Tuesday, 16 January 2024

Tamhini

   ताम्हिणी परगणा 


        गेल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसाच्या शिडकाव्याने वातावरणातील मळभ दूर झालं. हवा कमालीची स्वच्छ व निरभ्र आकाश. 
त्यात सूर्यनारायण मकर राशीत प्रवेश करत उत्तरायण सुरू होणार. मार्गशीर्ष संपून पौष महिना सुरू झालाय. या दिवसात ट्रेक करायला फार परिश्रम पडत नाहीत. सहाजिकच बहुतांश कसलेले ट्रेकर मोठेमोठे जंबो किंवा मेगा ट्रेकचे प्लान करतातच. आल्हाददायक प्रसन्न वातावरण या दिवसातील जमेची बाजू. आम्ही पण हिच संधी साधून गाडी ताम्हिणी घाटाच्या दिशेने दामटली. 
यंदा नियोजन होते ते लेंड घाटाने उतराई करून सवत्या घाटाने आदरवाडी गाठायचे. या वेळेस सोबतीला माझी छोटी चारू, विनायक व हेमंत.    
     
 सकाळी ट्रेक सुरू करायला अंमळ उशीरच झाला. तास दिड तासाची चाल, उजव्या हाताला विंझाई, हौदाचा डोंगर, गरूडमाची व कॅमलबॅक मागे टाकत डोंगरवाडी धनगर पाड्यात आलो. 
सह्यकड्यानजीक व टाटाच्या भिरा जलविद्युत प्रकल्प जवळच असलेला चार पाच उंबर्याचा हा पाडा. एका स्वच्छ घराच्या अंगणात नाश्त्यासाठी थांबलो. 
बाॅईल अंडी, खजूर, काकडी व मोड आलेले कडधान्य. पौष्टिक नाश्ता झाल्यावर वेद लागले ते लेंड घाटाचे. याच पुरातन घाटाच्या वाटेला अगल बगल देत मुळशी ताम्हिणीतून भल्या मोठ्ठाल्या पाईपलाईन कोकणात भिरा गावात उतरल्या आहेत. हा सारा टाटाचा जलविद्युत प्रकल्पाचा भाग. सह्याद्रीतील पाणी घाटमाथ्यावर अडवून त्यात गुरुत्वाकर्षण पध्दतीने कोकणात दोन अडीच हजार फूट खाली उतरत टर्बाईन च्या सहाय्याने वीजनिर्मिती करणे. 
सह्याद्रीत असे काही प्रकल्प आहेत. जसे घाटघर चोंढे उर्ध्व भंडारदरा, कुसूर भिवपुरी, खंडाळा खोपोली, ताम्हिणी भिरा ते कोयनानगर पोफळी इ.असो... धरण वीजनिर्मिती प्रकल्प हा भाग सरंक्षण दृष्ट्या प्रतिबंधित क्षेत्रात येतो. सहाजिकच परवानगीशिवाय आत घाटाच्या माथ्यावर जाता येणार नव्हते. मनात धाकधूक होती. सोबत असलेल्या मामांनी तिथल्या सिक्युरिटी गार्ड ला बरीच विनंती केली. तो स्थानिक ग्रामस्थ असल्याने प्रयत्न म्हणून त्याने वरिष्ठ अधिकारी ला फोन लावला. फायदा तर झाला नाहीच उलट त्यालाच झापून काढले. परवानगी नाही मिळाली. अशा रितीने लेंड घाटाचा प्लान रद्द करावा लागला. शेवटी नियम व चौकटीत राहून ट्रेक करायचे त्यात रितसर परवानगी सुरक्षा फार महत्त्वाची. असो....
आता माझ्या डोक्यात चक्र फिरू लागली what next ? फक्त सवत्या घाट करायचा जरी ठरवले तर पुन्हा दिड तास मागे आदरवाडीत जावं लागणार यात वेळ व अतिरिक्त श्रम पडणार. दुसरा पर्याय सरळ पुढे जात परातेवाडी, प्लस व्हॅली करत 'मिल्कीबार' हल्लीच नामकरण होऊन प्रसिद्ध झालेला धबधबा जो देवकुंड वरच्या भागात येतो. पण तिथवर जाणं ही सद्यस्थितीत वळसा फेरा घालून वेळ जाणार. तिसरा पर्याय जो लागलीच शिक्कामोर्तब केला तो म्हणजे 'कॅमलबॅक' व 'हौदाचा डोंगर'.. ताम्हिणी घाट चढून आल्यावर कोंडेथर ते आदरवाडी पुढे प्लस व्हॅली व निवे पर्यत मोठी डोंगर रांग माथ्यावरील रस्त्याच्या उजवीकडे दिसते. घाटाचा माथ्यावरील रस्ता साधारण सोळाशे ते सतराशे फूट तर या विंझाई व हौदाचा डोंगर याची सरासरी ऊंची अडीच ते तीन हजार फूट. 
थोडक्यात या डोंगर माथ्यावरील चढाई हजार बाराशे फूट सहज भरते. गरूडमाची अलीकडे एक प्रशस्त रूंद वाट रानात शिरते. सुरूवातीचे जंगल छानच. वीस पंचवीस मिनिटात जंगलातील चढाई संपवून वाट खिंडी सारख्या एका जागेवर आली. डावीकडे कॅमल बॅक वर चढणारी वाट पकडली. निमुळती होत गेलेला डोंगर त्यावर दोन ऊंचवटे. उंटाच्या पाठीसारखे भासतात म्हणून हा कॅमलबॅक. 
चढाई काहीशी घसारा मिश्रित त्यात दोन्ही बाजूला दरी. जिथवर विनासायास जाता आले तिथवर गेलो. मोठ्या ऊंच टेपाड वर जाण्यासाठी सुरक्षा म्हणून रोप हवा. ठिसूळ कातळ व प्रचंड स्क्री. कॅमलबॅक वरून समोरच असलेल्या टाटा वीजनिर्मिती प्रकल्पाचे छान दर्शन होते. सवत्या घाटाचा भाग तर उत्तरेला प्लस व्हॅली कडील बाजू त्यामागे सिनेर खिंड ते अंधारबन पर्यतची रांग. 
निवांत फोटोग्राफी करून माघारी खिंडीत आलो. समोरच्या डोंगरावर मळलेली वाट टप्पा टप्प्यात वर घेऊन गेली जोडीला विजेचे खांब होतेच. 
डोंगराच्या पठारावर येऊन ताम्हिणी च्या दिशेने गेलेली मळलेली वाट सोडून उजवीकडे हौदाच्या डोंगराची दिशा धरली. आम्ही सोडली ती मुख्य वाट म्हणजे डोंगरवाडी ताम्हिणी ट्रेक रूट. याच वाटेला पुढे जात समोरच्या डोंगरधारेला आडवं ठेवत थेट निव्यात पण उतरता येते. 
आता आम्ही होतो तिथून हौदाचा डोंगर व आमच्यात पठारावरील एक मोठी टेकडी होती क्रो फ्लाय किंवा क्रेस्ट लाईन धरून गेलो तर अंतर खुपच कमी पण तसं करता येणे शक्य नाही कारण वाटेतील चढ उतार व घनदाट झाडोरा. 
 सरळ सोपा मार्ग म्हणजे जेवढं चढून आलो अगदी तितकीच उतराई करून समोरच्या दरीत उतरून मग उजवी मारून हौदाच्या डोंगराची चढाई. पठारावर भर उन्हात वारा होता. स्वच्छ हवा व वातावरणाचा हा परिणाम.घसरड्या वाटेने कारवीच्या गच्च रानातून उतराई सुरू केली. 
मामा व मी पुढे सरकत वाट काढू लागलो तर विनायक व हेमंत चारूला सावकाश सोबत घेत उतरू लागले. उतार तीव्र असल्याने पाय स्थिर थांबत नव्हते. त्यात काही ठिकाणी कारवीच्या फांद्यांवरील चिकटपणा अंगाला बोचू लागला. पुर्ण कपडे चिकट झाले त्यावर पालापाचोळा व माती चिकटू लागली. पाऊण तासात उतराई संपवत खाली माळरानावर आलो. दुपार व त्यात जेवणाची वेळ झालेली काही अंतरावर ओढा दिसत होता.  मधला झाडीटप्पा पार करून पाणवठ्यावर आलो. आम्ही आता ओढ्याजवळ माळरानात चारही बांजूनी डोंगराने वेढलेल्या जागी होतो. दूरदूर पर्यत मानवी वस्तीचा ठावं नाही. समोर पश्चिमेला हौदाचा डोंगर, दक्षिणेला विंझाई, उत्तरेला आम्ही आलो ती डोंगररांग तर मागे पूर्वेस ताम्हिणीत धावणारी डोंगर वाट. स्वच्छ जागा पाहून पिण्याचे पाणी भरून घेतले तर काही अंतर जात हातपाय धुवून अंगाचा चिकटपणा घालवला, एकदम फ्रेश. भर उन्हात काठावर असलेल्या झाडांची सावली घेत येणारं पाणी अगदी थंडगार. 
जेवणासाठी या पेक्षा शांत निवांत प्रसन्न जागा नाहीच. पंगत बसली जेवण अर्थातच घरून आणलेले. भरपेट जेवण झाल्यावर लहानशी पाॅवर नॅप त्यामुळे आणखीनच उत्साह आला. ओढा सोडत, मुख्य वाट धरून हौदाचा डोंगर टारगेट केला. 
हि मुख्य वाट म्हणजे ताम्हिणी आदरवाडी ट्रेक रूट. खरंतर सरत्या पावसात सोनकी, कारवी व विविध फुलांचे तांडे पाहत या भागातील पठारावर भटकायला नक्कीच मजा येईल. डोंगरवाडी निवे, ताम्हिणी आदरवाडी व ताम्हिणी धामणव्हळ हे सारं फारच रमणीय असणार यात शंकाच नाही. 
सुरूवातीला मोकळी वाटणारी वाट नंतर अरूंद होत झाडीत शिरली. बहुतेक ठिकाणी वेली व फांद्या काडक्यांचा पसारा फार कुणी फिरकत नसल्याचा परिणाम. अधेमध्ये रानडुक्कर नी उकरलेली जागा. भुसभुशीत माती मग घसारा मग लहानमोठे कातळटप्पे. मजल दरमजल करत धापा टाकत एकदाचे वर पोहचलो. माथ्यावर पिवळं गवत माजलेले अस्पष्ट अशी वाट मामांनी अचूक हेरली. गवतातून जाताना खालची दगडं व खड्डे लक्षात येत नव्हते उगाच पाय मुरगळायची भिती म्हणून सावकाश पावलं टाकत होतो. मधला मोठा घसरडा गवताचा टप्पा व राॅकपॅच हून ट्रेव्हर्स मारत काहिशा सपाट जागेवर आलो. 
इथून जे दृश्य दिसले ते खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारे. स्वच्छ हवेत वायव्वेला सरसगड सुधागड पासून side angel चा तैलबैला. उत्तरेस हिरडी, म्हतोबा डोंगर ते सिनेर खिंड अंधारबन परिसर. खाली पूर्ण ताम्हिणी घाटाचा झाडीतून वळणं वळणं घेत जाणारा काळाकुट्ट डांबरी रस्ता, लेंड घाट व धरण प्रकल्प. सकाळी आम्ही होतो तो कॅमलबॅक तर आता फारच बुटका वाटू लागला.ईशान्येस निवे कडे धावत गेलेली डोंगर रांग तर पूर्वेच्या डोंगरधारेवर ताम्हिणी धामणव्हळ खिंड, दक्षिणेला विंझाईचा थोरला डोंगर व पल्याड दिपदरी. बराच वेळ ते सारं पहात राहिलो. मामांनी वरच्या टप्प्यातून आरोळी दिली तेव्हा भानावर आलो. वर जाऊन पहातो तर कातळ गुहेत खोदलेली ओळीने तीन स्वच्छ पाण्याची टाकी. 
अशा आड नीड जागी मानवनिर्मित खोदलेली टाकी पाहून अचंबित झालो. मामांनी त्या टाक्यांचा संदर्भ पांडवांशी लावला, पूर्वी गावकरी इथे नियमित यायचे. खरतर याचे स्थान मोक्याचे कधीकाळी गाडी रस्ता होण्यापूर्वी कोकणातून सवत्या, लेंड वा सातपायरी घाटातून आदरवाडीत येऊन हा डोंगर ओलांडून ताम्हिणीत जाताना वाटेत जाताना हि पाण्याची सोय. तसेच दुय्यम जरी असेल तरी चौकीचे स्वरूप नक्कीच या हौदाचा डोंगराचे असावे. 
वेळेचे भान ठेवत पुन्हा तोल सांभाळत कसरत करत खाली उतरून उजवी मारली गवताळ टप्प्यातून आडवी चाल थोडाफार चढउतार करत विंझाई डोंगराच्या खिंडीत घेऊन आली. इथे डावीकडून आलेली वाट ताम्हिणीतून, आम्ही आलो ती डोंगराची वाट तर सरळ चढून जाणारी वाट विंझाई डोंगरावर दिपदरीच्या दिशेने गेलेली. चौथी वाट उतराई ची जी थेट आम्हाला खाली डांबरी रस्ता पार करून आदरवाडीत घेऊन जाणारी. 
प्रशस्त टप्प्यात उतराई अगदी घडीव बांधीव वाटावी अशीच वाट.
पण हल्लीच वाढलेल्या गर्दीमुळे ताम्हिणी विंझाई हा पावसाळी रूट, त्यामुळेच ठिकठिकाणी अनेक प्लास्टिक बाटल्यचा खच. हि बाब मनाला खटकली. 
सुर्यास्त पाहत खाली उतरू लागलो. पायथ्याच्या दाट झाडीतून काही मिनिटातच विंझाई देवीच्या मंदिरात आलो. 

 देवीचे दर्शन घेऊन आदरवाडीत परतत ट्रेक पूर्ण केला. घड्याळात पाहिलं तर दहा तासात, चढाई उतराई ची, निवांत पंधरा किलोमीटर ची हाईक झालेली.. 

                                    योगेश चंद्रकांत आहिरे  

No comments:

Post a Comment