चिल्हार लेणी आणि कोथळीगड
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सहपरिवार आहुपेघाट ट्रेक नंतर मे महिना अर्ध्यावर आला तरी कुठे बाहेर जाणे झाले नव्हते. घरातला कामाचा पसारा डागडुजी रंगकाम यामध्ये पार गुरफटून गेलो होतो. नेमकी १ मे ची विकेंडला जोडून आलेली सुट्टी याच कामाच्या व्यापात निघून गेली तोही मनात सल होताच. शेवटी अगदीच कासावीस होत गडबडीतून चार तासाचा वेळ काढून बदलापूरजवळील देवळोली गावातली जुणी शिवकालीन बांधीव विहीर आणि मुळगावच्या टेकडीवरचा खंडोबा अशी छोटी ब्रेकफास्ट राईड, डोंबिवलीस्थित सह्यमित्र जितेंद्र खरे यांच्या सोबत करून आलो.
शेवटी महिनाभराने घरातले काम पूर्ण झाले. मग घरातल्या मंडळींसोबत खरेदी, बाहुबली २, बाहेर डीनर वगैरे सोपस्कार पार पाडून, रविवारचा दिवस स्वत:साठी रजामंजुर करून घेतला. आता पडला नेहमीचा प्रश्न, 'भर उन्हात जावे तरी कुठे ?' एक दिवसात कमीत कमी प्रवास आणि जास्तीत जास्त वेळ सह्याद्रीत घालवायचा होता. माझ्या मनात छोटेखानी सर्वांगसुंदर माझा ऑल टाईम फेव्हरेट अश्या कोथळीगडाच्या आसपासच्या घाटवाटा साद घालत होत्या. नेमके त्याच वेळी जितेंद्र खरें सोबत बोलणे झाले आश्चर्य म्हणजे त्यांनी मला आंबिवली जवळची चिल्हार नदीकाठची लेणी साठी विचारले. मग काय तसेही बाहेर निघायचे तर आहे लेणी पाहून आसपास फिरून येऊ अगदीच नाही तर कोथळीगडावर जाऊन येऊ. लगेच होकार देऊन टाकला. माझ्या सह्यभटकंतीचा श्रीगणेशा याच भीमाशंकर परिसरात झाला त्यामुळे असेल कदाचित पण भीमाशंकर कोथळीगड राजमाची या ठिकाणी कैक वेळा गेलोय दरवेळी काहीतरी नाविन्य पदरात पडतेच. रविवारी सकाळी साडेपाचला मी, जितेंद्र खरे आणि नारायण अंकल तिघेही पाईपलाईन रोड पकडून नेरळ कशेळे मार्गे आंबिवलीच्या थोडे पुढे, टेंभरे गावाकडे डावीकडे वळालो. पुढे उजवीकडे कच्चा रस्त्यावर गाडी उभी करून चिल्हार नदीच्या कडेने नव्याने बांधलेल्या क्रॉक्रींटच्या छोट्या वाटेने लेणीपाशी पोहचलो. बुध्दकालीन पुरातन लेणी.
समोरच दर्शनी भागात चार कोरीव स्तंभ. नव्याने बसवलेला लाकडी दरवाजा. आतमध्ये समोरील कोनाड्यात लक्ष्मी नारायण, मारूती, श्रीकृष्ण आणि विष्णू यांच्या मूर्ती आहेत.
बाहेरील बाजूस उजवीकडे पिण्यालायक पाण्याचे टाके तसेच काही अंतरावर जरा उंचीवर आणखी दोन कोरडी टाकी आहेत. नारायण अंकल २५ वर्षांपूर्वी येऊन गेले होते, त्यांच्यामते तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती यात खुप फरक जाणवला. जरी पुरातत्व खात्याने काही सुधारणा केल्या असल्या तरी आसपासचा भाग बराच ओसाड आणि वैराण. अगदीच दोन चाफ्याची झाडे आणि त्यावरील फुले तीच काय जमेची बाजू. तिथून निघून जामरूंगच्या अलीकडे डुक्करपाड्यात दाखल झालो, पहातो तर गावात लगीनघाई त्यामुळे जो तो गडबडीत. एके ठिकाणी घरमालकाची परवानगी मिळवून गाडी घराजवळ सावलीत उभी केली.
डुक्करपाडातून घाटावर जाण्यासाठी ३-४ वाटा आहेत. दुरची कामतपाडा मार्गे वाजंत्री, अंधारीची वाट तसेच पेठच्या खिंडीतून थेट वर नाखिंडा आणि कौल्याची धार. गावाच्या आग्नेयला कोथळीगड सह्याद्रीच्या रांगेला अगदी काटकोनात छेदणारा.
गावाबाहेर पडल्यावर मुख्य वाटेची विचारणा करण्यासाठी एका मोटरसायकलस्वाराला थांबवले. तोंडातून पिचकारी सोडत उलटपक्षी आम्हालाच, ‘जागा पहायला आले आहात का ? प्लॉट घ्यायचा आहे का ?’ असे बोलू लागला. अर्थात त्याचे बोलणे ऐकून नवल असे काही वाटले नाहीच मुळी कारण जिकडे तिकडे मोठमोठ्ठाले जाहिरातींचे फलक. थोडक्यात याभागातला सह्याद्री विकला गेलाय. फार्म हाऊज, बंगलो यांच्या विळख्यातून निघून वाट चढणीला लागली. थोडे वर येताच, उजवीकडे सौम्य तिरकी चढाई करत वाट मुख्य ओहोळाच्या डावीकडून चढू लागली.
अगदी झक्क मळलेली गावकरींची नेहमीच्या वापरातली वाट. या वेगळ्या वाटेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आंबिवलीतून येणार्या नेहमीच्या वाटेपेक्षा कमी वेळात हि वाट वर चढते. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या उघड्या बोडक्या वाटेच्या तुलनेत ऐन उन्हाळ्यात सुखावणारा झाडोरा.
मस्त पैकी पानांची सळसळ आणि सावलीची मजा घेत, ओढ्याला उजवीकडे ठेवत वाट नागमोडी वळणे घेत चढाईची मजा अनुभवत होतो. पाठीमागे तुंगी ते पदरगड भीमाशंकर असा पेनॉरमा. पाऊण तासातच पेठवाडीत दाखल झालो. डामसेंच्या घराजवळच लिंबू सरबतचा स्टॉल, मस्त झाडाखाली गारेगार लिंबू सरबत पिऊन किल्ल्याकडे निघालो.
वाटेत गावातली शाळकरी मुले आंबे, कैर्या, करवंदे विकायला बसली होती. आरामात अर्ध्या तासातच पडक्या दरवाजातून मुख्य चार खांबी, खिडक्या असलेल्या गुहेत पोहचलो. बाजूच्या भैरोबाच्या गुहेबाहेर कुणीतरी मोठ्या अक्षरात " स्त्रियांना प्रवेश नाही" असे काहीतरी लिहून ठेवले होते साला हा काय अजब प्रकार ! काय बोलावे आता ? जग कुठे चाललंय आणि आपण ? सध्या विषयांतर नको..... किल्लाचा माथा म्हणजे भला मोठा सुळका.
याच्या आतल्या भागातल्या कोरीव भुयारी मार्गातल्या पायरांनी माथ्यावर आलो. समोरच गढुळ पाणी आणि पालापाचोळ्यांनी शेवाळयुक्त मोठे टाके. बाकी भव्य सह्याद्रीचा १८०° नजारा पहावा तो इथूनच. समोरच खुणावणारी कौल्याची धार, जवळची नाखिंद्याची वाट त्या पठारावरील पवनचक्क्या ते पार वांद्रे खिंडीपर्यंत तसेच दक्षिणेला बैलघाट, पायरीघाट ते थेट पदरात लपलेली काळकाई वस्ती तर वायव्येला तुंगी पदरगड भीमाशंकर सिध्दगड ते पार खेतोबा वांजत्री घाटापर्यंतचा मुलुख. दुरवर एक पांढरा ठिपका लक्ष वेधून घेत होता, डोळे बारीक केल्यावर ते खेतोबा मंदिर ओळखता आले.
पाहूनच मागे जानेवारीत आंबेनळी घाट-भोरगिरी-खेतोबा दार शिडीची वाट या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. http://ahireyogesh.blogspot.com/2017/06/ambenali-bhorgiri-khetoba.html
वाटेत बुरूजाजवळची तोफ.
वाटेतल्या काही टाक्यांचे समुह पहात, कड्याला चिकटून अशा अरूंद अशा वाटेने कौल्याच्या धारेसमोरच्या गुहेत आलो. ही गुहा म्हणजे आमची कोथळीगडावरची सर्वात आवडती जागा त्यातही नारायण अंकलची तर खासच. इथेच घरातून आणलेला दुपारच्या जेवणाचा डबा फस्त केला. भरपोट जेवण झाल्यावर भर दुपारी वाहत्या वार्यामुळे झोप कशी लागली ते कळलेच नाही.
कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला हा काही खुप मोठा किल्ला नाही. अगदी छोट्या मोठ्यांपासून, हवश्या नवश्यांसाठी भटकंतीसाठी आदर्श असा पण आजुबाजूच्या घाटावाटांवर वचक ठेवण्यासाठी सह्याद्रीतले याचे भौगोलिक स्थान फार महत्वाचं. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पुढे मराठ्यांच्या काळात शस्त्रागार म्हणून किल्ल्याचा वापर केला जाई. किल्ल्याच्या ईतिहासाबद्दल बरीच माहिती पुस्तकात व आंतरजालावर उपलब्ध आहे.
काही ठिकाणी जुजबी तटबंदी, मोठमोठी टाकी पाहत पुन्हा मुख्य गुहेत परतून पाण्याच्या बाटल्या भरून पेठवाडीत उतरलो. सकाळचा पाऊण तासाचा चढाईचा मार्ग उतरताना पंचवीस मिनिटांतच पार केला. बंगल्याचे कुंपण पार करून डुक्करपाड्यात पोहचलो तेव्हा चिल्हार लेणी आणि एका वेगळ्या वाटेने कोथळीगड पाहून दिवस सत्कारणी लावल्याचे समाधान मिळाले.





Mast lihile aahe....Sagla trek parat dolyasamor oobha rahila :-)
ReplyDeleteThanks
Deleteडुक्करपाडा वाचून जाम हसलो😂😂😂
ReplyDeleteकोथळीगड सोबत जोडलेली चिल्हार लेणी खासच, अजून फोटोग्राफ लेण्यांचे असते तर मजा वाढली असती, गडाची गुहा माझ्यासाठी सरप्राईज... हायला हि राहून गेली. ओ पुढच्या वेळेस नक्की पाहीन.
ब्लॉग झक्कास.
देवा, अरे लेणी फारशी मोठी नाहियेत. एकच मुख्य विहार आहे दर्शनी भागात कोरीव स्तंभ आणि समोर व आजुबाजूला छोटे कोनाडे. तसेच काही भग्न मुर्त्या. होतं काय फोटो जास्त आणि लिखाण कमी, हे काय बरोबर वाटत नाही.
ReplyDelete