Wednesday, 17 February 2016

Fort Kanhergad


किल्ले कण्हेरगड

हल्ली मी जेव्हा कधी नाशिकला जातो, तेव्हा त्या भागातला एखादा तरी किल्ला पाहण्याचे पुण्य पदरात पाडून घेतोच. या वेळी सुध्दा मनसुबा तसाच होता. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही कामानिमित्त नाशिकला जाणे झाले.
        
नाशिक म्हणजे कोणत्याही अट्टल दुर्गप्रेमींचा विक पॉईंट असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सातमाळा सेलबारी-डोलबारी, त्र्यंबक - ईगतपूरी  .अशा रांगेत अनेक मातब्बर किल्ले वसलेले आहेत.
सुदैवाने वेळ मिळाला आणि साथीला संदिप आणि धनंजय (दोघे ही नाशिकस्थित माझे मामे भाऊ). माझ्या सोबत येण्यास तयार झाले. त्यात संदिप आणि मी नाशिक भागातले बरेच ट्रेक एकत्र केले आहेत. धनंजय मात्र ट्रेकची सुरूवात होती.मग काय लागलीच दोन पर्याय तयार
) पेठ सुरगाणा बाजूचे सोनगिरी, खैराईगड आणि वाघेरा.
) कण्हेरगड
वातावरण , प्रवासमार्ग, प्रत्यक्षात किल्ले चढाईला लागणारा वेळ या सर्व शक्यता लक्षात घेता , पर्याय दोन निवडला.
इतिहासाचा साक्षीदार, सातमाळ्यातील दुर्लक्षित रत्न कण्हेरगड. सकाळी सकाळी दोन बाईक, नाशिकच्या गुलाबी थंडीत दिंडोरी - कळवण मार्गावर दौडू लागल्या.
डावीकडे रामशेज किल्ला कोवळ्या उन्हात न्हाऊन निघाला होता. गेल्या २०१५ ची सुरूवात याच रामशेज ने केली होती, आणि योगायोग म्हणजे २०१६ ची सुरूवात पण कण्हेरगड. पुन्हा नाशिक परगणा, क्या बात है !


वाटेत डावीकडे मोहनदर उर्फ शिडका चे दर्शन झाले, लगेचच फोटो घेतला. नांदुरी आणि कळवण च्या मध्ये अठंबा नावाच्या गावापासून उजवीकडे सादडविहिर साठी वळालो.


सादडविहिर हे कण्हेरगडाच्या पायथ्याजवळचे गाव. (डावीकडे विशिष्ट खाच असलेला कण्हेरगड )
गावात मोतीराम पवार यांच्या अंगणात बाईक ठेवून कण्हेरगडाच्या दिशेने चालायला सुरूवात केली.


        याच कण्हेरगडावर एक वेगळाच इतिहास घडलाय. साधारण १६७१ च्या सुमारास मोगलांचा सरदार दिलेर खान बागलाण प्रांतात दाखल झाला होता. साहजिकच अत्यंत कडवा आणि हट्टी असा दिलेरखान कण्हेरगड घेण्यासाठी चालून आला. त्यावेळी  मराठ्यांची फौजेची संख्या होती फक्त सातशे. याच फौजेचे नेतृत्व करत होता तो शुर रामाजी पांगेरा.  अवघ्या सातशे मावळांसह रामाजी पांगेरा दिलेरखानाच्या हजारोंने असलेल्या फौजेवर तुटून पडले. तुंबळ युध्द झाले. मोगली सेनेचा अक्षरश: धुव्वा उडवला. मराठ्यांनी विजयश्री खेचून आणली.
त्या इतिहासाची साक्ष देत उभा असलेला हा कण्हेरगड.
खरोखरच कसे घडले असेल हे, काय काळ असेल तो. हिच ती खिंड हाच तो किल्ला. काळ जरी बदलला तरी भौगोलिक परिस्थिती फारशी बदलत नाही. खरच काय बोलावे काय लिहावे हेच सुचत नाहिये……..


             गावातून एक रस्ता पिंपरी गावाकडे जातो, त्याच रस्त्याने पुढे चालत उजवीकडे कण्हेरगड आणि त्या लागूनच असलेला डोंगर यामधली खिंड दिसली.
मळलेल्या पण भुसभुशीत मातीच्या पाऊल वाटेने अर्ध्या तासात खिंडीत पोहचलो. वाटेत गावातली शाळेतली चार मुलं भेटली. 'कुठून आलात, किल्ल्यावर जाताय चला आम्ही पण येतो'. खिंडीत जरा विसावा घेतला.
खिंडीपलीकडून कण्हेरवाडी गावात जाता येते. कण्हेरवाडी आणि सादडविहीर या दोन्ही गावातून येणार्या वाटा याच खिंडीत येऊन मिळतात.  इथून पुढे गडाच्या सोडेंवरच्या उभ्या चढाईला सुरूवात झाली.
सुरूवातीला बघून फुटकळ वाटणार्या या वाटेने चांगलाच दम काढला. नवख्या धनंजय ला तर चांगलीच धाप लागून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचा सोबत हळूहळू ती मुरमाड घसरडी वाट पार करून पडक्या बुरूजापाशी आलो.

भर उन्हात त्या घसरड्या वाटेची चढाई करून चांगलाच घामटा निघाला. पूर्ण उजाड आणि ओसाड वाटेत कुठेही झाड नाही. पुढे गेल्यावर थोड्या सपाटी नंतर एक कोरडे टाके आणि पुढे गडावरचे सुंदर असे नेढे.
नेढ्याच्या सावलीत वारा खात बसलो. दुपारचा एक वाजत होता, मग तिथेच सोबत आणलेला जेवणाचा डबा फस्त केला. सवयी प्रमाणे पाण्याचा भरपूर साठा बरोबर घेतल्यामुळे खुप फायदा झाल
तासाभराच्या विश्रांतीनंतर गडमाथ्याकडे निघालो. कातळकड्याला चिकटून डावीकडून पायर्यांच्या मार्गाने माथ्यावर दाखल झालो.
समोरच हे खांब ? नजरेत भरले पण प्रयोजन काय ते कळले नाही. दरवाजा असू शकेल पण तसेही वाटत नाही अर्थात तिथून चढता उतरता येते पण मुख्य वाट त्याचा बाजूने वर चढते. गडाला बर्यापैकी सपाट माथा लाभला आहे.  गडाच्या गवताळ माथ्यावरून सातामाळा रांगेतले बहुतेक किल्ल्यांचे तसेच चौलेर दूरवरचा साल्हेर सालोट आणि जवळच असलेला प्रेमगिरी सहज ओळखता आले. पण सावलीसाठी मोठ्या झाडांची वाणवाच. थोडाफार असलेला वारा हिच काय ती जमेची बाजू. सहा सात पाण्याची टाकं,
पडक्या वाड्यांचे अवशेष. तुळशी वृंदावन, शिव पिंड आणि नंदी.
गडाच्या पश्चिम टोकाला धोडप आणि पिसोळ किल्ल्यावर आहे तशीच खाच नजरेस पडते. समोरच्या पठारापलीकडे मार्कंड्या आणि सप्तश्रुंगी लगेच ओळखता आले.
सोबत आलेली हि चौकडी डावीकडून निलेश, दुर्गेश, राहुल सुनिल

मग आमचाही एक फोटो, डावीकडून संदिप, अस्मादिक आणि धनंजय.

या टाक्यापलीकडे रावळ्या जावळ्या.
माथ्यावर फेरी मारून थोडे खाली उतरून गडाच्या गुहेत आलो. गुहा भूमिगत प्रकाराची वाटली.
गुहेसमोरच सातमाळ्यातील मुकुटमणी किल्ले धोडप. त्याच्या पलीकडे ईखारा, कांचना, आणि डोळे बारिक करून ईंद्राई, चांदवड यांचे दर्शन झाले. गुहेतून खाली कण्हेरवाडी, नरूळ ही गाव दिसतात. पुन्हा माथ्यावर आलो. आल्या मार्गाने उतरायला सुरूवात केली.

त्या घसरड्या वाटेने सावकाश उतरत सायंकाळी पाच वाजता गावात परतलो. वाटेत रस्त्याच्या कडेला माझी बाईक उभी करून कण्हेरगडाचा एक फोटो घेतला.
पुन्हा एक दमदार दुर्ग दर्शन करून प्रसन्न आणि रोमांचित होऊन परतीच्या प्रवासाला लागलो.


                                                            योगेश चंद्रकांत आहिरे










8 comments:

  1. मस्त रे याेगेश भाऊ..कण्हेरच्या चरणी ४ वेळा लीन झालाेय..फक्त धुरंधर रामजी साठी ..

    ReplyDelete
  2. योगेश भाऊ, मस्त सुरुवात!
    अभिनंदन, ब्लॉग प्रकरण मनावर घेतल्याबद्दल!
    एकदा efforts टाकून जुने सगळे ब्लॉग्ज इथे आणलेत, तर एक चांगला reference तयार होईल.
    ता.क. ब्लॉग खूप लोकांना कळायच्या आत, custom domain registrationचा विचार करता येईल.

    ReplyDelete
  3. धन्यवाद ! साईदा, सुरूवात तर केली आहे.

    ReplyDelete
  4. मस्त रे योगेश! अभिनंदन ब्लॉगर झाल्याबद्दल.. साईशी पूर्ण सहमत. ब्लॉगही छान आहे. नासिक भागापासून सुरुवात केलीस. येथील दुर्ग तुझ्यावर कृपा ठेवून असतील.

    ReplyDelete
  5. हेम साहेब प्रचंड धन्यवाद !
    नक्कीच प्रयत्न करणार I

    ReplyDelete
  6. ब्लाॅग छान झालाय 👌🏾
    सगळी सातमाळा भटकुन झाली...कण्हेरगड आमच्या वाटेला काही येईना...यांच्या पायथ्याशी जवळून किती वेळा जाणे झाले असेल याची मोजदाद नाही 😣

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रशांत साहेब..

      Delete