Monday, 24 September 2018

Tukaram


कथा तुकारामाची ..... एक शिकवण

        मी निखिल आणि सतीश तिघेही पहाटे निघालो, ठरलेल्या ठिकाणी पुण्याहून आलेले राजेश व अनिल जॉईन झाले. वाटेत नाश्ता पुढे थोडीफार रहदारी आणि खड्डे युक्त रस्ता यामुळे गावात पोहचेपर्यंत नऊ वाजले. ज्यांच्या अंगणात गाडी लावली तेच पोलीस पाटील निघाले. विचारपूस नंतर पाणी वगैरे झाल्यावर आमचा बेत सांगितला. या भागातल्या किल्ल्यांना खूप आधी भेट दिली होती, पण इथल्या पुरातन घाटवाटा आमच्यापैकी कुणाच्याही झाल्या नव्हत्या. त्यामुळे टेरेन तसा नवीन तसेच या सप्टेंबर अखेरच्या दिवसात फारशा वापरात नसलेल्या वाटेवर रान माजलेले. अशा वेळी वाढलेल्या झाडी गवतातून अचूक वाट काढत सोबतीला स्थानिक माहितगार वाटाड्या घेणं फायदेशीर ठरतं.
        ट्रेक ठरवत असताना प्रिती सोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा तिने इथल्या तुकारामाचे नाव सुचवलं होतं. त्यानुसार पोलीस पाटील काकांना तुकारामचे घर विचारून निघालो.
घरात आवाज दिल्यावर एक जण बाहेर आला, तुकाराम तुम्हीच का ? विचारल्यावर म्हणाला, बाबा कामावर गेले आहे. 
मी : गेले दोन तीन दिवसापासून त्यांचा फोन लावतोय लागत नाहीये.
मुलगा : इथे नेटवर्कचा प्रोब्लेम हाये.
मी : ते कामावर आहेत तर सोबत कोण येईल ? दुसरं कुणी जाणारं आहे का ? 
मुलगा : गावात गणपतीमुळे सध्या कुणी भेटणं मुश्किल, आता कुणी त्या वाटेला जात नाहीत. लय गवत वाढलं असेल आता.
आमचं संभाषण ऐकत अंगणात दात घासत बसलेले काका मध्ये पडले, बघा तुकाराम येतो का, नाहीतर वरच्या धनगर पाड्यातून कुणाला तरी लावून देतो. पण त्याची थोडीफार मजुरी देऊन टाका. योग्य सोबत मिळाल्यावर वाजवी दरात पैसे देण्यासाठी आमची काहीच हरकत नव्हती. वाटाड्या त्याचे पैसे इतर अनेक बाबी याबद्दल माझे मत आधीच्या लेखात मी मांडले आहेच.... असो तर.
चर्चा सुरू असताना काही मंडळी जमू लागली, तू जातो का.. हा जाईल का... तो बरोब्बर नेईल यांना.. तो घरात नाही... मीच आलो असतो मला बाहेर जायचं आहे ते अगदी पाय दुखतात अशी बरीच कारणं ऐकायला मिळाली. दोघं तिघ मुलाला म्हणाले, बघ जा बाबाला घेऊन ये सांग त्यांना मुंबईहून पाव्हणे फिरायला आले आहे.
"तुम्हाला वाटेत नदी पलीकडे फार्म हाऊस नाय दिसला का तिथेच बाबा कामाला आहेत" असं मुलगा म्हणाला. त्याला समजावलं, अरे वाटेत बरेच काही दिसतं मला कुठे माहित आणि कसे समजणार ! 
चला तुमची गाडी काढा आपण त्यांना घेऊन येऊ. यावर मी राजेश यांना बाईकवर मुलासोबत पाठवले. तो पर्यंत एका घरातून चहा आला सोबत गप्पांमध्ये तेच विषय जुन्या वाटा, सध्याची परिस्थिती, कामधंदा, शिक्षण वगैरे. अर्ध्या तासात टिबल सीट तुकारामांना घेऊन आले. काळा सावळा रंग, उंच शिडशिडीत, थोडा कडक आवाज, हाफ चड्डी आणि टी शर्ट घातलेले तुकाराम टुणकन खाली उतरून आम्हाला बघायला आले ते ओरडतच मंबईहून पाव्हणे आले या मला भेटायला. जवळ जाताच थोडा भपकारा आला, थोडक्यात तुकाराम ऑन ड्युटी विमानात होते. खास आमच्यासाठी गेट पास घेऊन आले असच म्हणावे लागेल. मग त्यांना मुंबईच्या प्रितीने तुमचा नंबर दिला आमचे काही मित्र बऱ्याच वेळा इथे येऊन गेले आहेत. हो हो ! मी ओळखतो मागं दोन मुली आल्या होत्या, असे काहीतरी म्हणाले. त्यांच्याशी वाटा आणि आमच्या नियोजनात ठरलेल्या चढाई उतराई बद्दल बोललो. थोडक्यात अवघड वाटेने वर जाऊन आरामशीर वापरात असलेल्या वाटेने जुन्या खुणा न्ह्याळत खाली येणे. मामांनी अवघड वाट या दिवसात भारी पडेल, गवत वाढलं असेल तसेच भरपूर चालायला लागेल अस काहीबाही सांगितले या सर्व शक्यता आम्ही गृहीत धरल्याच होत्या. सरत्या पावसात सह्याद्रीत फिरताना हे लक्षात घेऊन तशी तयारी ठेवावीच लागते. तुम्ही फक्त सोबत वाट दाखवा आम्ही बरोबर येऊ. तुकाराम मामा फुल्ल शर्ट फुल्ल पँट व डोक्यावर हॅट घालून त्यांच्या मागे आम्ही पाच जणं. निघणार तितक्यात नारळाचा विषय, 
तुम्ही नारळ आणलाय का नारळ !
देवाला नारळ वाहायचा आहे की नाही !
आम्ही समदे जेव्हा जेव्हा जातो तेव्हा नारळ देतो !
सुरुवातीला गड किल्ल्यांवर तिथल्या देवाला बहुतेक वेळा नारळ फोडायचो पण हल्ली त्यात घाटवाटेच्या ट्रेकला नारळ सहसा नाही नेत. मामांनी पुन्हा खाली गावात नारळ आणायला पिटाळले. दहा वाजता गावातून एकदाचे निघालो. दोन चार पावलं जात नाही तर लगेच मामा 
तुम्ही जेवण संगती घेतलंय ना !
नाहीतर घरात सांगतो भाकरी द्यायला !
त्यांना आम्ही घरातून जेवणाचे डबे आणले आहेत हे पटवून दिले. तरी मामा सांगत, 'बघा तुम्ही आमचे पाव्हणं, माझ्याकडे कोंबडा आहे कोंबडा चांगला अडीच किलोचा मस्त खाऊ आणि मजा करून इथेच झोपू बोला काय म्हणताय !' त्यांना कसे तरी गप्प करून, विषय बदलून पुढे नेत होतो. सतीश आणि एक दोघे मामांची बडबडीला वैतागून पुढे जात होते. त्यात मामांनी मी मुंबईला कसा डॅशिंग होतो आणि बरेच काही सांगितलं. खरंच कधी कधी वाटाड्या घेण्याचा हा ड्रॉबॅक असतो असं मला तरी वाटतं. कारण कोण कसं निघेल काहीच सांगता येत नाही.
भात खाचर आणि फार्म हाऊस पार करून ओढ्याच्या कडेने बैल गाडी जाईल अश्या कच्च्या रस्त्याने बडबड करत पाऊण तासात धनगर पाड्याजवळ पोहचलो.
साधारण वीस पंचवीस घर असावीत. पश्चिमेला सह्याद्रीची मुख्य रांग त्याची एक सोंड टप्याटप्याने या धनगर पाड्यात उतरलेली, हीच आमची परतीची घाटवाट. 
तुकाराम मामांची अखंड बडबड सुरूच त्यांचे विमान जोरात होते. प्रत्येक घरात याला त्याला मोठ्याने आवाज देत, सुरुवातीला मजा वाटली पण नंतर मात्र विचित्र वाटू लागले. 
हऱ्या.. चाल रे !
राजा.. चाल रे सोबत पाव्हण्यांना xxx घाटाने न्यायचे आहे. 
मग त्यांनी आणखी दोघा तिघांना विचारलं. त्यांचे ओरिएंटेशन आणि तिथल्या स्थानिक धनगरांचे सांगणं यात तफावत वाटली. मामांना स्पष्ट विचारलं तुम्ही आधी नक्की गेला आहात ना ? 
हो तर, ऐका तुम्हाला बरोबर घेऊन जाणार !
मी पंधरा वर्षांपूर्वी गेलो आहे तरी तुम्हाला घेऊन जाणार ! पंधरा वर्ष.. प्रिती तर आत्ताच येऊन गेली तिने खुद्द यांच्या सोबत ट्रेक केला मग हा माणूस असा काय बडबडतोय. पूर्ण शुद्ध हरपली वाटतं. बोलताना मामांची जीभ फार जड झाली. हा सारा प्रकार पाहून आम्हीही गोंधळात पडलो. आसपास बरीच गर्दी जमू लागली, बहुतेकांचे मत पडले अवघड वाटेने जाऊ नका. तुकाराम मामा त्या वाटेला मधूनच कुठेतरी घुसून अमका पट्टी तमका दांड असं काहीतरी बडबडत पण तिथल्या एका दोघांनी त्यावर ती वाट फार मागे राहिली आता वाढलेल्या रानातून फेरा पडेल असे सांगून नकार दिला. आपली नेहमीची वाट करून देवाचं दर्शन घेऊन या हेच त्यांचे मत पडले. खरं तर आम्ही चढाई करणार होतो तो घाट काही फार अवघड मुळीच नाही फक्त चिंचोळ्या धारेवरची वाट आणि कुठं तरी आधाराला लावलेली लाकडाची मोळी. या दिवसांत आम्ही तिथून जाऊ शकू का ! या बद्दल धनगर पाड्यातील मंडळी साशंक होती आणि त्यात सोबतीला असे तुकाराम मामा. थोड पुढे जात आदिवासी वस्तीच्या वाटेवर काही मुलांचा घोळका आम्हाला पाहून थांबला. त्यातील एक दोघे सांगू लागले तुमच्या सारखे येतात आम्ही त्यांच्या सोबत जातो. त्यांच्याशी वाटेची माहिती घेऊन नावं विचारली तर त्यातील एक मुलगा तुकाराम नावाचा. मनात शंकेची पाल चुकचुकली त्याला जरा बोलत केल्यावर त्याने मोबाईल मध्ये काही फोटो दाखवले ते पाहून पुरता हादरलो. मुंबई आणि पुण्याचे घाटवाटा करणारे बरेच मित्रांचे फोटो. थोडक्यात प्रितीने दिलेला नंबर तो या तुकारामाचा निघाला आणि इथे फोन लागू शकत नसल्यामुळे हा गोंधळ झाला. २१ वर्षीय तुकारामाला या भागाची इथल्या वाटांची अचूक माहिती. त्यालाच सोबत येण्यासाठी विचारलं ते पाहून आधीचे तुकाराम मामा पण त्याला, चाल रे ! चाल रे ! विनवण्या करू लागले. त्याला काही कामानिमित्त बाहेर जायचे होते तसेच गणपती असल्याने त्याच्या सोबतच्या मित्राने पण नकार दिला. धनगरपाडा सोडला की हाकेच्या अंतरावर आदिवासी वस्ती. तिथे सुध्दा तुकाराम मामा एक दोघांना हाका मारत होते, मला ओढून वस्तीतला सार्वजनिक गणपती दाखवत फिरवून आणले. सर्वच विचित्र, या साऱ्या गोंधळात वेळ विनाकारण जात होता आणि पुढचा पल्ला लक्षात घेत ते परवडण्यासारखे नव्हते. अगदी शेवटच्या घरातून पिंट्या हा तुकाराम मामाच्या गळाला एकदाचा लागला. बरं त्याच्याशी तरी वाटेबद्दल नीट बोलावं काही विचारावं तर मामा घाई करून त्याला घेऊन पुढे निघाले सुध्दा. आमची मंडळी या प्रकाराला वैतागून थोड अंतर पुढे जाऊन थांबली होती. पिंट्या त्यांच्या सोबत झटपट पुढे, वस्तीच्या मागे झाडी भरली रुंद सोंड काही ढोर वाटा चुकवत उजवीकडून वळणं घेत टप्याटप्याने उंची गाठत होतो. या दिवसात निसर्ग पूर्ण बहरलेला त्यात फोटो ब्रेक घेत सोबत मामांची अखंड बडबड यामुळे पिंट्या आणि आमचे काही भिडू यात अंतर वाढले. मागं राहिल्यामुळे वाटेत अनेक वाटा चकवा देऊ लागल्या मामांनी एक दोन ठिकाणी थोड चुकवून अंतराचा फेरा वाढवला. मग पुन्हा तेच सुरू ..
पिंट्या ये पिंट्या !
अरं थांब !
कुठं जाशील पळून ! 
पण एका गोष्टीची कमाल वाटली, वाट चुकून पिंट्याला आवाज देऊन किंवा माघारी येऊन मूळ वाटेवर आल्यावर म्हणायचे.
अरे ही वाट झाली आता, आधी इकडून होती ना! अश्या काही प्रसंगाने आमची हसता पुरेवाट होई.  मध्येच एके ठिकाणी मामांचा पाय दगडात अडकून ते पूर्ण ३६० अंशात फिरले मग पुढे सुरू झाली "भ" ची बाराखडी. आता मात्र त्यांचे दिशाज्ञान जे काही होते नव्हते ते पूर्ण भरकटले. प्रिती ताईची शिती ताई आणि पंधरा वर्षाचे पंचवीस वर्षे झाली. थोडक्यात मामांचे विमान पूर्ण हवेत. जंगल पट्ट्यातून वर चढाई करत मोकळं वनात आलो. सर्वांना थांबवत इथे काय तो निर्णय घ्यायचा, त्यानुसार पाहिलं काम मी पिंट्या सोबत चर्चा केली. तुकाराम मामा आता फुल्ल आऊट ऑफ.
आमच्या नियोजन प्रमाणे ज्या वाटेने चढाई करायची होती ती वाट आता आमच्या डावीकडे आणि आम्ही होतो उजवीकडच्या बाजूला, थोडक्यात उतराईच्या वाटेवर. या दोन्ही वाटेच्या मधोमध दरी, आता दरी ओलांडून समोर जाणे किंवा पदरातून जंगलात शिरून आडवी मारत जाणे हे दोन पर्याय होते. पण वाढलेलं जंगल त्यात वाटा शोधायला होणारा त्रास आणि आता पर्यंत गेलेला वेळ या सर्व बाबी लक्षात घेत पुन्हा खाली धनगर पाड्यात जाऊन कुणी तरी माहितगार सोबत घेण्याचं ठरलं. कारण चर्चे दरम्यान पिंट्या प्रामाणिकपणे म्हणाला मला शेवटच्या टप्प्यातील वाट माहित आहे पण या बाजूने मी कधी गेलो नाहीये. वरतून एकदा अर्ध्यातून फिरून आलो होतो. तुकाराम मामा उगाच त्याला मधेच तोडत तू चल रे मी यांना या दरीत उतरवून समोरच्या धारेला लावतो. काय मोळी बिळी नसेल तर मी यांना खांद्यावर घेऊन चढेल उतरेल. हे ऐकून मला जॉनी लिव्हरचा एका चित्रपटातील डायलॉग आठवला, "समान तो उठा लेंगे पर आपको कोण उठायेंगा". घडल्या प्रकरणावरून हे तर पक्के होते की तुकाराम मामा या भागात खरंच गेल्या काही वर्षात आलेच नाहीत. मी पिंट्या आणि अनिल आम्ही तिघे खाली निघालो, तुकाराम मामांना पुढे नेण्यात काही अर्थ नव्हता कसं तरी त्यांना खाली येण्यासाठी तयार केले. भराभर उतरत पंधरा वीस मिनिटात धनगर पाड्यात आलो. थेट २१ वर्षीय ओरिजनल तुकारामाचे घर गाठले. चौकशी केली असता कळले की तो नातेवाईकांसोबत बाहेर निघून गेलाय. त्याच्या दारात आम्हाला पाहून बरीच मंडळी जमली, घडला सारा प्रकार त्यांना सांगितला. काही बायका तर ऐकून पदरात तोंड लपवत फिदीफिदी हसायला लागल्या. सल्ले बरेच मिळाले पण सोबत कुणी नाही. पुन्हा जायला निघालो तेव्हा तुकाराम मामा पाड्यात आले. ते स्वतः म्हणाले, अरे तुम्ही भराभर पुढं निघून आला, मी मागं राहून चुकलो ना रे ! हे ऐकून तर आम्हाला खूपच हसू आले आम्ही पुन्हा सांगितलं मामा तुम्ही थांबा इथेच आम्ही येऊ जाऊन. त्यावर मामाच म्हणाले, "मी नाही येत, आता इथंच झोपतो मी !" अगदी सुटका झाल्यासारखे वाटले.
     ताबडतोब निघून आम्ही तिघेही वरच्या पदरात सर्व थांबलेले त्या ठिकाणी आलो तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते. निम्म्याहून अधिक दिवस हाथातून गेल्यातच जमा होता. सर्वाची मतं मत मत विचारात घेत समोरची घाटवाट रद्द करत. आम्ही होतो तीच वाट करून पुरातन कुंड आणि देवाचं ठाण पाहून सायंकाळी पाचच्या सुमारास गावात परतलो. पोलिस पाटील व बाजूच्या काकांना तो पर्यंत सारा घडला प्रकार समजला होता. मग चर्चा, पुन्हा लवकरच येणं होईलच त्यांचा निरोप घेऊन परतीच्या वाटेला लागलो. 
या ट्रेक मधून काय शिकायला मिळालं हा एक मोठा प्रश्न ?
आपण नेहमी ट्रेक दरम्यान काय काय केलं, कसे गेलो कसे आलो, काय अडचणी आल्या त्या सारून ट्रेक कसा यशस्वी पूर्ण केला हेच लिहितो. अर्थात बरीचशी मंडळी हेच करतात.
पण.. पण… एखादी फिस्कटलेली अथवा अपयशी ठरलेली मोहीम अर्थात अपयश किती सकारात्मक पाहतात याला सुध्दा महत्व आहेच. 
हा वरील घडला प्रकार आम्हाला मात्र खूप साध्या आणि छोट्या गोष्टी शिकवून गेला. मोठ मोठ्या गोष्टींचे नियोजन करताना एखादी लहानशी चूक ही किती भारी पडू शकते याचं हे उत्तम उदाहरण. 
वाटाड्याचा संपर्क जो या ट्रेक मध्ये फार महत्वाचा होता. जसे आधी म्हणालो होतो, वेळ, स्थळ काळ परिस्थिती, नवखा प्रदेश, सुरक्षितता, अभ्यास आणि अनुभव या सर्व बाबी विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला होता.  
साधी सोपी गोष्ट. एखाद्याचा फोन नंबर घेताना काय काय लक्षात असू द्यावे याचं उत्तम उदाहरण हा आमचा ट्रेक.  मेनेजमेंट मध्ये कम्युनिकेशन स्किल हा एक फार महत्वाचा भाग. यात प्रामुख्याने सहा गोष्टी सेंडर - एन्कोड - मेसेज- डिकोड- रिसीव्हर- फिडबॅक हे सहाही घटक अतिशय महत्त्वाचे. यातला एक जरी कमजोर अथवा गेला तर सारं गडबडणार. हेच आमच्या बाबतीत झाले. एखाद्यानं समोरच्याला माहिती देताना त्याला समजेल अशा भाषेत सांगणं म्हणजेच एन्कोड, तो दिलेला मेसेज व्यवस्थित समजून घेणं हे झालं डिकोड. दोघांनी शेवटी एकमेकांना समजले आहे असे कळवणे म्हणजे फिडबॅक. 
मूळ व्यक्तीचे नाव पूर्ण नसणे.. समोरच्याने पण विचारलं नाही. त्या व्यक्तीचे वय, तरुण आहे की वयस्कर, नक्की कुठे राहतो काय करतो, ते अगदी एखादा फोटो सुद्धा हल्ली मिळवणं शक्य आहे. वरकरणी पाहता हे साधं वाटत असले तरी आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. 
यात कुणावरही व्यक्तिशः टिका अथवा निंदा करायचा मुळीच हेतू नाही तसेच कुणाबद्दल कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक राग लोभ नाही. जे घडलं त्या पासून बोध घ्यावा यासाठी हा खटाटोप. 

योगेश चंद्रकांत आहिरे. 



No comments:

Post a Comment