Monday, 20 June 2016

Off Route Trek


आगळी वेगळी भटकंती


     उन्हाळ्यात ट्रेक करताना फार मर्यादा पडतात. कुठे जावे हे सहजासहजी सुचत नाही मग सहाजिकच भटकंती सुसह्य होईल अशा ठिकाणाचा शोध घेतला जातो.
अशाच एका आगळ्यावेगळ्या ट्रेकचा हा वृत्तांत.
      मी आणि झेनोश दोघे शुक्रवारी रात्री निघालो, हायवेवर रहदारीतून मार्ग काढत भल्या पहाटे गावातल्या मंदिरात पथारी पसरली. उजाडल्यावर जाग आली पाहिले तर नुकताच पाऊस आंगण ओले करून गेला होता.
चला ट्रेकची सुरूवात त्यामुळे चांगलीच होणार यात शंकाच नाही. पुढे गाडीने ऐन जंगलातल्या देवस्थानाच्या दिशेने निघालो. जंगलातल्या अरूंद कच्चा दगडधोंड्याच्या रस्ता ? वरून डिझायर सारखी गाडी झेनोशने व्यवस्थित चालवत मंदिरापर्यंत नेलीच.


चांगलीच ऑफरोड ड्राईव्ह झाली. भर उन्हाळ्यात एवढे दाट जंगल पाहून विश्वासच बसत नव्हता. काही मोठ्ठाली जुनी झाडे तर ऊंचीने पार एकेमेकांशी स्पर्धा करत होते.

प्रथम डोंगराचा माथा मग देवदर्शन असे ठरवले. उजवीकडच्या मळलेल्या वाटेने चढाईला सुरूवात केली. मस्तपैकी जंगलातून वाट आरामात वर चढत गेली.

कुठेही उभी, खडी अथवा छाताड्यावरची चढाई नाही. काही वेळातच समोर दोन वाटा आढळल्या , सहाजिकच वर जाणारी म्हणून डाव्या हाथाची वाट पकडली. आस्तेकदम पुढे जात एका मोठ्या कोरड्या ओढ्याजवळ आलो. दिशेनुसार आम्ही योग्य वाटेवर होतो, या वाटेने डोंगराचा माथा गाठल्यास पलीकडच्या बाजूला कोकण दिसणार होते. त्याच मोठ्या ओढ्यात उतरून अर्थातच ओढ्याच्या आजुबाजूने वर चढाई सुरू ठेवली.

जसजसे वर जात होतो, तसे जंगल आणखी दाट आणि वाट अस्पष्टशी होत गेलीझाडीझुडपी काटोर्यातून मार्ग काढत थोडे वरच्या बाजूला मोकळ्या जागेत आलो. मागे दुरवर आम्ही आलो तो आमचा मार्ग दिसत होता.
पण कातळमाथा अजुनही बराच ऊंच  होता, तसेच दिशेनुसार पुढे जंगलात शिरलो वरच्या बाजूला चढाई करत एका दांडावर आलो. डोंगर भला मोठा आणि प्रचंड पसरलेला होता. जितके जवळ जाण्याच्या प्रयत्न करत होतो, तितकाच माथा अजुन दुरवर आणि ऊंच भासत होता.
थोडक्यात तात्रिंक चढाई, पूर्वतयारी आणि हाताशी भरपूर वेळ या शिवाय माथ्यावर जाता येणार नाही. नाहितरी आमच्या ट्रेकचा मुळ उद्देश फक्त जंगल अनुभवत, मुक्त भटकंती करणे हाच होता. काही वेळ विश्रांती घेतल्यावर आल्या वाटेने खाली उतरू लागलो. पुन्हा त्या दोन वाटेंच्या जंक्शन वर आलो. मग मागे बघितलेली या वेळी उजवी वाट पकडली. वाट हळूहळू उजवीकडून जंगलातून वर जात छोट्या पठारावर आली. इथुन आता तो कातळमाथा पार डावीकडे दिसत होता. वाट पुढे जात कारवीच्या झुडूपांमधुन टेपाडावर चढू लागली, दिशेनुसार अर्थातच पश्चिमेकडे सरकत होती. तसेच वर चढून गेल्यावर पलीकडचे दृश्य पाहून थक्कच झालो, पलीकडचा कोकण प्रांत, त्याला देशाची जोडणारी पूर्वीची घाटवाट, तसेच दक्षिणेला आजच्या काळातला गाडी मार्गाने जोडला जाणारा प्रसिध्द घाट डोळे बारिक केल्यावर घाटातून जाणारी वहाने अगदी खेळण्यातल्ये वाटत होते.
उत्तरेकडे आमच्या ओळखीतली मातब्बर मंडळी पठार, किल्ले, डोंगर सहज ओळखु आले. या सर्वांचे एका वेगळ्याच कोनाड्यातून दर्शन घडले. बराच वेळ ते पहातच रेंगाळलो. सोबतचा सुका खाऊ तिथेच खाऊन फस्त केला. पुन्हा त्या सुंदर जंगलवाटेने खाली उतरून गाडी जवळ आलो. डावीकडच्या मुख्य वाटेने देवरा कडे निघालो. वाटेत मोठ्या झांडावर ठिकठिकाणी झेंडे लावलेले होतेच. पंधरा मिनिटांतच छोटीशी चढाई करून त्या निसर्गातल्या, गर्द रानातल्या देवरात आलो.
शेंदुर फासलेल्या देवासमोर गावकरींनी घंटे जवळ नारळं वाहून ठेवली होती. पक्ष्यांची किलबिलाट आणि झाडांवर चाललेली दोन हुप्प्यांची मस्ती सोडली तर बाकी सारे निवांत होते. निसर्गातल्या त्या देवाला मनोभावे नमन करून पुन्हा गाडीत बसून तो जंगलातला रस्ता पार करून एका छोट्या वस्तीवर आलो.
एका घराजवळ गेलो लागलीच पाण्याचा तांब्या लोटा हजर. थोड्या गप्पा झाल्यावर चक्क जेवणासाठी आग्रह सुरूवातीला आम्ही दोघांनी नकार दिला पण त्यांचा प्रेमळ आग्रह काही मोडवेना. रूचकर पोटभर जेवण झाल्यावर मी तर वामकुक्षीच्या नावाने त्यांच्या घराच्या अंगणात चांगली तासभर ताणून दिली.
त्या स्वच्छ अंगणात तिथल्या मोकळ्या हवेत हे तर होणारच होते. तो पर्यंत झेनोशला तिथली चांगली जांभळ चाखायला मिळाली. तिथून निघताना त्या घरातले आजोबा आमच्या सोबत आले, त्यांना वाटेतल्या आश्रम शाळेपाशी उतरायचे होते. पुढे वाटेत एके ठिकाणी कुंडाजवळ थांबलो, छोटे दगडात मंदिर दिसले, गावकरी श्रध्देने नवस वहातात.
खाली डोहात चांगलेच पाणी होते. खाली उतरून पलीकडे डोहात मस्तपैकी अंघोळ करून चांगलीच तरतरी आली.
पुढे आजोंबाना आश्रम शाळेजवळ सोडून पलीकडच्या गावात पोहचलो तो पर्यंत सायंकाळचे चार वाजून गेले होते. एका घराजवळ गाडी उभी केली, इथेही सह्याद्रीतल्या आदरतिथ्याप्रमाणे कोरा चहा मिळाला. त्याच घरातला सचिन आमच्या सोबत यायला तयार झाला. गाडी डोंगरपायथ्याखाली उभी केली. स्थानिक लोकांच्या भाषेत हा पाळणा. यावर चढाईला ढोरवाटा भरपुर माथ्यावरील खिंडीच्या दिशेने सरळ जात राहिलो.
मधला घसारा टप्पा पार करत वळसा घालून माथ्यावरच्या खिंडीत दाखल झालो, सायंकाळचा पलीकडून येणारा कोकणातला वारा स्वागताला हजरच होता. सकाळचे दृश्य थोड्याफार प्रमाणात मिळाले.
आम्ही सकाळी होतो तो डोंगर दक्षिणेला खुपच ऊंच भासत होता. पलीकडील घाटमाथ्यावरील पठारावरच्या वस्तीतून धुर निघत होता, गाई गुरे आपआपल्या गोठ्याकडे परताना दिसत होते.
एकंदरीत ते  छोटे गाव खुपच सुंदर दिसत होते. त्या धुप छाव वातावरणात सुर्यास्ताच्या छटा पहातच तिथून उतरायला सुरूवात केली, अर्ध्या तासातच खाली मुख्य रस्त्यावर गाडी जवळ आलो. सचिनला त्याच्या घराजवळ सोडून त्या घाटमाथ्यावरील गावाकडे मुक्कामी निघालो. छोटा वळणदार उतार पार करत थेट शाळेजवळ गाडी उभी केली. शेजारच्या घरातले मास्तर बाहेर आले, विचारपुस झाल्यावर पाण्यासाठी हंडा विहीरीतून पाणी काढायला पोर्या दिला. सोबत एक लहान मुलगी विहीर दाखवायला आली. पाण्याची व्यवस्था एकदम मस्त.
शाळा मास्तर बराच वेळ गप्पा मारत होते. जेवणाचा आग्रह तर झालाच पण नम्रपणे नकार देऊन, सोबत आणलेल्या शिधा घेऊन शाळेच्या अंगणातच जेवणाच्या तयारीला लागलो. अंधार पडल्यावर समोरच्या झाडांवर चक्क काजव्यांनी लखलखीत दिवाळीच केली होती. अनपेक्षितपणे खुपच चांगले काजवे पहायला मिळाले. क्यामेरात फोटो टिपायला मर्यादा , पण यांच डोळ्यांनी भरभरून पाहून घेतले. जेवण झाल्यावर शाळेच्या वरंड्यात झोपण्याऐवजी मस्तपैकी गार हवेत छतावर झोपण्याचा निर्णय घेतला. बाकीचे सामान गाडीत टाकून झोपायचा बिस्तरा घेऊन वर छतावर गेलो, त्या मोकळ्या हवेत पाठ टेकताच झोप लागली. नंतर अचानक टपटप बारीक पावसाला सुरूवात झाली काही क्षणातच चांगलाच बरसु लागला. पटकन सर्व आवरते घेत खाली वरंड्यात आलो, पण तेथे पण वार्यामुळे पावसाच्या धारा सर्व अंथरूण भिजवू पहात होत्या. पावसाने चांगलाच जोर पकडला, आता शेजारच्या शाळा मास्तरांकडे जावे लागेल की काय? तितक्यात आमचे लक्ष शाळेच्या एका खोली कडे गेले, फक्त कडी लावली होती कुलुप नव्हते, उघडून पहातो तर रिकामा मग काय लगेच तिकडे मोर्चा वळवला.
          सकाळ मात्र फारच सुंदर झाली, रात्री पाऊस झाल्यामुळे वातावरणात एक वेगळाच तजेला आला होता आकाश बर्यापैकी स्वच्छ आणि निरभ्र.
सकाळची आवराआवरी करून पुढचा पल्ला होता, याच भागातला एक छोटेखानी अल्पपरिचित किल्ला. गावातून निघून पुढे मुख्य रस्त्याला लागत पायथ्याच्या गावात चौकशी केली. पुढे खिंडीत रस्त्याअलीकडे गाडी ठेवून, सरळ समोरच्या सोंडेवरून चढाईला सुरूवात केली. ते सोंडेवरचे छोटे टेपाड पार करून पलीकडच्या खिंडीत धापा टाकतच पोहचलो.
मागे दृश्य तर खासच. तसेच पुढे डावीकडून ट्रेव्हर्सी घेत वाट वळणे घेत वर चढू लागली काही ठिकाणी मुरूमाचा प्रचंड घसारा पण आदल्या रात्री पाऊस झाला असल्यामुळे माती काही ठिकाणी घट्ट रूजली होती अन्यथा हा घसारा खुपच त्रासदायक ठरला असता. डावीकडे दरी, उजवीकडे कडा खाली दुरवर छोटछोटी गाव वस्त्या. अशीच वाट पार करत पाऊण तासात माथ्यावर दाखल झालो. किल्ला म्हणावयास तसे फारसे अवशेष नजरेस पडले नाहित. पण चारही बाजूंना मुख्य वाटेवर टेहळणी करता तर नक्कीच उपयुक्त.
पुढे जात शिवलिंग दिसले. काही ठिकाणी चौथराचे अवशेष.
माथ्यावरून आजुबाजूचा सारा आसमंत भलताच सुंदर दिसत होता. काही ओळखीची इतर दुर्ग मंडळी नजरेत आली. डोक्यावर सुर्य आल्यावर उतरायला घेतले.
आल्यामार्गाने पुन्हा खिंडीत येऊन गाडीतून शहराकडे परतीचा प्रवास सुरू केला.
ते या दोन दिवसाच्या निसर्गातल्या  एका आगळ्यावेगळ्या भटकंतीचा पूर्ण आनंद लुटूनच.

सर्व प्रचि साभार : झेनोश पटेल


योगेश चंद्रकांत आहिरे






































8 comments:

  1. मस्त रे... छान भटकंती

    ReplyDelete
  2. धन्यवाद जितू साहेब

    ReplyDelete
  3. योगेश,
    मस्त भटकंती..
    मस्त लिहिलंय. .
    सह्य घाटमाथ्याच्या ट्रेक्सची मज्जाच वेगळी...

    ReplyDelete
  4. Sunder,
    Please do read My one and only one blog
    nitinkarite.blogspot.com/

    ReplyDelete
  5. छान लिहले आहे. उन्हाळ्यात सुट्टी असुन नेहमी कुठे जायचे हा प्रश्न असतोच. पण हे एक आहे की तेव्हा नवीन वाटा शोधायला चांगला वेळ असतो. आता तर नाही जाऊ शकत. ह्या पावसात एक ट्रेक नक्की आयोजित करा..

    ReplyDelete