Tuesday, 6 September 2016

Kusur & Saidongar

सह्याद्रीतील दोन सह्यसुलभ घाटवाटा 'कुसुर' आणि 'साईडोंगर'


                'दुरवर बघण्याच्या नादात, जवळचे मात्र राहून जाते.' हे मात्र अगदी बरोबर. लांब पल्ल्यांचे ट्रेक करायच्या नादात जवळचे काही आड मार्गाचे ट्रेक राहिलेच होते. त्यात जवळचा मुरबाड परगणा तर माझा आवडताभीमाशंकर ते नाणेघाट’ या पट्ट्यातले बहुतांश गडकिल्ले आणि प्रचलित सर्व घाटवाटा पालथ्या घालून झाल्या पण तितकाच जवळचा ‘लोणावळा ते भीमाशंकर’ आणि कर्जत भागात राजमाची, ढाक बहिरी, कोथळीगड, तुंगी भीमाशंकर सोडले तर पलीकडे गेलोच नाही.
       या २०१६ च्या नाखिंडाच्या (वाद्रें ) भेटीतच, कोथळीगड त्याला जोडणारी कौल्याची धार, उत्तरेला वाजंत्री-खेतोबा, दूरवर भीमाशंकर तसेच दक्षिणेला कुसुर पठार त्या पलीकडे भलेमोठे ढाकचे पठार हा सर्व नजारा खोलवर सामावून घेत ठरवले या भागातल्या घाटवाटांना भेट द्यायलाच हवी.
त्यानुसार जूलै महिन्यातचभिवगड-गाळदेवीघाट ढाक’ असा मजेशीर ट्रेक करून झाला. मग या वेळी ठरले तेकुसुर’ भागात जाण्याचे. ‘भिवपुरी’ तेकुसुर’ हा तर पुर्वापार चालत आलेला प्राचीन घाटमार्ग. पण नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे या घाटवाटेला जोडून दुसरी घाटवाट करता येईल का या विचारात होतो. कुसुर गावाच्या पुढे सावळा गावातून फेण्यादेवी घाटाने खाली उतरता येते पण तो दुरचा मार्ग, आम्हाला एका दिवसात शक्य नव्हता आणि नुसतीत फऱफट धावपळ टाळून, प्राचीन वाटांचा मागोवा घेत, मुक्तपणे श्रावणसरी अनुभवायच्या होत्या. अशावेळी मदतीला आले तेप्रसाद तांदळे’ आणियतीन नामजोशी’ दोघे मातब्बर असे सह्याद्रीत अट्टल मुरलेले भटके या दोघांच्याही घाटवाटा विषयाबद्दलच्या अफाट अनुभवाला तोड नाही. अवघ्या तीनच मिनिटाच्या संभाषणात मला साईडोंगरघाट हा कुसुर घाटाला जोडून एका दिवसात व्यवस्थित करता येईल असे सांगितले. मग काय लगेहाथ प्लान फायनल करून टाकला, ‘हुमगाव- साईडोंगर घाट- कुसुर -कुसुर घाट- भिवपुरी’.
      शनिवारी सकाळी :३० च्या सुमारासविवेक’ आणिमी’ कल्याणहून निघून, बदलापूरलासुनिल’ उत्तम’ यांना एकत्र भेटून आम्ही चौघेही सुनिलच्या गाडीतून पाईपलाईन रोड पकडून वांगणी - नेरळ करत पुढे डिकसळच्या अलीकडे चांधई, भिवपुरी रोड ओलांडून मुरबाड कर्जत रोडवर आलो, पुढे थोड अंतर कर्जतच्या दिशेने जात डावीकडे टाटा पॉवर हाऊस चा रोड पकडला, तो सरळ भिवपुरी गावापर्यंत. भिवपुरी गावात शिरताच इतिहासकालीन अष्टकोनी तलावाचे दर्शन झाले.

    हा तलाव सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनी त्या काळी ७५ हजार रूपये खर्च करून बांधला आहे, हल्लीच सुशोभिकरणाचे काम केले गेले आहेतलावाजवळच गाडी लावूनहुमगाव’ कडे निघालो. सगळीकडे हिरवा नजारा…… शाळेत असताना माझा आवडता ऋतु अर्थातच सर्वचवर्षा ऋतु’ या विषयावर लिहीणार, मग त्या निबंधातले  नेहमीचे ठरलेले वाक्य 'पावसाळ्यात जणू भुमीने हिरवा शालु पांघरला असतो' पण खऱच त्यात श्रावणात तर या सृष्टीसौंदर्याला खरी बहार येते, अनेक वनस्पती, विविध फुले, रानभाज्या यांचा तर हा हंगाम. अशा वातावरणातील भटकंतीत एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते, यासाठीच आमच्या सारखे भटके पुन्हा पुन्हा नवनवीन संधी शोधतच रहातात. भुरभुर पाऊस साथीला हजरच होता, काही ठिकाणी गावतले शेतीच्या कामात मग्न होते. वीस मिनिटाच्या चालीनंतर हुमगावात पोहचलो.


गावात नेहमी प्रमाणे विचारणा झाली, कुसुरला जायचे आहे, असे सांगितल्यावर चेहर्यावर थोडे आश्चर्यमिश्रित भाव, कारणकुसुरघाट सरळ खाली भिवपुरीत आला मग तिकडून जायचे सोडून इकडून का बरं जाताय ?’ मग आम्हाला इथल्या साईडोंगरघाटाने कुसुर ला जाऊन मग प्राचीन कुसुरघाटाने भिवपुरीत उतरायचे आहे असे सांगावे लागले. गावातूनसोपान बार्शी’ सोबत येण्यास तयार झाला, यतीन कडूनच त्याचा नंबर घेतला होता पुन्हा एकदा यतीनचे आभार. हुमागावातून पाण्याच्या क्यानलच्या कडेने जात सिमेंटचे साकव ओलांडून थोडं अतंर पुढे जात डावीकडची छोटी वाट पकडली.
सरळ पुढे गेलो तर पोटलवाडी पाली गावात पोहचू. पहिल्यांदाच इथे येणार्यांनी नवख्यांनी गावातून सोबत माहितगार जरूर घ्यावा अन्यथा इथे सुरूवातीलाच वाट चुकून भटकायला भरपूर वाव आहे. वेळेचे गणित चुकवून विनाकारण शारिरीक श्रम आम्हाला तरी नको होते. खुद्द पोटलवाडीतला एक जण गौराई आणि इतर फुले तोडण्याच्या नादात साईडोंगर आणि पलीकडच्या ढाकपठाराखाली असलेल्या जंगलात काही दिवस असाच भटकत राहिला होता, ईति सोपान.
वाट हळूहळू दक्षिणेकडे जात तिरकी चढू लागली. काही वेळातच लहानश्या पठारावर आलो, आता मात्र सह्याद्रीच्या माथ्यावरचे ढग विरळ झाले होते, आम्ही माथ्यावर वाट कुठे निघते याचा अंदाज घेत होतो. सोपान म्हणाला त्याप्रमाणे उजवीकडच्या खिंडी अलीकडे मध्यभागातून वाट वर जाणार.
उजवीकडून सौम्य चढण चढू लागलो एकदम मस्त मळलेली वाट कुठेही छातड्यावरची चढाई नाहीच.
गावातले लोकं दरवर्षी आळंदीला या वाटेने दिंडी घेऊन जातात. तसेच बोलताना सोपान ने या वाटेतल्या बहिरी देवाचा उल्लेख केला, वर चढताना डावीकडच्या झाडीभरल्या पदरात दूरवर भगवा झेंडा दिसला. तिथे जाण्यासाठी मुख्य वाटेपासून पदरात डावीकडे एखाद दीड किमी अंतर चालावे लागणार होते, पण असे अचानक समजलेले पुरातन गावकरींचे निसर्गातले श्रध्दास्थान बघता जाणे तर शक्यच नाही. मग काय डावीकडे वाट वाकडी करत वाटेतले दोन छोटे ओढे ओलांडून त्या कातळातल्या देवाच्या ठाण्यावर पोहचलो.
सुरूवातीलाच अगदी छोट्टासा धबधबा, पाठीमागे नैसर्गिक लहान कपारीत (अगदी रामघळीची छोटी आवृत्ती) दगडाला शेंदुर फासलेला देव. खाली सपाट जमीन. समोर त्रिशुळ घंटा काही नारळाच्या करवंट्या पण आजुबाजूला बर्यापैकी स्वच्छता. कदाचित पिकनीक छाप बेताल बेधुंद, पर्यंटकांपासून दूर राहिल्यामुळे असेल पण अगदी प्रसन्न वातावरण. इथेच विवेकला चहा करायची हुक्की आली. चहासाठीचे सर्व सामान त्याने सोबत आणले होते. मग काय होऊन जाऊदे, भर पावसात चुल मांडून काही तिकडे पडलेल्या मोजक्याच काड्याकाटांनी विस्तव करून कोरा का होईना पण चहा तयार केलाच.
चहा तयार होईपर्यंत मी आणि सुनिल त्या छोट्या धबधब्यात जाऊन आलो.
पण चहा खऱच फर्मास झाला होता. पण या मंदिर- चहा- ब्रेक यात एक तास खर्च झाला, सोपानच्या मते अजुन निम्मी चढाई बाकी होती. पुन्हा परतीला मुख्य वाटेकडे निघालो, मध्येच अरूंद तिरकी वाट वर चढताना दिसली 'या वाटेनेसुध्दा वरच्या ट्रेव्हर्सच्या टप्प्यात थेट जाऊ शकतो पण पावसामुळे कातळ शेवाळलेला आहे' असे सोपान म्हणाला. मुख्य वाटेने चढाई सुरू केली, माथ्याकडे पाहून वाटलं फार तर अजुन तासाभरात वर पोहचू पण बहुतेक वेळा घाटवाटेत दिसतं तस नसतं याचा प्रत्यय आम्हाला आलाच.
वाट उजवीकडे वळून तिरकी हळूवार चढत डावीकडच्या छोट्याशा ट्रेव्हर्सी वर आली इथेच मघाशी सांगितलेली वाट मुख्य वाटेला मिळाली.
मंदिरापासून इथ पर्यंत यायला पाऊण तास लागला. मध्येच पावसाची उघडीप त्यातून जमेल तसे फोटो घेणे सुरू होते. शेवटची चढण पार करून माथ्यावर दाखल झालो. उजवीकडचे दोन मोठे धबधबे, धुक्याचा खेळ पहातच राहिलो.
पावसाच्या ऋतूत सुध्दा घाटवाटेची चढाई करताना घाम निघतोच, पण माथ्यावर मात्र वातावरण लगेच बदल जाणवतो. एकदम थंडगार फुल्ल फ्रेश, वारा असल्याने गवताची पाती तर भारीच डोलत होती. पुढे एका ओढ्याजवळ विसावलो, कुसुर गावातल्या धनगर मंडळी सोबत राम राम शाम शाम झाले. पंधरा मिनिटाच्या सपाटीवरच्या चालीनंतर कुसुर गावात पोहचलो तर दोन वाजत आले होते.
एका घरात पाणी पिऊन खांडीच्या दिशेने निघालो. खऱतर आम्हाला नियोजनानुसार खांडीकडे जाण्याची काहीच गरज नव्हतीपण आंध्र जलाशयाचा फुगवटा पहाण्यासाठी दोन तीन किमी चाल वाढवली. जलाशयाच्या काठावरच दुपारचे सोबत आणलेले जेवण केले, सोबत होता अंगावर शहारे आणणारा थंडगार वारा आणि धुक्याने भारावलेलं वातावरण.
जेवण करून निघताना दोघे जण भेटले कुठलीतरी रानभाजी घेऊन विकायला खाली माळेगावात निघाले होते, घड्याळात तीन वाजून गेले होते. माझ्या डोक्यात लगेच चक्र सुरू आत्ता हे माळेगावात उतरणार म्हणजेच हे 'फेण्यादेवी' ने जाणार लगेचच त्यांच्यावर माझा प्रश्नांचा मारा सुरू, एवढा बोजा, लांबची वाट, पोहचणार कधी ? कारण फेण्यादेवीची सुरूवात तर 'सावळा' पासून, इथून सावळा तर - किमी सहज, नंतर बोलताना समजले फेण्यादेवी सावळा अलीकडे आणखी दोन वाटा कोकणात उतरतात. मग काय ' मन में लड्डू फुटा' अशी माझी अवस्था. पुढच्या ट्रेकचा रूट मनोमन गिरवून टाकला. परत आल्यावाटेने कंटाळवाण्या डांबरी रस्त्याने कुसुरगावाअलीकडे थेट पठारावर दाखल झालो. मागे वळून पाहिले असता जलाशयावर ढगांची गर्दी जमू लागली होती. आता लक्ष्य होते ते प्राचीन कुसुर घाटातून उतराई. बोरघाटात गाडीमार्ग तयार होण्याआधी कर्जतहून तळेगाव पुणे प्रातांत जाण्यासाठी कुसुरघाट हा प्रचलित मार्ग होता. १८-१९ व्या शतकात या घाटात २०० रूपयांची जकात वसुल मग तिचा वापर घाटाच्या देखभालीसाठी केला जाई. हि सर्व माहिती आधी वाचली असल्याने त्या बद्दलची कुतुहलता आणखीच वाढली होती. हिरव्यागार पठारावरून चालत कड्यावर आलो.
कड्यावर हे एकटेच आपलेवन ट्री हिल’ च्या पोझ मध्ये लगेच फोटो टिपला.
खाली डोकावले तर सरळसोट सोंड उतरत भिवपुरी गावाच्या दिशेने झेपावलेली दिसली.
डावीकडे आम्ही आलो तो मार्ग खाली पाली, पोटलवाडी, हुमगाव, वैजनाथ आणि  सरळ रेषेत खाली भिवपुरी सहज नजरेत आले उजवीकडे उत्तरेला टाटा पॉवर आणि पाईपलाईन मात्र धुक्यात लपले होते. खऱतर प्राचीन कुसुरघाट ज्या वाटेने बैल आणि घोड्यांवरून वाहतूक चालायची ती वाट उजवीकडून वळसा घालून समोरच्या पदरात उतरली आहे. पण आता मात्र माणुस जाईल अशी सरळसोट सोडेंची वाट थेट भिवपुरी गावात उतरली आहे, अर्थातच वाटेत ठिकठिकाणी मुख्य वाट या वाटेला मिळतेच.
आम्हीसुध्दा याच वाटेने छोटासा कातळटप्पा आणि तीव्र उतार पार करून पुढे लहान शिडीने उतरून त्या घसरगुंडी सोंडेने खालच्या पदरात आलो. वाटेत जनावरांना बांधण्यासाठी धनगराचे झाप दिसले. थोडावेळ पठारावर पश्चिमेकडे ऊन पावसाचा खेळ पाहत रेंगाळलो.
अजुन निम्मी उतराई शिल्लक होती त्यात सायंकाळचे पाच वाजून गेले होते. या दिवसात सायंकाळी सात वाजेपर्यंत पुरेसा उजेड असतो पण थंडीच्या दिवसात मात्र वेळेचे काटेकोर नियोजन हवे नाहितर अंधार पडल्यावर फसगत होण्याची शक्यता अधिक. त्या उतरणीच्या वाटेवर भराभर पावले टाकत मध्येच एखाद्याची घसरगुंडी होई. मध्येच मुख्य घाटाची वाट दगडी रचाई, तसेच मैलाचे दगड नजरेत आले. पुढे थोडं उजवीकडे जात साधारण निम्मा घाट उतरल्यावर घाटतल्या पुरातन पाण्याचा टाक्यांजवळ पोहचलो ओळीने पाच टाकी कातळात खोदलेली आहेत.
प्राचीन काळी वाहतूक राबता असताना येणारे जाणारे वाटसरूंसाठी हे पाण्याचे नियोजन. काही वेळातच धुके हटले, समोर पाहिले तर टाटा पॉवर स्टेशन आणि घाटावरून आलेली मोठ्ठी पाईपलाईन.
फोटोग्राफी करून पुढच्या तासाभरात भिवपुरी गावात दाखल झालो तेव्हा सायंकाळचे सात वाजत आले होते. श्रावणसरी अनुभवत एका दिवसात दोन प्राचीन घाटांचा दमदार ट्रेक झाला.
सोपानचे आभारप्रदर्शन करून पुढच्या भटकंतीचे मनसुबे रचत परतीच्या प्रवासाला लागलो.



                                                                 योगेश चंद्रकांत आहिरे






























7 comments:

  1. वा.. उत्तम प्लान आणि छानच लिखाण.

    ReplyDelete
  2. वा.. उत्तम प्लान आणि छानच लिखाण.

    ReplyDelete
  3. कुसुम घाटात नक्की पाणटाक्या किती आहेत?कारण मी व मित्राने खांडीघाटाने चढाई करुन जेव्हा कुसुर घाटाने उतरलो तेव्हा ओळीत चारच टाक्या आढळल्या.पाचव टाक दिसलंच नाही.पाचव्या टाक्याविषयी मनात संभ्रम आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ज्ञानेश्वर. प्रतिसाद द्यायला उशीर झाला. गावकरी कुसूर घाटातील टाके पाचटाकी म्हणून सांगतात किंबहुना तसेच बोलतात. त्यावेळी पावसात असे वाटलं की पाचव टाकं थोड्या अंतरावर असून कदाचित बुजले असावं. आता गेल्या महिन्यात पुन्हा एकदा जाऊन त्या भागात नीट पाहिलं तर ओळीने चारच टाकी आता दिसतात.

      Delete
  4. 👌👌.17 जुलैला शनिवारी हुमगावात वेगळी वाट मिळेल या आशेने गेलो.पण कुसुर सोडुन कुठलीच वाट नसल्याने भिवपुरीला जाऊन परत कुसुरघाटाने वर गेलो.ही वाट याआधी ३-४वर्षापुर्वी केली होती.उतरताना मिरदीच्या वाटेने उतरलो केली.मिरदीच्या वाट पालीगावात जाते आहे.हुमगावात जाण्याची काहीच गरज नाही असं मला वाटत.वाटाडया म्हणुन सोपान बार्शीचा उल्लेख इथली मंडळी आवर्जुन घेतात.नंतर भेट घेउनच त्तयाची.तस ही गाव आसपासच आहेत.कुठुनही जाता येत.पण पालीतुन वाट सरळ.मला मिरदेची उर्फ साईडोंगराची वाट खुप आवडली.मळलेली व कुठेही चकवा न देणारी.पोटलमधुन शेणख‌ईचा ओहोळ वाटही रिक्क्षातुन येताना रिक्षावाले भाऊंनी दुरून दाखवली.पण मिरदेची वाट मनाला भावली.

    ReplyDelete