्षण-नोकरी असल्याने दर वेळी घरी जातो तेव्हा ट्रेक शक्य नाही झाला तरी गाडीने खोपी, आंबवली रस्ता धरतो. मी माझ्या विशीत आहे त्यामुळे शक्य होईल तेवढी सलग आणि लांब पल्ल्याची भटकंती कायम खुणावत असते. नोकरी मुळे दरवेळी शक्य होत नाही पण प्रयत्न चालू आहेत. पुन्हा कधी खेड जवळ असाल तर नक्की संपर्क करा. तुमच्या सोबत गप्पा मारायला आवडेल मला.
ReplyDeleteधन्यवाद अपूर्व... नक्कीच भेटायला आवडेल.
Deleteजावळीच खोरच भन्नाट आहें.
ReplyDeleteत्या परिसरातील ट्रेक तर जबरदस्त आहेत.👌👌
लेख छान लिहला आहें.
धन्यवाद प्रमोद भाऊ
Delete