Thursday, 3 November 2016

Unplanned Bike Ride


Unplanned बाईक राईड.......



       दिवाळीच्या चार दिवसाच्या सुट्टीत बाहेर निघणे मुश्कील, तरीही ऐन भाऊबीजेच्या दिवशी कसाबसा अर्धा दिवस वेळ काढलाच. अशी सलग सुट्टी आली कि आम्हा भटक्यांच मन काही थारावर रहात नाही. सैरावैरा हिंडायला पायाला खाज सुटते. मग काय, नारायण अंकलला फोन करून माझी व्यथा सांगितली ते तर लागलीच तयार ,अर्ध्या तासात ठरलेल्या जागी भेटलो.
नाहिच काही तर बाईक काढून निदान सह्याद्री दर्शन तरी करून येऊ. भेटलो पण जाणार कुठे ? एक गोष्ट मात्र खऱी, अगदी काहीही नियोजन करता क्वचित कधीतरी अशीच भटकंती सुध्दा खुप काही देऊन जाते. जवळच्या जवळ सह्याद्री चे रांगडे दर्शन करायला आम्हा  कल्याणकरांना मुरबाड माळशेज मार्ग सोडून दुसरा कोणताही चांगला ऑप्शन नाहीच नाही. माझा तर हा मार्ग ऑल टाईम फेव्हरेट. ११ वाजता निघून तासाभरात शिवळे ला नेहमीच्या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो.
तो पर्यंत ठरत नव्हते काय करावे. एकदा वाटले चलागणपती गरड’ चा छोटेखानी ट्रेक करावा, जो आधी दहा वर्षांपूर्वी पावसाळ्यात केला होता. पण ट्रेक करता बाईकच दामटवावी असेही वाटत होते.
नाश्ता करून निघालो सरळगावात बाजाराची गर्दी त्यात भाऊबीजेमुळे रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ ही खुप चक्क दोन किमी पर्यंत रांगा, त्यातून बाईक काढायला फारसा वेळ लागला नाही.
मोरोशी अलीकडून वालीवर्हे- बेलपाडाच्या दिशेला वळालो, बरोब्बर तीन वर्षांपूर्वी मी आणि अंकल इथेच (काळुचा वोघ आणि कोकणकडा) आलो होतो. काळू नदीत दोन चार गाववाले निवांत मासे पकडत होते. तर काही ठिकाणी शेतीची कामं सुरू होती.
फार पुढे जाता मागे वळूनन्याहडी’ मार्गे तळेगावच्या दिशेने निघालो.
आम्ही ठरवले, सह्याद्रीच्या पायथ्याच्या गावा- वाडीतून थेट आजोबाच्या दिशेने गुंडा, डेहणे, डोळखांब करत शहापूर मार्गे जाऊ. न्याहडी सोडल्यावर उजवीकडे सह्याद्रीची सोबत होतीच.
कोकणकडा मागे पडून नाफ्ता, नकटा ते थेट आजोबा पर्यंत सरळसोट काला पत्थरची भिंतच. पुढे तळेगावच्या थोडे अलीकडेउमरोली’ फाट्यावर थांबलो. डावीकडे आजोबा सह्यशिरोधारेवर भलताच ऊंच दिसत होता, त्याच्याच दक्षिणेकडे मुख्य रांगेतून एक दुर्गम आणि बिकट अशी घाटवाट कोकणात उतरते. खऱ सांगू तर मी आणि अंकल आम्ही दोघांनीही काहीही बोलता ऐकेमेकांच्या मनातले ओळखले. त्यामुळे पुढे काय करावे याचा प्रश्नच नव्हता. विलंब करता, किक मारून बाईक उमरोलीच्या दिशेला टाकली.
           दोघेही पाथरा.... पाथरा....असं काहीतरी वेड्यासारखे बडबडत उमरोली पुढे कुंडाची वाडीत दाखल झालो. एका घरापाशी थांबलो, अंगणात गाडी उभी करतो तितक्यात घरातल्या आजीबाई बाहेर आल्या, कोण -कुठून चौकशी झाल्यावर अंगणात पाण्याचा लोटा हजर. पाणी पिऊन झाल्यावर आमचा पाथरा घाटाबद्दल प्रश्नांचा भडीमार सुरू. चक्क त्या आजी मागच्या दोन तीन वर्षांपर्यंत याच घाटाने कुमशेतला त्यांच्या सगेसोयर्यांकडे ये जा करत असत. आत्ता हि काही कार्यक्रम असले किंवा बोलावणे आले तर घरातली मंडळी कुमशेतला याच घाटाने ये जा करतात.
      ‘पाथरा’ हा आजोबाच्या दक्षिणेकडून उतरणारा अवघड श्रेणीतला घाट, उभी सरळसोट चढाई, जोडीला भरपूर घसारा, अरूंद पावठ्यांचे उभे आडवे कातळटप्पे आणि अर्थातच दृष्टीभय. थोडक्यात हा घाट म्हणजेखुट्टेधार’ घाटाचा थोरला भाऊच म्हणावा लागेल.
आजींनी त्यांच्या लाजर्याबुजर्या नातवाला आमच्या सोबत पाठवले. या वेळी तर नाही पण आलोच आहोत तर जेवढे जमेल तितके आत जाऊन येऊ असे ठरवले.
टिपिकल सह्याद्रीच्या पायथ्याचे गाव असेचकुंडाची वाडी’ एका बाजूला आजोबा पाथर्या कडून येणारा पावसाळी ओढा दुसरीकडे उतारावरची शेती. ओढ्याच्या कडेने जात, पलीकडे ओढा ओलांडून आत शिरलो.
पाथराची सरळसोट उतरणारी सोंड भलतीच रौद्र दिसत होती खालच्या पट्ट्यातली झाडी सोडली तर वाटेवर एक झाड नाही. मला तर हि वाट चकदेवची शिडीडाक सारखी वाटली ऐन नाकडावरची उभी चढाई. बराच वेळ निरीक्षण करत, लवकरच हा ट्रेक करायचा असे ठरवून ही टाकले. एव्हाना वाजत आले होते, घरी सायंकाळी दिलेल्या वेळेत पोहचायला हवे. मन मात्र पाथराच्या वाटेवरच रेंगाळत होते, माघारी फिरलो मध्ये एका झापावर शेतकरी दादाने आवाज दिला मग तिथे थोड्या गप्पा टप्पा झाल्या.
ते दादा तर चक्क म्हणाले, रात्री आमच्या शेतात मुक्काम करू दुसर्या दिवशी पहाटेच निघू नऊ वाजेच्या आतच तुम्हाला व्यवस्थित कुमशेतला घेऊन जाणार.
वाह! शेतकरी दादांचे बोलणे ऐकून हूरूप आला, आता तर लवकर यावेच लागणार.
गावात परतलो चिल्ली पिल्ली खेळण्यात रमली होती तर काही आपआपल्या कामात ऐन दिवाळीत हि सर्व जण आपल्या दिनचर्येत व्यस्त, कुठेही झगमगाट नाही कि गोंगाट कोलाहाल नाही.
मागच्या दिवाळीत उपांड्या घाटाच्या वेळी ही अशीच शांत दिवाळी केळदला अनुभवली होती.
चहाचा आग्रह मोडून, पुन्हा येण्याचा वादा करून आजींचा निरोप घेतला. अल्पशा भेटीत अशी कैक मायाळु माणसं या सह्यादीमुळे जोडली गेली आहेत, या बद्दल तर काय सांगावे. पुढे शाळेजवळ आलो असता काही बाया माणसं आपल्या लहान पोरांसोबत थोडफार सामानासकट येताना दिसले, आजींचा नातू म्हणाला, "हे पहा, हे घाटावरून आलेत."
 त्यांच्याकडे पाहून खऱच काहिसे आश्चर्य वाटले तसे पाहिले तर स्थानिक गावकर्यांचे हे नेहमीचे वापराचे मार्ग पण बायका पोरांसोबत अशी अवघड वाट उतरणे हे ही तितकेच धाडसाचे काम. बोलताना असे कळाले, हि मंडळी कुमशेत कडची, दिवाळी संपत आली आता पुन्हा टोकावडे, तळेगाव अशा ठिकाणी पोटापाण्यासाठी शेती अथवा मजुरीची कामं कामे करतात, दोन अडीचशे रू. बस चे भाडे भरण्यापेक्षा हि वाडवडील पुर्वंजापासून वापरात असलेली घाटवाट अधिकच जवळची आणि फायद्याची. गावातून निघालो तेव्हा उन कलतीला लागले होते. डावीकडे पार दुर्ग ढाकोबा जीवधन नाणेघाट रोहिदास तारामती नकटा नाफ्ता सर्वच मावळतीच्या प्रकाशात सुंदर दिसत होते.
पुढे तळेगाव शिरोशी टोकावडे रस्ता पकडला. अतिशय चांगला रस्ता दोन्ही बाजूला दाट झाडी वाटेत पुन्हा काळू नदी पार करून टोकावडे अलीकडे माळशेज मुरबाड मार्गावर आलो.
पाथरा घाट- आजोबा- गुयरीचे दार असा पुढचा प्लान ठरवत सातच्या सुमारास घरी दाखल झालो.


योगेश चंद्रकांत आहिरे 

2 comments:

  1. Hi yogesh,
    super blog man, really miss u and kalyan.

    ravi

    ReplyDelete
  2. Hey Ravi,
    Nice to see you after a long time.
    Where are you now ?

    ReplyDelete